संस्काराची शिदोरी

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ


‘संस्कार’ म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार, अशी कुठेतरी व्याख्या वाचली आणि मला या विषयावर लिहावेसे वाटले.


शारीरिक, मानसिक, शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक विकासासाठी संस्कार गरजेचे आहेत. निरोगी समाजमन निर्माण करण्यासाठी संस्काराची आवश्यकता आहे.
हिंदू धर्मात मुख्य सोळा संस्कार आहेत. गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंतचे काही धार्मिक विधींचे त्यात वर्णन केलेले आहे. महत्त्व विशद केलेले आहे. आपण या विषयात खोलात न जाता ‘संस्कार’ शब्द उच्चारल्यावर आपल्याला काय आठवते ते पाहूया. स्वच्छता पाळणे, कोणत्याही छोट्या-मोठ्या कामासाठी शिस्त अंगी बाळगणे, चांगले ऐकणे तसेच चांगले बोलणे इ. म्हणजे आपला जन्म झाल्यापासून आपले आजी-आजोबा शेजारीपाजारी, नातेवाईक, आईवडील सगळेच आपल्याला संस्कारित करण्याचा प्रयत्न करतात आणि शाळेत गेल्यावर गृहपाठ इत्यादी नियमित करून आणण्याचे काही संस्कार आपल्यावर आपोआप घडत जातात.


इथे मला माझ्या लहानपणी आमच्या प्रायमरी शाळेचे प्राचार्य पाटील सर सांगायचे ती गोष्ट आठवली. ते आम्हा सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानात बसवून गोष्टी सांगायचे. एकदा त्यांनी आम्हाला चोरी करणे वाईट असते याशिवाय आईचे संस्कार कसे चुकीचे होते, अशी तात्पर्य देणारी कथा ऐकवली, ती मला अजूनही जशीच्या तशी आठवत आहे.
एक मुलगा शाळेतून दुसऱ्या मुलाची पेन्सिल घेऊन घरी आला. त्याच्या आईने ते पाहिले पण त्याला काहीच बोलली नाही. मग एक दिवशी तो दुसऱ्या एका मुलाचा पूर्ण कंपास बॉक्स घेऊन घरी आला तेव्हाही आई काहीच बोलली नाही. असे करत करत तो मुलगा मोठमोठ्या चोऱ्या करू लागला. लुटमार करू लागला. एकदा लुटमार करत असताना त्याला ज्या व्यक्तीने अडवले त्याचा याने खून केला. हे कृत्य केल्यावर तो घरी आला आणि घरात लपला तेव्हा आईने पोलिसांना तो घरात नसल्याचे सांगितले; परंतु पोलिसांनी त्याला त्यांच्या घरातून शोधून काढले आणि त्याने खून केला असल्याचे आईला सांगितले. तेव्हा मात्र आई हादरली आणि ती स्वतःच म्हणाली, “घेऊन जा याला माझ्या डोळ्यांसमोरून!”


आईने त्याला पोलिसांच्या हाती सुपूर्द केले; परंतु आई रडता रडता म्हणाली, की मी माझ्या मुलावर चांगले संस्कार केले असते तर ही वेळ आली नसती. त्याने जेव्हा पहिली चोरी केली तेव्हाच चोरी करणे कसे वाईट आहे, हे मी त्याला सांगायला हवे होते!


या गोष्टीतून छोट्यातली छोटी चोरी करणे वाईट असते त्यामुळे आपण मोठा चोर होतो, खुनी होतो ही गोष्ट मनावर बिंबवली गेली. इतकेच नव्हे तर पूर्वी काहीही ऐकले की ते आई-वडिलांना सांगायची सवय होती, भावंडांना सांगायची सवय होती, मित्र-मैत्रिणींना सांगायची सवय होती. त्यामुळे चांगल्या गोष्टी, चांगले संस्कार अशा तऱ्हेने सर्व दूर पोहोचत होते. अशा संस्कार देणाऱ्या कथा ज्या लहानपणी ऐकल्या आहेत त्या एखाद्या शाळेच्या कार्यक्रमात किंवा घरी आलेल्या लहान मुलांना आपोआपच सांगितल्या जातात.


मला असे वाटते, की ‘संस्कार’ ही अशी गोष्ट आहे की ती प्रत्यक्ष न शिकवता अप्रत्यक्षपणे मुलांच्या किंवा कोणाच्याही मनावर बिंबवली जाऊ शकते. याचे अत्यंत साधे उदाहरण म्हणजे आई-वडील जर ताटात अन्न उष्ट टाकत नसतील तर तीच चांगली सवय मुले उचलतात. हे एक चांगल्या संस्काराचे उदाहरण आहे त्याचप्रमाणे आई-वडील सातत्याने एकमेकांशी भांडत असतील किंवा भांडताना अपशब्द वापरत असतील, तर त्या घरातली मुले आपोआपच भांडताना तेच अपशब्द वापरतात. याउलट मुले जेव्हा घरी येऊन सहज बोलता बोलता एखादा अपशब्द वापरतात तेव्हा तो कसा चुकीचा आहे आणि आम्ही कधी वापरताना तू ऐकला आहेस का?, असे जेव्हा मुलांना सांगितले जाते तेव्हा ते त्याचा पुनरुच्चार करत नाहीत, हे स्वाभाविकच आहे.


कसे बोलावे हे जाणून घेणे आणि त्याप्रमाणे वागणे ही कला आहे. परंतु कसे बोलू नये आणि आपल्या शब्दांनीही कोणाला दुखावू नये, हा संस्कार आहे!


त्यामुळे आपल्याकडे चांगले बोलण्यासारखे काही नसेल आणि आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जात असेल, तर ते बोलणे टाळूया कारण शरीरावरच्या जखमा भरून येतात पण मनावरच्या जखमा कधीच भरून येत नाहीत!


pratibha.saraph@ gmail.com

Comments
Add Comment

प्रतिज्ञा

गोष्ट लहान, अर्थ महान : शिल्पा अष्टमकर मानवाच्या जीवनात प्रतिज्ञेला फार मोठे महत्त्व आहे. प्रतिज्ञा म्हणजे

शेजारधर्म

कथा : रमेश तांबे एक होता कावळा. तो एका झाडावर राहायचा. इकडे तिकडे फिरून खाणे मिळवायचा. त्या झाडावर एक चिमणीदेखील

महिना कसा होतो?

कथा : प्रा. देवबा पाटील सीता व नीता या दोन जुळ्या बहिणी होत्या. दिसायला जशा त्या हुबेहूब एकसारख्या म्हणजे जणूकाही

‘की’ ची करामत

खेळ खेळूया शब्दांचा शब्दांवर साऱ्यांची मालकी तीन अक्षरी शब्दांची ही ‘की’ची करामत बोलकी दाराची बहीण कोण तिला

संधिप्रकाश कसा पडतो?

सीता व नीता या दोघी जुळ्या बहिणी खूपच हुशार होत्या. त्यांच्याकडे सुट्टी असल्याने शहरातील त्याची प्राध्यापिका

राक्षस आणि राजू

कथा,रमेश तांबे राजूला गोष्टीची पुस्तकं वाचायचा खूपच नाद होता. राक्षस-परीच्या गोष्टी तर त्याला खूपच आवडायच्या.