क्राइम : अॅड. रिया करंजकर
मालमत्ता म्हटली, की तिथे वाद असणे हे निश्चित. प्रॉपर्टी कमवणारा स्वतःची तहान-भूक विसरून, मेहनत करून संपत्ती जमवतो आणि त्याच्यासाठी भांडणारे मात्र वेगळेच असतात. जो कष्ट करून हे मिळवतो त्याची किंमत शून्य ठरते आणि जे काही न करता हे मागत असतात ते मात्र स्वतःला खूप महान असल्यासारखे दाखवत असतात.
सरिता या वयोवृद्ध महिला. पती निधनानंतर स्वतःच्या हिमतीने त्यांनी नोकरी करून संपत्ती निर्माण केली होती. दोन मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी. चांगले सुशिक्षित करून त्यांना चांगली नोकरी मिळून त्यांनी त्यांची लग्नही करून दिली होती. मुलगी आपल्या संसारात रममाण होती. मुलगा आपल्या संसारात रममाण होता. सरिता या आपल्या मुलाकडेच राहत होत्या. सरिता यांनी नोकरी केली असल्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन ही सुरू झालेली होती. पेन्शनवर या वयात आपले औषधपाणी, डॉक्टरचा खर्च त्या भागवत होत्या, उगीच मुलांवर याचा भार नको. कारण मुलांनाही आपले संसार आहेत. त्यांनी कष्टामधून टू बीएचकेचा रूम घेतला होता. जिथे आपल्या मुलासोबत त्या राहत होत्या व गावाला काही जमीनही त्यांनी घेऊन ठेवली होती. सरिता स्वतः सर्व करत असल्यामुळे मुलगी मधू ही येऊन जाऊन हसत खेळत भावासोबत राहत होती आणि हळूहळू सरिता यांची तब्येत खालावत चालली म्हणून मुलाने म्हणजेच मधुकर यांनी डॉक्टरकडे आईला घेऊन जाण्याचे ठरवले. डॉक्टरकडे गेल्यानंतर सरिता यांना कॅन्सर झाल्याचं निदान झालं. हे समजल्यावर मधूच येणं कमी झालं. आईसाठी आपल्याला खर्च करावा लागेल असं कदाचित तिला वाटलं असावं. सरिता यांना लास्ट स्टेजचा कॅन्सर सांगितला होता कारण तो एवढे दिवस लक्षातच आला नव्हता. त्यामुळे मधुकरची हॉस्पिटल आणि घर अशी धावपळ होऊ लागली होती. सरिता आपल्या मुलीला चार दिवस माझ्यासोबत राहायला ये असं सांगत होती, तरी ती यायला मागत नव्हती आणि हळूहळू मधू प्रॉपर्टीचं काय, प्रॉपर्टीचे हिस्से कर असा तागादा आपल्या आईच्या मागे लावू लागली. आई बोलायला लागली हो, तुला मुलगी म्हणून मी देईन काहीतरी. एक दिवस मधू अचानक आईच्या घरी आली. मधुकर आईला हॉस्पिटलमधून नुकतंच घरी घेऊन आला होता आणि मधूने आल्याबरोबर मुंबईतील टू बीएचके घराचा विषय काढला. आई बोलली अगं हे घर भावासाठी असू दे. तुला मी माझ्याप्रमाणे काही रक्कम देते. पतीने गावच्या जमिनीबद्दलही विचारलं. मला गावच्या जमिनीचा हिस्सा पाहिजे आणि या घराची किंमत करोडोंच्या वरती असल्याने तिने सरळ आईला सांगितलं, की तू जिवंत असेपर्यंत हे घर विकून दोन हिस्से कर, तर सरिता आपल्या मुलीला बोलली जर मी आता हिस्से केले, हे घर विकले, तर मी कुठे राहायला जाऊ. मधुकर कुठे राहायला जाईल, तर मधूने सरळ उत्तर दिले, तुम्ही कुठे पण जा मला काय करायचंय. जे पैसे मिळतील त्याच्यात तुम्ही कुठेही घर घ्या आणि तिथे राहा. सरिता आपल्या मुलीला बोलली तुम्हाला दोघांनाही लहानाचे मोठे मी टू बीएचके फ्लॅटमध्ये केलं आता मधुकरची मुलं छोट्याशा रूममध्ये राहतील का आणि मी आजारी असल्यामुळे मी कुठे राहू. मधू बोलली माझा तुझ्या आजारपणाशी आणि तुमच्या येणाऱ्या अडचणींशी काही संबंध नाही. हे घर विका आणि लवकरात लवकर मला हिस्सा द्या. तू आणि मधुकर घरात राहा की घराच्या बाहेर राहा किंवा रस्त्यावर राहा, पण मला माझा हिस्सा तू जिवंत असेपर्यंत मिळाला पाहिजे. असं ती जोरजोरात आईबरोबर भांडू लागली आणि जोपर्यंत मला हिस्सा मिळणार नाही तोपर्यंत मी या घरातून बाहेर पडणार नाही. अशा प्रकारे ती आईशी वाद घालू लागली. मधूला आपल्या आईच्या तब्येतीचं काहीच पडलेलं नव्हतं ती सरळ बोलली, तुला कॅन्सर झालाय तू कधी ना कधी जाणार, पण आमच्या भावंडांमध्ये संपत्तीवरून वाद नको. त्यामुळे तू आहेस तोपर्यंत या संपत्तीची विल्हेवाट लाव. आई तिला बोलत होती मी जिवंत असताना जर ही संपत्ती विकली, तर मी राहणार कुठे? माझी तब्येत अशी आहे आणि मधुकरला स्वतःची नोकरी सांभाळून मला दवाखान्यात घेऊन जावे लागते त्याचा तरी विचार कर.
मधू एक दिवस आईच्या घरी थांबली आणि सतत भांडत होती, की घर विक आणि मला पैसे दे. आई बोलत होती की तुला मी चांगले शिक्षण दिलं तुझं लग्न लावून दिलं आणि तुलाही चांगलं राहण्यासाठी घर आहे, भावाला आणि मला रस्त्यावर का काढतेस, तर मधू सरळ बोलली मी जर आज मागितलं नाही तर तू गेल्यानंतर मला मधुकर काही देणार नाही. त्याच्यामुळे तू जिवंत असताना हे सर्व विक. एक दिवस पूर्ण मधू आपल्या आईबरोबर वाद घालत होती. या सर्व गोष्टीचा त्रास सरिताला झाला कारण आदल्या दिवशी ती हॉस्पिटलमधून आलेली होती आणि अचानक तिला अस्वस्थ होऊन ती जागेवरच कोसळली. कारण मधू वादच भयानक पद्धतीने घालत होती. तिला तातडीने दवाखान्यात घेऊन जाण्यात आलं आणि शेवटचे उद्गार सरिताने असे काढले, जर आज मधूने माझ्याशी भांडण केलं नसतं, तर कदाचित अजून चार दिवस मी जगू शकले असते असं म्हणून तिने तिथल्या तिथे आपला जीव सोडला.
आई गेल्यानंतर आपल्याला प्रॉपर्टी व्यवस्थित मिळणार नाही म्हणून आई जिवंत असताना मधू आईबरोबर वाद घालत होती. ज्या आईने कष्टाने एवढं साम्राज्य उभं केलं होतं त्या साम्राज्याने आज त्या आईचा शेवट झाला होता. ज्या गोष्टी समजूतदारपणे करता आल्या असत्या. त्याचं रूपांतर मधूने वादात केलं आणि ते सहन न झाल्यामुळे आज सरिताचा जीव गेला. आपली मुलगी या संपत्तीसाठी आपल्याला आणि मुलाला घराच्या बाहेर काढू इच्छिते. तिला माझ्या आजारपणाचं काहीच घेणं देणं नाही याच गोष्टीचा तिला सर्वात जास्त धक्का बसला आणि तिने आपला देह तिथेच ठेवला. संपत्तीसाठी लोक आपली नाती, माणुसकी विसरत चाललेले आहेत. गेलेला माणूस परत येत नाही बोललेले शब्द मात्र तिथेच राहतात.
सरिता आजारी होती म्हणून तिचं निधन झालं. ते कधी ना कधी होणारच होतं; परंतु मधूने जे वाद घातले आणि ज्या वादातून हा प्रसंग घडला तो एक गुन्हाच होता तिने आपल्या आईचा एक प्रकारे जीवच घेतला होता.
(सत्यघटनेवर आधारित)







