गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा ६ फेब्रुवारी रोजी चौथा स्मृतिदिन झाला. भारतातील जवळपास सर्व भाषांमध्ये लता मंगेशकर यांनी गाणी गायली. त्यांच्या सुमधुर आवाजामुळे आणि सुरेल स्वरांमुळे अनेकांनी त्यांना देवी सरस्वतीचा दर्जा दिला. आजही कुठूनही लतादीदींच्या गाण्याचा स्वर ऐकू आला, की समाधी लागल्याप्रमाणे आपण स्तब्ध होतो.
स्मरण : डॉ. अनिल कुलकर्णी
लता मंगेशकर यांच्या गाण्यांमधून प्रकटणारे भाव खूपच गहिरे आणि विविधरंगी आहेत. त्यांच्या गळ्यातील माधुर्यामुळे प्रत्येक गाणं हे एक जीवनानुभव बनतं. लतादीदींच्या आवाजात असलेली नाजूक गोडी प्रेमगीतांना वेगळीच उंची देते.
‘लग जा गले…’, ‘प्यार किया तो डरना क्या’ यामध्ये प्रेमातील कोमलता स्पष्ट जाणवते. त्यांच्या गाण्यातील विरहाची जाणीव अतिशय हृदयस्पर्शी आहे. ‘आज फिर जीने की तमन्ना है’मध्ये वेगळ्या प्रकारचं आत्मविश्वासपूर्ण विरहदर्शन तर ‘जाने क्या सोचकर’मध्ये वेदना आहे. भक्तिगीतांत लता मंगेशकरांचा आवाज एक दिव्य अनुभूती देतो. ‘पांडुरंग’, ‘जय जय राम कृष्ण हरी’ उत्सवी गाणी, झपाटून टाकणारी नृत्यगाणी सुद्धा त्यांनी तितक्याच ऊर्जेने गायली. उदा. ‘आजा रे परदेसी’, ‘दिल तो पागल है’ ‘ए मेरे वतन के लोगो’ या गाण्यातील कंठातून उमटलेला देशप्रेमाचा स्वर अजूनही मन हेलावून टाकतो.
लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा आत्मा म्हणजे भावनांची नाजूक छटा-प्रेम, विरह, भक्ती, आनंद किंवा देशप्रेम. प्रत्येक भावना त्यांच्या सुरेल आवाजातून श्रोत्यांच्या मनाला भिडते.लता मंगेशकर यांचं गाणं हे फक्त सुरावटींचं नव्हे तर भावविश्व उलगडणारं एक अविस्मरणीय अनुभवविश्व आहे. त्यांच्या स्वरातून उमटणारी लता म्हणजे भावनांचा दरवळ. प्रत्येक गाण्यातील शब्दांना त्यांनी इतकं प्राणप्रतिष्ठा दिलं की प्रेम, वेदना, आनंद, विरह या सगळ्या भावनांना त्यांचा आवाज स्पर्शून गेला. “लग जा गले”मधील कोमलता असो वा “ए मेरे वतन के लोगो”मधील देशभक्तीची ऊर्मी – दोन्ही ठिकाणी त्या समान ताकदीने भिडतात.
शुद्धता आणि साधेपणा त्यांचा गळा म्हणजे एक पारदर्शक झरा. तंत्राचा दिखावा न करता गाण्यातील भावना अगदी सहजतेने पोहोचवणे, ही त्यांची खरी ताकद. अनेक पिढ्यांची प्रेरणा – हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी… कित्येक भाषांमध्ये गायन करत त्यांनी संगीताला सीमोल्लंघन घडवून आणलं. आवाजातला कालातीतपणा. पाच दशकांहून अधिक काळ त्या गात राहिल्या, तरी त्यांचा स्वर नेहमीच ताजा, तरल राहिला. गाण्यातून उमगणारी लता म्हणजे फक्त एक गायिका नाही तर भारतीय संगीत संस्कृतीचा एक जिवंत श्वास. ज्यांच्या स्वराशिवाय आपलं सांगीतिक आकाश अपूर्णच राहील.
जीवनाच्या अनेक संचितांपैकी लताचं असणं हे एक संचित आहे. आपल्या अवतीभोवती अनेक समृद्ध व्यक्तिमत्त्वे असतात, स्वर असतात, त्यांच्यामुळे आपलं जीवन समृद्ध होत असतं. मोठ्या माणसांचं असणं डोक्यावर छत्र असतं. लतांची गाणी अनेकांच्या दृष्टीने मुदत ठेव आहेत, जिच्यामुळे त्यांचं आयुष्य सुखद आहे. सौंदर्य आणि स्वर आपल्या आवाक्यात जरी नसले तरी पाहण्यात व ऐकण्यात ते आपलेच असतात. लताच्या गाण्यामुळे अनेक गाण्यांना परिसस्पर्श लाभला. लता गाण्याला सोनं करणारं परिस आहे. प्रेमाला उपमा नाही तशी लताच्या गाण्याला
उपमा नाही.
लताचे स्वर ऐकल्यावर असं वाटतं, जीवनात ही घडी अशीच राहू दे. माणसे येतात आणि जातात पण स्वर मनात घर करतात. मनात घर करणाऱ्या गोष्टीच मनात तग धरतात. लता कुठे काय करते, लता फक्त आधार देते. लता केवळ आधारच देत नाही तर वेळू गगनावर नेते. काही सौंदर्यासाठी व काही स्वरासाठी सगळी विशेषणे थिटी पडतात, तिथे शब्दांच्या पलीकडे गेल्यानंतरच सौंदर्य आणि स्वर कळतात. काही गोष्टींची अनुभूती घ्यायची असते, काही गोष्टी फक्त जगायच्या असतात. लताचे स्वर या प्रकारात मोडतात. मोडक्या तोडक्या आणि भग्न आयुष्याला अर्थ प्राप्त करून दिला तो लतांच्या मधुर स्वर आणि गाण्यांनी. लतांच्या गाण्यांनी अनेकांना जगण्याची उमेद दिली आहे. माणसे रडल्याशिवाय मोकळी होत नाहीत. our sweetest songs are those that tells us the saddest thoughts.
मैफलमध्ये भाव खाते ती असते गझल. लताच्या गाण्याचंही असंच आहे. माणसे जाताना केवळ आठवण मागे ठेवून जात नाहीत, तर स्वर मागे ठेवून जातात, अस्तित्व मागे ठेवून जातात. माणसाला मरण असतं, स्वरांना मरण नसतं. आकाशातल्या तारका जशा मोजता येत नाही तसं लताच्या गाण्यांचं अस्तित्व मोजता येत नाही. आकाशातल्या नक्षत्रांचे देणं नुसतं अनुभवत राहावं तशा प्रकारे लतांच्या गाण्यांचा अनुभव नुसता घेत राहावा आणि यातच जीवनाची खरीखुरी इतिकर्तव्यता आहे. गाण्यात अर्थ असतो पण गाण्याला सुगंध असतो हे लताची गाणे ऐकल्यावर जाणवतं. अश्रूंची फुले करण्याची किमया लतांच्या गाण्यात आहे. आपलं संचित आपल्यालाच माहीत नसतं. आपलं संचित माहिती होण्यासाठी किंचित वेळ द्यावाच लागतो. लताचा काळजाला भिडणारा, हेलावून सोडणारा, अंतर्मुख करणारा, डोळ्यांतून अश्रू वाहायला लावणारा आवाज, हीच लताची शक्ती आहे. लता व्याख्येत न मावणारी स्वरसम्राज्ञी आहे. लता काहीजणांचे दैवत, अनेकांच्या भिंतीवरील फोटो प्रेम आहेत. मनाच्या चौकटीतील एक सुंदर चित्र आहेत. एकच गीत अनेक जण गातात, पण हसवायचे, रडवण्याचे सामर्थ्य काही जणांमध्ये असतं, त्यापैकी एक लता. लता असे चुंबक आहे, जिथे सर्व विशेषणे आपोआप चिकटतात.
गाणं अजरामर करणं लताकडून शिकायला हवं. ये मेरे वतन के लोगो ऐकल्यावर डोळ्यांत पाणी येते. पंडित नेहरूंच्या डोळ्यांत व आमच्या डोळ्यांत पाणी आणलं ते लतानीच. सुखामध्ये जीवनात ही घडी अशीच राहु दे असं वाटतं. हे क्षण असेच पकडून ठेवावेत, त्याला दृष्ट लागू नये असं आपल्याला वाटतं. उत्तुंग प्रतिभेच्या आविष्काराला साथ देणारा आवाज हवा. गीत आणि सूर हातात हात घालूनच जायला हवेत, तरंच मिले सुर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा हे शक्य आहे.
लतांनी प्रेमिकांच्या आयुष्यात बहार आणली आहे. लहान मुलांना नाचायला शिकवले. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, आई मी पावसात जाऊ कां? जन पळभर म्हणतील हाय हाय म्हणून, वृद्धांना संध्याछायेची आठवण करून दिली आहे. एक-दोन-तीन-चार या जावेदच्या मासिक बाराखडीच्या गाण्याला लतांनी रंगत आणली. काही गाणी लतांमुळे लक्षात राहतात. मोगरा फुलला, चाफा बोलेना, ही गाणी जणू तुमच्यासाठीच होती. आपली नक्कल करू नये, म्हणत लतानी सृजनाचा मार्ग मोकळा ठेवला आहे. अनेक लता आहेत, अनेक आशा आहेत, हवाय फक्त आधार. भीक मागणाऱ्या सुरांना जेव्हा आधार मिळतो, तेव्हा त्याला राजमान्यता मिळते, त्याचं सोनं होतं. अशा अनेक रानुमंडल आहेत.
कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया गेला बाबा हे खरंच ठरलंय. मंगेशकर घराण्याची लता, तिचा वेलू गगनाला भिडतोय. मंगेशकर घराण्याने सुरांचा उष:काल करत आशा पल्लवित केल्या आहेत.लताने आमच्या सर्वांच्या जीवन जगण्याच्या आशा पल्लवित केल्या आहेत.
लताच्या सुरमयी आवाजाने आमचे जीवन सुरमयी झाले आहे. सुखं म्हणजे नक्की काय असतं, लतांचं मधुर गाणं ऐकणं असतं.सूर तेची छेडीता, गीत उमटे लताचेच हे पदोपदी जाणवते. लताची गाणी मुदतीची ठेवं आहेत. सुरांचे व्याज देणारी, मानवी जीवन समृद्ध करणारी लताच्या मधुर, दर्दभऱ्या गाण्यांनी जीवनात आशा पल्लवित केल्या आहेत. अनेकांची दुःख सहन करण्याची प्रतिकारशक्ती वाढविली आहे. अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. अनेकांना जगण्याची उमेद दिली आहे. वास्तवाची जाण करून दिली आहे. लताच्या गाण्यांनी, अनेकांनी आपल्या प्रेमाची सुरुवात केली, आपलं प्रेम फुलविले, जीवन फुलवले, अनेक गाण्यांनी हसवले, रडवले, डोळे पाणावले आहेत. धीर दिलाय. असेच वास्तव एका गाण्यात सांगितले आहे, जे मला भावलं. डोळ्याच्या कडा ओलवणारं एक गीत. जन पळभर म्हणतील हाय हाय... मृत्यू हा प्रत्येकाला येणारच, तो अटळ आहे मग अशा मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टिकोन कवी भा. रा. तांबे यांच्या गीतांनी व लताच्या सुरांनी सुसह्य होतं. आपण मृत्यूला घाबरतो, पण काही गाणी आपल्याला जाणवून देतात की या जगात आपल्याला भोगाव्या लागणाऱ्या दुःख, यातना यापेक्षा मृत्यूच्या स्वाधीन का होऊ नये? मृत्यूनंतर नातेवाईक, मित्र पुन्हा आपल्या कामाला लागतात. जीवन क्षणभंगुर आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आजकाल तर मृत्युपश्चात दुसऱ्या दिवसापासून टीव्ही, मोबाईल, गप्पा, हसणं, खिदळणं सुरू होतं. जनपळभर म्हणतील हाय हाय. कोणतेच व्यवहार कोणा वाचून अडत नाही. जीवनाचे रहाटगाडगे चालूच राहते. सूर्य, चंद्र, तारे आपला प्रवास सुरू ठेवतील. पुन्हा आपल्या कामी लागतील. अशा जगास्तव काय कुढावे, मोही कुणाच्या का गुंतावे? शांतीत का जिरवू नये काया. इतक्या यातना, दुःख, या ढोंगी जगाकडून मिळतात. मृत्यूनंतरच शांती मिळते. जीवनात करू नये जास्त वांदे, कारण शेवटी आहेत फक्त चार खांदे. याची जाणीव माणसाला पाहिजे. जीवन आहे तोपर्यंतच भरभरून जगा, दुसऱ्यासाठी जगा, स्वतःसाठी जगा. मृत्यूचा विचार करण्यापासून परावृत्त व्हा. मृत्यू येणारच आहे, त्याला हसत स्वीकारा. मग या मृत्यूची भीती वाटत नाही. सध्या जे भेडसावतेय त्यापेक्षा मृत्यू निश्चित चांगला आहे. बुडते हे जग न देखवे डोळा. याचि देहा, याचि डोळा, लोकाकडून अवहेलना करून घेण्यापेक्षा मृत्यूला जवळ का करू नये. अशा सुखाचा दुःखाच्या जाणिवा लता मंगेशकरांनी आम्हाला करून दिल्या आहेेत. हे आम्ही कधीच विसरू शकणार नाही.
लता गेली नाही. लता आमच्यासाठी विसाव्याचे क्षण सोडून गेली. लता आमच्यासाठी सुखाचे क्षण सोडून गेली. लता अनेकांच्या जीवनाची शिदोरी आहे. विसाव्यातच आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलायचं असतं. सामान्य माणसांच्या जीवनात नक्षत्रांचे देणे लतामुळेच अवतरलं. लताने अनेकांना स्वप्ने दिली. सूर, संगीत, लय-ताल व लता यांनी मानवी जीवन समृद्ध केले आहे. आई जशी असताना पेक्षा नसतांना जास्त कळते तसेच लताचं आहे. मनातल्या भावना कागदावर केवळ उतरवून एवढंस पुरेसं नसतं. अर्थाच्या ओळीत भावना ओतल्याशिवाय त्या मनात घर करत नाहीत व गुणगुणाव्याही वाटत नाहीत. पिढ्याच्या पिढ्या लताच्या गाण्यावर पोसलेल्या आहेत. लता हे संगीतातलं परिमाण आहे व संगीताचा परिणामही आहे. लता आहे म्हणून अनेक गाण्यात ताल आहे.
अनेक गाणी लतासाठी लिहिलेली होती की काय असं आता प्रत्येक लताचं गाणं ऐकताना मनाची अवस्था होते. तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा म्हणत लता आमच्या बरोबर असणार आहे. लताने आयुष्य समृद्ध केले आहे. आमचं आयुष्य अजूनही व्यापणारी एकच गोष्ट म्हणजे लता. ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ याची सतत आठवण करून देणारी लता. आमचा प्रत्येक श्वास आमचं प्रत्येक गाणं लतामय आहे. गाण्यात जगणं हेच मध्यमवर्गीयांचे साम्राज्य आहे. ‘ऐ मेरे वतन के लोगो’ म्हणत रडवणारी लताच असते. देव आपल्या आवाक्यात नसतो, आपल्या पाहण्यात नसतो मग अशा वेळेस काही माणसांना आपण देवत्व बहाल करतो त्यापैकीच लता. गाण्यावर सुद्धा प्रेम करायचं असतं, गाण्याला सुद्धा खूप जपायचं असतं, गोंजारायचं असतं, आपल्या श्वासाची ऊब गाण्याला द्यायची असते. गाणं सुद्धा एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतरच त्याचा अर्थ अधिक मनाला भिडतो आणि हे लतानी केलं आहे. कवी गाणं लिहितो, गायक त्याच्या पुढची दालनं आपल्यासाठी खुली करतो. आमच्या क्षणांना जर कोणी सुखावलं असेल तर ते लतानीच. असंख्य समाधानाच्या हिंदोळ्यावर आम्ही झुललो असेल तर लताच्या गाण्यांवरच. आमचं भरणपोषण लताच्या गाण्यांनी झालं आहे व उर्वरित आयुष्य सुद्धा लताच्या गाण्यावर आम्ही आनंदाने काढणार आहोत. लताची गाणी असल्यामुळेच संध्याछाया भिववित नाहीत.
अभिजात शब्दाचा अर्थ आम्हाला लतांचा गाण्यांनी अधिक कळला. आमचा समृद्ध वारसा रक्तातूनच वाहत नाही, तर लताच्या गाण्यातूनही वाहतो. सर्वसामान्यांना गाता येत नाही. गाण्याच्या माध्यमातूनच सामान्य माणसे आपली स्वप्न पूर्ण करतात. गाणाऱ्याच्या जागी, अभिनय करणाऱ्याच्या जागी स्वतःला कल्पूनच अनेक जणांनी आत्मविश्वास कमावला. शब्दांना शिस्त लावावी लागते. शब्दांना वळन लावावे लागते. शब्दांना अंकित ठेवावे लागते. शब्दांना श्वास रोखून धरायला शिकवावे लागते तेव्हा कुठे सूर निघतात. गुरू समोर नतमस्तक व्हायला होते तसे लता समोर शब्दही नतमस्तक होतात. लता आमच्या अस्तित्वाचा आरसा आहे. लता आमचा वारसा आहे. वारसा जपल्याने आयुष्य समृद्ध होतं. आम्हाला अभिमान आहे लता आमचा वारसा आहे, आमचा आरसा आहे.