जीवनगंध : पूनम राणे
रामपूर नावाचे गाव होते. तुरळक लोकवस्ती असलेले. घरं एकमेकांना लागून नव्हती. घराच्या मध्यभागी विकास विद्यालय नावाची शाळा होती. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत. एकंदर पहिली ते दहावीची विद्यार्थी संख्या १०० होती. विद्यार्थ्यांची प्रार्थना मोकळ्या मैदानात होत असे. विद्यार्थी संख्या कमी असली तरी विविध उपक्रम या शाळेत घेतले जायचे. पालक वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात या शाळेला मिळत असे. आजूबाजूला घरे असल्याने व मुलांचा लळा लागल्याने काही पाळीव प्राणी बऱ्याच वेळेला वर्गात यायचे. शांतपणे वर्गाच्या दारात, विद्यार्थ्यांच्या पायात घुटमळत बसायचे. शाळेच्या परिसरात फुलांची लागवड केली होती.
खेडेगावातच शाळा असल्याने शाळेच्या मैदानात आंबा, चिकू, फणस, नारळ यांची मोठमोठी झाडे वाढली होती. आळीपाळीने वर्गातील विद्यार्थी त्या बागेतील झाडांना पाणी घालण्याचे काम करत होते. नमिताने यावर्षी शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात नवीन प्रवेश घेतला होता. नमिता अत्यंत हुशार, नम्र, शांत, मनमिळाऊ मुलगी होती. ती सर्वांशी आपुलकीने आणि आदराने वागत असे. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी तिने सर्वांची मने जिंकून घेतली होती. तिच्याचसारख्या हुशार असणाऱ्या काव्यासोबत तिची मैत्री जमली होती. दोघींची सर्व बाबतीत आवड एकसारखी होती. काव्या गणितामध्ये हुशार होती, तर नमिता इंग्रजीमध्ये हुशार होती. नमिताचा आवाज गोड होता.
कोणतीही गोष्ट समजली नसेल, तर दोघीही एकमेकांना समजून सांगत असत. त्यामुळे अवघड विषय दोघींनाही सोपे जात होते. पीटीच्या तासाला एके दिवशी काव्या नमिताला म्हणाली ,‘चल, तुला मी मनीचे झाड दाखवते. नमिताला काहीच समजले नाही. ती म्हणाली,’ काय मनीचे झाड! हे काय असते. अगं, गुलाबाचे झाड, सोनचाफ्याचे झाड, पारिजातकाचे झाड असू शकते. पण माऊचे झाड! ‘तू तर गंमतच करतेस.’
काव्या म्हणाली, अगं गंमत नाही, खरं तेच सांगते. ‘हो, हो माऊचे झाड!’ त्याचं काय झालं, ‘आमच्या शाळेमध्ये पांढऱ्याशुभ्र रंगाची, घाऱ्या डोळ्यांची एक लक्षवेधी माऊ येत असे. कधी कधी शेपूट हलवत विद्यार्थ्यांच्या बेंचच्या खाली घुटमळत असे. विशेषत: ही माऊ मला फार आवडत असे. घरून मी तिच्यासाठी रोज दूध आणत असे. ती माझी नेहमी शाळेच्या दारात वाट पाहत राहायची. माझ्या पायामध्ये घुटमळायची. ती माझी मैत्रीण झाली होती.
वर्गात तास चालू असताना एका जागी शांत बसून राहायची. पण एके दिवशी काय झालं कुणास ठाऊक! तिच्या शरीरावर जखम झाली. ती जखम बरीच होईना आणि अचानक एके दिवशी ती बेंचखाली निपचित पडली होती. काहीही हालचाल नव्हती. मला फार दुःख झाले. धावतच जाऊन आम्ही पाटील सरांना सांगितले.
सर्वच विद्यार्थ्यांना दुःख झाले होते. माऊ आम्हाला सोडून गेली होती. सरांनी मुलांची समजूत काढली व म्हणाले, ‘माऊ आपल्याबरोबर कायम राहावी असे वाटत असेल, तर आपण तिला एक खड्डा करून शाळेच्या बागेत पुरून त्यावर एक झाड लावूया.’ पाटील सरांच्या सांगण्यानुसार बागेमध्ये एक खड्डा करून माऊला पुरण्यात आले. माऊ ज्या दिवशी गेली त्या दिवशी शाळेतील एकाही विद्यार्थ्याने दुपारचे जेवण घेतले नाही. माऊ सर्व विद्यार्थ्यांना जीव लावून गेली होती. काव्यालाही नमिताला सांगताना रडू आवरत नव्हते.
पाटील सरांनी माऊला ज्या खड्ड्यात पुरले होते त्या खड्ड्यात सोनचाफ्याचे झाड लावले. त्यानंतर आम्ही त्या झाडाला सगळेजण ‘माऊचे झाड’ म्हणू लागलो.चल, तुला दाखवते आज ते झाड खूप मोठे झाले आहे आणि त्याला सुंदर सोनचाफ्याची फुले येत आहेत. सुगंध दरवळत आहे. आम्हाला माऊची आठवण आली की, आम्ही या झाडाखाली येऊन बसतो. माऊसोबत घालवलेले क्षण डोळ्यांसमोर येतात आणि या झाडाखाली मनीला भेटल्याचा आनंद होतो. म्हणून रोजच आळीपाळीने आम्ही या झाडाला पाणी घालतो. नमिताला फार उत्सुकता लागली होती. बोलता बोलता माऊचे झाड आले. त्या झाडावर माऊस्मृती असे लिहिले होते. काव्याने माऊच्या झाडाला घट्ट मिठी मारली.
तात्पर्य : भूतदया ही महत्त्वाची असते.