गोष्ट लहान, अर्थ महान : शिल्पा अष्टमकर
मानवाच्या जीवनात प्रतिज्ञेला फार मोठे महत्त्व आहे. प्रतिज्ञा म्हणजे स्वतःशी केलेले ठाम वचन. एखादे ध्येय साध्य करण्यासाठी मनाशी पक्की बांधिलकी निर्माण करणे म्हणजे प्रतिज्ञा होय. प्रतिज्ञा माणसाला योग्य दिशा देते आणि संकटांच्या काळात त्याला टिकून राहण्याची शक्ती देते.
जीवनात यश मिळवण्यासाठी केवळ स्वप्ने पाहणे पुरेसे नसते, तर त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी प्रतिज्ञेची गरज असते. प्रतिज्ञेमुळे माणसामध्ये आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटी निर्माण होते. अनेक अडचणी, अपयश आणि अडथळे येऊनही प्रतिज्ञा केलेला माणूस मागे vहटत नाही.
गोपाळराव आगरकर यांच्या जीवनातून प्रतिज्ञेचे महत्त्व स्पष्ट होते. गरिबी, हालअपेष्टा आणि अपमान सहन करूनही त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याची प्रतिज्ञा सोडली नाही. त्यांच्या दृढ निश्चयामुळेच ते मोठे शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत बनू शकले. यावरून असे लक्षात येते की, प्रतिज्ञा ही यशाची पहिली पायरी असते.
विद्यार्थी जीवनात प्रतिज्ञेला विशेष महत्त्व आहे. नियमित अभ्यास करणे, वेळेचे नियोजन करणे, शिस्त पाळणे आणि चांगला नागरिक बनण्याची प्रतिज्ञा प्रत्येक विद्यार्थ्याने केली पाहिजे. अशी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास मदत करते.प्रतिज्ञा ही केवळ शब्दांची माळ नसून ती कृतीत उतरवलेली भावना आहे. दृढ प्रतिज्ञा, सतत प्रयत्न आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करणे नक्कीच शक्य होते. गोपाळराव आगरकर यांची लहानपणी अधिक गरिबीची स्थिती होती. त्यामुळे त्यांना शाळेत जाता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी कंपाऊंडरची नोकरी धरली.
नोकरी करून शिकावे असे त्यांच्या मनात होते. त्याचवेळी त्यांच्या मामांनी त्यांना आपल्या घरी नेले आणि त्यांना शाळेत घातले. गोपाळ मोठ्या हौसेने इंग्रजी शिकू लागला. आपल्या मामीला तो घरकामात मदत करीत असे त्यामुळे त्याला शाळेत जाण्यासाठी उशीर होई. त्यावेळी त्यांच्या शाळेवर रावबहादूर महाजन हे मुख्याध्यापक होते. ते शिस्तप्रिय होते. मुलांनी उशिरा येणे त्यांना अजिबात आवडत नसे. एके दिवशी ते वर्गात शिकवीत असता गोपाळ उशिरा आलेला त्यांनी पाहिला. त्यांना खूप राग आला. ते रागातून म्हणाले, “शाळेत सुद्धा वेळेवर येता येत नाही. तुमच्या हातून पुढे काय होणार?” गोपाळला त्यांच्या या बोलण्याचा राग आला आणि तो म्हणाला, “तुमच्यासारखा एम. ए. होऊन दाखवीन तरच नावाचा आगरकर !”
केलेल्या प्रतिज्ञेची गोपाळला चांगलीच आठवण होती. हायस्कूलचे शिक्षण संपवून ते पुण्यात डेक्कन कॉलेजात गेले. बी. ए. च्या परीक्षेच्या वेळी त्यांच्याजवळ फी देण्यासाठी पैसे नव्हते. त्यासाठी त्यांनी एक नाटक लिहिले आणि ते विकून फीचे पैसे भरले. त्यांच्याकडे अंगात घालण्यासाठी एकच सदरा होता. रोज रात्री तो सदरा धुऊन वाळत घालावयाचा व तो सकाळी अंगात घालावयाचा, असा त्यांचा दिनक्रम असे. अशा रीतीने मोठ्या कष्टात दिवस काढून शेवटी ते एम.ए. झाले.
एम. ए. झाल्यानंतर मोठ्या पगाराच्या नोकरीची अपेक्षा न करता त्यांनी पुण्यात नव्याने निघालेल्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’ या शाळेत शिक्षकाची नोकरी धरली. नंतर त्याच सोसायटीने चालविलेल्या फर्ग्युसन कॉलेजचे ते प्राचार्य झाले. अशा रीतीने दृढ निश्चयाने, उच्च महत्त्वाकांक्षा बाळगून ते मोठ्या मानास चढले. तात्पर्य : ‘मी हे करू शकेन.’ असा शब्द अंतःकरणातून सहज आला म्हणजे माणसाची यशाकडे वाटचाल सुरू होते. अशा शब्दामागे माणसाचा आत्मविश्वास, जिद्द उभी असते.
विचार : दृढसंकल्प, प्रयत्न व कौशल्य एकत्र आले तर ध्येय साध्य करणे सहज शक्य असते.







