Saturday, February 7, 2026

छकडा मोडणे व तृणावर्ताचा उद्धार

छकडा मोडणे व तृणावर्ताचा उद्धार

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे

बालकृष्णाच्या लीला व कृष्ण कथा जेवढ्या ऐकाव्या तेवढ्या गोडच वाटतात. तसेच त्या पुन्हा पुन्हा ऐकाव्या अशा वाटतात. श्रीमद्भागवतात या बाललीलांचे सुरेख वर्णन आहे. पूतनाचा उद्धार, यमलार्जूनाचा उद्धार, बगळ्याच्या रूपात आलेल्या बकासुराचा वध अशा अनेक लीला करून त्यांनी ग्रामवासीयांना अचंबित करून टाकले होते. अशाच प्रकारच्या एका लिलेत त्यांनी छकड्याची मोडतोड केली, तसेच तृणावर्त नावाच्या राक्षसाचा उद्धार केला.

एके दिवशी नंद घरी एक उत्सव सुरू होता. घरात लहान-थोर मंडळी जमली होती. बालकृष्णाला स्नान घालून यशोदा मातेने त्याला झोप आली असे वाटून एका छकड्याखाली झोपविले व आलेल्या गोपगोपिकांचे स्वागत करण्यात गुंग झाली. थोड्याच वेळात बालकृष्ण जागा होऊन दुधासाठी रडू लागला; परंतु पाहुण्यांच्या स्वागतात गुंग असल्याने यशोदेचे तिकडे लक्ष गेले नाही. तेव्हा कृष्ण हातपाय झाडू लागले. त्यांचे पाय छकड्याला लागताच छकड्यांची मोडतोड झाली. तसेच त्याची चाकेही निखळून पडली. तांडा तुटल्याचा आवाज ऐकून उत्सवासाठी आलेल्या सर्व स्त्रिया, गोप, गोपी, यशोदा, नंद वगैरे सर्वच घाबरून गेले. बालकृष्णाला ईजा झाली असावी अशा भीतीने सर्वजण धावतच बालकष्णा जवळ पोहोचले. बालकृष्णाला सुखरूप पाहून सर्वांना हायसे वाटले. मात्र छकडा अचानक कसा काय तुटला याचे सर्वांना आश्चर्य वाटले. तेथे असलेल्या लहान मुलांनी बालकृष्णाचे पाय लागल्याने छकडा तुटला असे सांगितले. मात्र लहान मुले काहीही बडबड करतात असे समजून सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

तृणावर्ताचा उद्धार

एके दिवशी यशोदा माता बालकृष्णाला मांडीवर घेऊन बसली होती. अचानक तिला त्याचे वजन जड वाटू लागले. भार असह्य झाला तेव्हा बालकृष्णाला खाली ठेवून यशोदा आपल्या गृहकार्याकडे गेली. त्याचवेळी कंसाने बालकृष्णाला मारण्यासाठी पाठविलेला तृणावर्त नावाचा असूर भयानक वादळाच्या रूपात आला. वादळाचा जोर एवढा होता की स्वतःलही सांभाळणे सर्वांना जड होऊ लागले. सर्वजण आश्रयासाठी अन्यत्र्य धावू लागले. वादळरूपी तृणावर्त बालकृष्णाला उचलून उडून गेला. संपूर्ण गोकुळ धुळीने झाकून गेले. कोणाला धुळीशिवाय काहीही दिसत नव्हते. यशोदा कृष्णाला आणण्यासाठी गेली. मात्र बालकृष्णाला तेथे न पाहून अत्यंत शोक करू लागली. तिचे रडणे ऐकून अन्य गोपीही तेथे आल्या.

कृष्णाला घेऊन तृणावर्त उडाला, पण हळूहळू बालकृष्णाचे वजन वाढू लागून ते एखाद्या भव्य शीलाखंडा एवढे झाले. हे वजन पेलणे तृणावर्ताला कठीण होऊ लागले, त्यामुळे त्याचा वेग कमी झाला. बालकृष्णांनी त्याच्या गळ्याला घट्ट मिठी मारल्याने प्रयत्न करूनही त्याला ती सोडविता येत नव्हती. त्यामुळे तो कासावीस झाला व थोड्याच वेळात दम कोंडून मरण पावला. मृत तृणावर्त आकाशातून जमिनीवर एका दगडावर आपटून त्याचे अवयव छिन्नविछिन्न झाले. पूर्ण वादळ शमले होते. यशोदेसह गोपगोपींना एका आडदंड राक्षसाच्या छातीवर गळ्याला मिठी मारून लटकलेला बालकृष्ण पाहून आश्चर्य वाटले. बालकृष्णाला जिवंत पाहून सर्वांना आनंद झाला.

Comments
Add Comment