Saturday, February 7, 2026

महिना कसा होतो?

महिना कसा होतो?

कथा : प्रा. देवबा पाटील

सीता व नीता या दोन जुळ्या बहिणी होत्या. दिसायला जशा त्या हुबेहूब एकसारख्या म्हणजे जणूकाही एकमेकींची कार्बन कॉपी होत्या. तशाच त्या बुद्धीनेही सारख्याच तल्लख होत्या. त्यांच्या घरी त्यांची प्राध्यापिका मावशी आलेली होती. या तिला रोज सायंकाळी तिच्याजवळ बसून विविध प्रश्न विचारून आपली ज्ञानाची भूक भागवून घेत होत्या. त्या दिवशी त्या तिघीजणी गच्चीवर गप्पा मारायला गेल्या. “महिना कसा होतो गं मावशी?” सीताने मध्येच प्रश्न केला. मावशी म्हणाली, “चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यास जितके दिवस लागतात त्या कालावधीला महिना म्हणतात.” “चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा मारण्यास ३० दिवस लागतात. म्हणून आपला महिना ३० दिवसांचा असतो.” “काही महिन्यांचे दिवस ३०, तर काहींचे ३१ का असतात?”नीताने विचारले.

“तसेच पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात म्हणून आपले वर्ष हे ३६५ दिवसांचे असते. हे ३६५ दिवस बरोबर १२ महिन्यांत बसवण्यासाठी काही महिन्यांचे दिवस ३०, तर काहींचे दिवस ३१ असतात व फेब्रुवारी महिन्याचे २८ दिवस असतात.” मावशीने उत्तर दिले.

“मावशी अधिक मास म्हणजे कोणता महिना असतो?” दोघींनीही एकसुरात विचारले. मावशी सांगू लागली, “खगोलशास्त्रज्ञ व गणिततज्ञ असलेल्या आपल्या प्राचीन ज्ञानी ऋषिमुनींनी पृथ्वी, ग्रहगोल व सूर्य यांच्या गतीप्रमाणे होणारे क्रमबद्ध बदल शोधलेत. त्यावरून आपली कालगणना तयार केली. अशी आपली कालगणना ही खगोलीय आहे. आपली पृथ्वी स्वत:च्या आसाभोवती फिरते. पृथ्वीच्या त्या स्वभोवतीच्या भ्रमणाला जो कालावधी लागतो तो म्हणजेच एक दिवस असतो. त्यालाच एक सौरदिवस किंवा वार असेही म्हणतात. त्यावेळी चंद्रही स्वत:च्या आसाभोवती फिरत असतो. त्याला स्वत:भोवती फिरण्याला जो कालावधी लागतो त्याला सावन दिवस किंवा तिथी म्हणतात. या दोन्हींच्या वेळात साधारणत: २१ मिनिटांचा फरक पडतो. चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या भ्रमणामुळे महिना म्हणजे मास तयार होतो. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे आयन, वर्षे व ऋतू होतात.”

मावशी पुढे सांगू लागली, “चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करण्यास जो कालावधी लागतो त्याला चांद्रमास म्हणतात. चंद्राला पृथ्वीभोवतीच्या एका प्रदक्षिणेसाठी ३० ऐवजी खरे तर २९ दिवस, १२ तास म्हणजे साडेएकोणतीस दिवस लागतात. म्हणजे चंद्राला पृथ्वीभोवती अशा १२ प्रदक्षिणा पूर्ण करायला ३५४ दिवस लागतात. त्यास चांद्रमास वर्ष असे म्हणतात. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास एक वर्ष (म्हणजे ३६५ दिवस, ५ तास, ४८ मिनिटे, ४७।। सेकंद) लागतात. त्याला सौरमास वर्ष किंवा संवत्सर म्हणतात. म्हणजे दरवर्षी चांद्रमास वर्ष आणि सौरमास वर्ष यांमध्ये ११ दिवसांचे अंतर पडते. हे अंतर जास्त वाढू न देता ते जुळवण्यासाठी साडेबत्तीस महिन्यांनी एक चांद्रमास अधिक धरतात म्हणजेच प्रत्येक तिस­ऱ्या वर्षी एक महिना वाढवून घेतात. त्यालाच अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात. अधिक मासामुळे पूर्ण एक महिना वाढत असल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना ही म्हण पडली.” मावशीने सविस्तर समजाऊन सांगितले.

अशी तिघी मायलेकींची संध्याकाळच्या वेळी चर्चा छान रंगली असताना अंधाराने आपले काळोखी जास्तच गडद केली. त्यांना आज आधीच गच्चीवर येण्यास उशीर झाला होता. त्यामुळे त्यांना आपली चर्चा आटोपती घ्यावी लागली. सतरंजी उचलून त्या तिघीही गच्चीवरून खाली आल्या.

Comments
Add Comment