अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू


मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, दृष्यमानता अत्यंत कमी असतानाही विमान लँड करण्याचा निर्णय नेमका कुणी घेतला, हा प्रश्न तपास यंत्रणांच्या केंद्रस्थानी आला आहे. धावपट्टी स्पष्टपणे दिसत नसतानाही लँडिंग करण्याचा धोका का पत्करण्यात आला, हा निर्णय वैमानिकाने स्वतः घेतला की त्यांना तसे आदेश देण्यात आले होते, याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) यांच्या पथकांनी आता अपघाताच्या आधी झालेल्या दुसऱ्या लँडिंग प्रयत्नावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तपास यंत्रणा प्रामुख्याने चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर देत आहेत. अपघाताच्या वेळी बारामती विमानतळ परिसरात दाट धुके होते आणि दृश्यमानता केवळ ३ हजार मीटर होती. अशा परिस्थितीत लँडिंगचा निर्णय का घेण्यात आला, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे वैमानिकाला लँडिंगसाठी ‘क्लिअरन्स’ देण्यात आले होते का, की नियंत्रण प्रणालीत काही तांत्रिक गोंधळ झाला होता. तिसऱ्या मुद्द्यांतर्गत अप्रोच आणि लँडिंगदरम्यान इंजिन किंवा नियंत्रण प्रणालीत अचानक काही बिघाड झाला का, याची तपासणी सुरू आहे. चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुसऱ्या प्रयत्नात विमानाचा लँडिंग अँगल चुकला का, ज्यामुळे विमान धावपट्टीऐवजी बाजूला जाऊन कोसळले, यावर तपास केंद्रीत करण्यात आला आहे.


तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रयत्नात दृश्यमानता कमी असल्याने वैमानिकाने ‘गो-अराउंड’ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात धावपट्टी स्पष्टपणे दिसत नसतानाही लँडिंग करण्याचा धोका का पत्करण्यात आला, हा निर्णय वैमानिकाने स्वतः घेतला की त्यांना तसे आदेश देण्यात आले होते, याचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, या अपघातप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. अजित पवार यांच्या बारामती दौऱ्याचे नियोजन कोणी केले होते, तसेच दौऱ्याच्या आदल्या दिवशी नेमक्या कोणत्या चर्चा झाल्या होत्या, या दृष्टीने सीआयडीकडून त्यांच्या खासगी सचिवांची चौकशी सुरू आहे. अजित पवार यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची चार तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. या चौकशीत २८ जानेवारीच्या बारामती दौऱ्याचे नियोजन, प्रवासाचे तपशील, २७ जानेवारी रात्री झालेल्या चर्चा आणि इतर संबंधित बाबींविषयी माहिती घेण्यात आली.



तांत्रिक तपास तीन टप्प्यांत


या विमान अपघाताचा तांत्रिक तपास तीन टप्प्यांत केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात विमानाचा वेग, उंची, इंजिनचे तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल आणि वैमानिकांमधील संभाषण यासारख्या तांत्रिक माहितीचे संकलन केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून त्यांचे सखोल विश्लेषण करण्यात येणार आहे. विमान जमिनीवर आदळल्यानंतर बाहेरील संरचनेवर नेमका काय परिणाम झाला, आग कधी आणि कशी लागली, यासंदर्भातील माहिती मिळवली जाणार आहे.



घातपाताचा संशय


दरम्यान, बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी विमान जमिनीला टेकण्याआधीच स्फोट झाल्याचा दावा करत, या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये विमान हवेत असतानाच स्फोट झाल्याचे दिसत असून, त्यामुळे बॉम्बस्फोटाचा संशय नाकारता येत नाही.



लँडिंगचा अँगल चुकला?


- अपघातानंतर दहा दिवस उलटून गेले तरी अजित पवार यांचे विमान नेमके कसे कोसळले, याचे ठोस उत्तर अद्याप मिळालेले नाही. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून (एएआयबी) सुरू असलेल्या प्राथमिक तपासात केवळ तांत्रिक बिघाडामुळेच अपघात झाला नसावा, अशी निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. प्राथमिक अहवालानुसार लँडिंगचा अँगल चुकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, लँडिंगच्या वेळी नियंत्रण प्रणालीत अचानक बिघाड झाल्याने विमानाची दिशा बदलली असावी, असेही नमूद करण्यात आले आहे.


- हा अहवाल प्राथमिक स्वरूपाचा असून, अंतिम निष्कर्षासाठी ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधील डेटाचे सविस्तर विश्लेषण केले जाणार आहे. तांत्रिक बिघाड नेमका कोणत्या क्षणी सुरू झाला आणि वैमानिकांचे शेवटचे संभाषण काय होते, यावरून अपघाताची कारणे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण तपास प्रक्रियेला १० ते १२ महिने लागू शकतात. डीजीसीएने या प्रकरणासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली असून, ती आपला प्राथमिक अहवाल १५ फेब्रुवारीपर्यंत सादर करणार आहे. तसेच अजित पवार यांना विमान पुरवणाऱ्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीचे विशेष ऑडिट करण्याचे आदेशही डीजीसीएने दिले आहेत.

Comments
Add Comment

Chembur Accident : चेंबूरमध्ये भीषण अपघात; बांधकामाच्या ८व्या मजल्यावरून ६ कामगार खाली पडले

मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष नगर भागात सुरू असलेल्या एका निर्माणाधीन

Vijay Rashmika : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रश्मिका-विजयने दिली 'गुड न्यूज'; चाहत्यांना सुखद धक्का!

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना अखेर विवाहबंधनात अडकले

मार्चच्या 'या' तारखेपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा

मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन

1 March Rules Change : १ मार्चपासून बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित 'हे' नियम; रेल्वे तिकीट बुकिंग पासून ते LPG सुद्धा...

येत्या १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन

मुंबईत ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ?

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप- शिवसेनेची मंजुरी मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना