थोडा हैं थोडे की जरुरत हैं...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे


आपल्या पहिल्याच चित्रपटाला ‘पाथेर पांचाली’(१९५५) तब्बल ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे सत्यजित रे असोत, की मृणाल सेन, तपन सिन्हा, ऋतुपर्णो घोष, अपर्णा सेन, बुद्धदेव दासगुप्ता, ऋषिकेश मुखर्जी किंवा बासू चटर्जी असोत ही सगळी मंडळी म्हणजे बंगाली जादूगार!


हे चित्रपटसृष्टीतले आधुनिक ‘विश्वामित्र’च होते. त्यात ऋषिकेश मुखर्जी आणि बासुदांनी दिलेले योगदान अजूनच वेगळे! हे दोन्ही दिग्दर्शक म्हणजे चित्रपटसृष्टीचे प्रसन्न, सभ्य, चिंतनशील रूप होते. त्यांनी प्रत्येक कलाकृतीतून प्रेक्षकांना आनंदच दिला. अगदी ऋषिदांचा ‘आनंद’सुद्धा एका सुनिश्चित मृत्यूची कथा असूनही समाजाला वेगळाच विचार आणि टोकाचा सकारात्मक संदेश देणारा होता. त्यांच्या ‘बावर्ची’नेही एक सुंदर विचार दिला. बावर्ची इतक्या कल्पकपणे निर्माण केलेला होता की काहीसा प्रबोधनात्मक असूनही तो एक मस्त मनोरंजक सिनेमा ठरला!


दुसरे बंगाली जादूगार असलेल्या बासुदांचे प्रभुत्वही चमत्कारीच होते. त्यांचा ‘चितचोर’(१९७६) पाहून शहरातील अनेक तरुणांना खेड्यात बदली घ्यायची इच्छा झाली होती, तर ‘छोटीसी बात’(१९७५), ‘बातो बातो’मे (१९७९) किंवा ‘रजनीगंधा’(१९७४) पाहून खेड्यातील युवकांना मुंबईत नोकरी मिळवावी असे वाटू लागले होते! अर्थात याच माणसाने ‘एक रुका हुवा फैसला’(१९८६) हा ‘१२ अँग्री मेन’(१९५५) या इंग्रजी सिनेमाचा रिमेक आणि ‘कमला की मौत’(१९८९)सारखे चित्रपटही निर्माण केले होते हेही खरेच. बासुदांना तब्बल ६ फिल्मफेयर पुरस्कार, एक राष्ट्रीय पुरस्कार, तर २००७ला आइफाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला.


बासुदांचे एक वैशिष्ट्य म्हणजे मध्यमवर्गीयांना जी समस्या भयंकर वाटायची ती ते पडद्यावर कल्पकपणे सहज सोडवून दाखवत. त्यामुळे स्वप्नरंजन म्हणून का असेना पण त्यांचे चित्रपट खूप दिलासा आणि आनंद देऊन जायचे. असाच मध्यमवयीन विधवा किंवा विदूर यांना भेडसावणारा एकाकीपणाचा प्रश्न बासुदांनी त्यांच्या १९७८च्या ‘खट्टा-मिठा’मध्ये सोडवून दाखवला होता! कलाकार होते अशोककुमार, राकेश रोशन, बिंदिया गोस्वामी, देवेन वर्मा, प्रीती गांगुली, पर्ल पद्मसी, केस्टो मुखर्जी, इफ्तेखार, रुबी मेयर, राजू श्रेष्ठ, रंजीत चौधरी आणि डेव्हिड. होमी मिस्त्री (अशोककुमार) एक पारशी विदूर असतात. वडील आणि चार मुलांचे हे कुटुंब. इतक्या जणांचा संसार सांभाळण्यासाठी आणि आपले एकाकीपण असह्य झाल्याने होमी पुनर्विवाहाचा विचार करू लागतात. त्यांचा मित्र सोली (डेव्हिड) त्यांच्यासाठी नर्गिस सेठना (पर्ल पद्मसी) या विधवा महिलेचे स्थळ सुचवतो. सेठनाबाईंना एक मुलगी आणि दोन मुले आहेत. उभयपक्षी संमतीनंतर मुलांना हा निर्णय कळतो. तो त्यांना फारसा रुचत नाही. त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या ही गोड पारशी जोडी अतिशय समंजसपणे कशी सोडवते ते या चित्रपटाचे कथानक.


सिनेमात गुलजार या अवलियाच्या लेखणीतून उतरलेले एक सुंदर गाणे होते. ते जसे त्या कथानकाला लागू होते तसेच कोणत्याही परिस्थितीत कुणालाही उपयोगी पडेल असे आहे. गुलजार यांनी जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन इतक्या सुंदर पद्धतीने मांडला की, सिनेमा संपल्यावर प्रेक्षक राजेश रोशन यांनी संगीत दिलेले हे गाणे गुणगुणत तरी बाहेर पडतो किंवा ते आपल्या परिस्थितीला कसे लागू होते या विचारात गुंततो.


किशोरदा व लतादीदीने गायलेल्या त्या साध्यासुंदर गाण्याचे शब्द होते -
“थोड़ा है, थोड़े की ज़रूरत है...
ज़िन्दगी फिर भी यहाँ ख़ूबसूरत है.”
मध्यमवर्गीय कुटुंबात प्रामुख्याने समस्या असते ती पैशांची.
आहे तो पैसा त्यांना पुरत नसतो पण त्यांची पैशाची अपेक्षा श्रीमंत वर्गाइतकी बकासुरीही नसते. बिचारे त्यांच्या हिशोबाने ‘भरपूर’ पैसा आल्यावर काय होईल त्याची स्वप्ने रंगवण्यातच धन्यता मानतात. त्याकाळी तर चारचाकी गाडी घेतली तरी मोठ्या स्वप्नपूर्तीचा आनंद होई. पूर्वी बँकाही हल्लीसारख्या गळ्यात पडून ‘वाहन कर्ज घ्या ना गडे’ असे फोनवर आळवत नसत. त्यामुळे हे स्वप्न कधी पूर्ण होईल की नाही याचीही खात्री नसे -


‘जिस दिन पैसा होगा,
वो दिन कैसा होगा...
उस दिन पहिये घुमेंगे,
और क़िस्मतके लब चुमेंगे.
बोलो ऐसा होगा?
थोड़ा है, थोड़ेकी...’


मिस्त्री-सेठना या संयुक्त कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची छोटी छोटी स्वप्ने आहेत. एका मुलाला ब्रूस ली व्हायचे आहे तर दुसऱ्याला क्रिकेटपटू. एकाला स्वत:ची कार घ्यायची आहे, तर प्रीती गांगुलीला अमिताभशी लग्न करायची इच्छा आहे. त्यामुळे महाचतुर बासुदांचा कॅमेरा गाण्याच्या एकेका ओळीबरोबर एकेकाच्या चेहऱ्यावर जाऊन स्थिरावतांनाच आपल्याला त्या त्या सदस्याचे स्वप्न एका क्षणात दाखवतो.


‘सुन सुन सुन, हवा चली, सबा चली,
तेरे आँचलसे उड़के घटा चली,
सुन सुन सुन, कहाँ चली, कहाँ चली,
मैं छूने ज़रा आसमाँ चली...
बादलपे उड़ना होगा,
थोड़ा है, थोड़े की ज़रूरत है...’


जेव्हा प्रीती गांगुली आपल्या काल्पनिक लग्नानंतर स्वागत समारंभात अभिताभशेजारी बसलेली दाखवतात तेव्हा त्यांनी अमिताभलाही एखाद्या पारशी माणसासारखाच भाबडा अभिनय करायला लावला होता. त्याचे ते रूप पाहून प्रेक्षकानां हसू आवरूच शकत नाही.


‘हमने सपना देखा है,
कोई अपना देखा है..
जब रातका घूँघट उतरेगा,
और दिनकी डोली गुज़रेगी,
तब सपना पुरा होगा..
थोड़ा है, थोड़े की ज़रूरत है...’


शेवटच्या कडव्यात सगळे बाहेर झोपले आहेत. सकाळचे दृश्य असल्याने थकलेली पण हसमुख नर्गिस सर्वांसाठी चहा करून एकेकाला उठवून तो देते आहे. तिचे आणि होमीचे स्वप्न फक्त कुटुंबातील सर्वांनी प्रेमाने एकत्र राहावे इतकेच आहे. ते बासुदांनी पर्ल पद्मसी आणि अशोककुमारच्या निरागस अभिनयातून इतक्या सहजतेने मांडले की पाहताना डोळे पाणावतात.


‘छोटीसी ये दुनिया मेरी, पूरी दुनिया है,
साथ हैं हम, साथ हैं सब, साथ रहेंगे,
थोड़ा है, थोड़े की ज़रूरत है...’


आज कॉर्पोरेट जग प्रत्येकाला भस्म्या रोगाची लागण व्हावी म्हणून त्याच्याकडून ‘गिव्ह मी मोअर’ हा मंत्र घोकून घेत असताना ‘थोडा हैं, थोडे की जरुरुत हैं’ असे म्हणतानाच “जिंदगी फिर भी यहां खुबसुरत हैं.” असा समाधानी आशादायी सूर लावणारे गाणे कुणाला आवडणार म्हणा! पण युट्यूबवर जाऊन हा सिनेमा पुन्हा नीट पाहिला तर नक्कीच पटेल असा हा नितांत सुंदर विचार आहे
एवढे निश्चित!

Comments
Add Comment

गाण्यातून उमगणारी लता..

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा ६ फेब्रुवारी रोजी चौथा स्मृतिदिन झाला. भारतातील जवळपास सर्व भाषांमध्ये लता

‌‘राईट टू डिस्कनेक्ट‌’ साधणार समतोल

तंत्रवेध : डॉ. दीपक शिकारपूर कार्यकालीन काम आणि वैयक्तिक आयुष्यातील समतोल म्हणजे कामाच्या जबाबदाऱ्या आणि

छकडा मोडणे व तृणावर्ताचा उद्धार

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे बालकृष्णाच्या लीला व कृष्ण कथा जेवढ्या ऐकाव्या तेवढ्या गोडच वाटतात. तसेच

माझी प्राथमिक शाळा

विशेष : लता गुठे आजही गावी गेल्यानंतर शाळेच्या समोरच्या रस्त्यावरून जाताना नकळत शाळेकडे लक्ष जातं आणि ते सगळं

शोकगीतात दडलेलं मंजुळ भावगीत - ‘मर्सिया’

िवशेष : अश्विनी शिंदे व्हॅलेंटाईन डे म्हटलं की छान गुलाबी वेष्टनात गुंडाळलेलं प्रेम... कॅण्डल लाईट डिनर...नाही

व्हॅलेंटाईन डे

प्रेमाचा प्रश्न, की संस्कृतीची परीक्षा? संवाद : िनशा वर्तक प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या ठरावीक दिवसाची गरज