मुंबई : टी-२० विश्वचषकातील एका अत्यंत चुरशीच्या सामन्यात इंग्लंडने नेपाळचा ४ धावांनी पराभव केला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात नेपाळने १८५ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडला घाम फुटला होता, मात्र अनुभवाच्या जोरावर इंग्लंडने बाजी मारली. शेवटच्या षटकात १० धावा करण्याचे आव्हान नेपाळसमोर होते. लोकेश बाम विरुद्ध सॅम करन अशा लढाईत अनुभवी सॅम करनने बाजी मारली. लोकेश बामने २० चेंडूत ३९ धावांची झुंजार खेळी केली. इंग्लंडने दिलेल्या १८४ धावांचा पाठलाग करताना नेपाळचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर होता. तर सॅम करनने सगळा अनुभव पणाला लावत शेवटच्या षटकात चौकार किंवा षटकार जाऊ दिला नाही.
नेपाळने आसिफ शेखला झटपट गमावले. त्यानंतर कुशल भुर्टेल आणि रोहित पौडेल यांनी वेगवान भागीदारी केली. भुर्टेल १७ चेंडूत २९ धावांची खेळी करून बाद झाला. यानंतर रोहितला देवेंद्र सिंग एरीची साथ मिळाली. ३४ चेंडूत ३९ धावांची खेळी करून रोहित बाद झाला. नंतर देवेंद्रने सूत्रे हाती घेतली. २९ धावांत ६ चौकार आणि एका षटकारांसह ४४ धावांची खेळी केली. धावगतीचे आव्हान वाढत असताना लोकेश बामने चौकार, षटकारांची पखरण करत सामना नेपाळच्या बाजूने फिरवला. जोफ्रा आर्चरच्या चौथ्या षटकात नेपाळने २२ धावा चोपून काढल्या.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने जेकब बेथेल आणि कर्णधार हॅरी ब्रूक यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर १८४ धावांची मजल मारली. भरवशाचा अनुभवी जोस बटलर २६ धावा करून तंबूत परतला. फिल सॉल्ट झटपट बाद झाला. टॉम बॅन्टनचा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न अंगलट आला. ब्रूक आणि बेथेल यांनी चांगली भागीदारी केली. बेथेलने ३५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५५ धावांची खेळी केली.
बेथेल बाद झाल्यानंतर ब्रूकने सूत्रं हाती घेतली. नेपाळने नियमित अंतरात विकेट्स घेतल्या. विल जॅक्सने १८ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारासह नाबाद ३९ धावांची खेळी केली. ब्रूकने ३२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली. नेपाळतर्फे दिपेंद्र सिंग एरी आणि नंदन यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. १८ चेंडूत ३९ धावांची खेळी करणाऱ्या विल जॅक्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
लियाम डॉसनची फिरकी ठरली निर्णायक
इंग्लंडच्या विजयात फिरकीपटू लियाम डॉसन चमकला. त्याने ४ षटकांत केवळ २१ धावा देत २ महत्त्वाचे बळी टिपले आणि नेपाळच्या धावगतीला लगाम घातला. त्याला विल जॅक्स आणि सॅम करन यांनी प्रत्येकी १ बळी घेत चांगली साथ दिली.







