कथा : रमेश तांबे
एक होता कावळा. तो एका झाडावर राहायचा. इकडे तिकडे फिरून खाणे मिळवायचा. त्या झाडावर एक चिमणीदेखील राहात होती. तिचे एक छानसे घरटे होते. पण एकाच झाडावर राहूनदेखील कावळा चिमणीशी बोलत नव्हता. कावळा म्हणायचा, “काय ती चिमणी. केवढीशी दिसते, काय तिचा तो आवाज चिवचिव म्हणे!” जाता येता कावळा चिमणीला टोमणे मारायचा. बिचाऱ्या चिमणीला वाईट वाटायचं. कावळा आपल्याशी असं का वागतो? हेच तिला कळत नव्हतं. कावळ्याचं बोलणं ऐकून काही पक्षी कावळ्यालादेखील सांगायचे, “अरे का रे तिच्याशी वाईट वागतोस? का तिला त्रास देतोस? पक्षी म्हणायचे, “अरे त्या माणसांसारखा नकोस वागू. आपण पक्ष्यांनी शेजारधर्म पाळायलाच हवा.” पण कावळा काही ऐकत नव्हता. त्याचं चिमणीला त्रास देणं सुरूच होतं.
एके दिवशी सकाळीच कावळा अन्न शोधायला गेला. पण तो परत काही आलाच नाही. दुपार झाली, संध्याकाळ झाली, पण कावळा काही आलाच नाही. काही झाले तरी कावळा तिचा शेजारीच होता! चिमणीला खूप काळजी वाटू लागली. कावळा कुठल्या संकटात तर नाही ना सापडला! चिमणीच्या मनात विचारांचं वादळ माजलं होतं. मग चिमणी निघाली. उडता उडता तिला दिसला एक पोपट. चिमणी म्हणाली, “पोपटदादा, तुम्ही कावळेदादांना पाहिलं का कुठे?” चिमणीचे बोलणे ऐकून, पोपट म्हणाला, “तो तुझ्याशी बोलत नाही. तुला सारखे टोमणे मारत असतो. तरी तू त्याला का शोधते आहेस?” तेव्हा चिऊताई म्हणाली, “कावळेदादा आज सकाळीच बाहेर पडलेत. आता संध्याकाळ जवळ आली तरी कावळेदादा आले नाहीत. काळजी वाटते रे मला त्याची! अन् पोपटदादा, मी तर माझा फक्त शेजारधर्म पाळते आहे रे.” चिमणीचे बोलणे ऐकून पोपट म्हणाला, “चल चिऊताई आपण दोघे मिळून शोधू कावळ्याला!”
मग चिमणी अन् पोपट निघाले कावळ्याच्या शोधात. उडता उडता त्यांना दिसली साळुंकी. चिमणी म्हणाली, “साळुंकीताई आपण कावळेदादांना कुठे पाहिलेत का? सकाळपासून ते परत आलेच नाहीत बघ!” तशी साळुंकी म्हणाली, “चिऊताई कावळा तुझ्याशी नीट बोलत नाही, तुझ्या घरट्याची नासधूस करतो, मग का त्याला शोधतेस?” चिऊताई म्हणाली, “काही नाही गं, मी तर फक्त माझा शेजारधर्म पाळते आहे.” मग साळुंकीदेखील त्यांच्यासोबत निघाली कावळ्याच्या शोधात!
उडता उडता त्यांना दिसले कबुतर. चिऊताई म्हणाली, “कबुतरभाऊ आमचे कावळेदादा कुठे दिसले का तुम्हाला? अहो सकाळीच गेले ते अजून आलेच नाहीत झाडावर!” कबुतरालादेखील आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, “कावळा तर तुला रोज त्रास देतो. तुझी टिंगलटवाळी करतो. तरीदेखील तू त्याला शोधतेस! खरंच चिऊताई किती चांगल्या मनाची आहेस गं तू.” चिऊताई म्हणाली, “काही नाही रे कबुतरा, मी तर माझा शेजारधर्म पाळते.” मग पोपट, साळुंकी आणि कबुतर निघाले कावळ्याच्या शोधात.
शोधता शोधता चिमणीला दिसला कावळा. कावळेदादांचे पाय आणि पंख एका वेलीच्या जाळीत अडकले होते. चिऊताई ओरडली, “ते बघा कावळेदादा, ते बघा कावळेदादा!” सगळे गेले कावळ्याच्या जवळ. मग सगळ्यांनी चोचीने वेलीचे भराभर तुकडे केले आणि कावळ्याला मोकळे केले. कावळ्याने पोपटाचे आभार मानले. पोपट म्हणाला, “अरे कावळ्या चिऊताईचे आभार मान. सकाळपासून तू दिसला नाहीस म्हणून ती शोधायला बाहेर पडली आणि आम्हा सगळ्यांना घेऊन आली.” पण कावळ्याचे मन काही तयार होईना. मग कबुतर, साळुंकीदेखील तेच म्हणाली, “चिऊताई आम्हा सगळ्यांना घेऊन आली तुझा शोध घेण्यासाठी!” ती म्हणाली की, काही झालं तरी कावळेदादा माझे शेजारी आहेत. हे मी कशी विसरू. माझ्यासाठी शेजारधर्म हाच सर्वात मोठा धर्म आहे.”
चिमणीचे बोलणे ऐकून कावळ्याच्या डोळ्यांत पाणी आले. तो चिऊताईला म्हणाला, “चिऊताई मला माफ कर. मी माझा शेजारधर्म विसरलो होतो. तुला उगाच त्रास देत होतो. पण यापुढे आपण दोघे कायम एकत्र राहू अगदी आनंदाने. अशी दोस्ती करू की लोक आपली जोडीने आठवण काढतील. चिऊ काऊच्या गोष्टी आपल्या लहान मुलांना मोठ्या आनंदाने सांगतील.







