मुंबई : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू आहे. मतदानाला सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.
'मतदान करा, लोकशाही मजबूत करा... राज्यात आज सर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक सन-२०२६ च्या पार्श्वभूमीवर विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आणि आपल्या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनीच मतदान करने अत्यंत आवश्यक आहे... आज दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ वार शनिवार रोजी जि.प. व पंचायत समिती साठी सर्वत्र मतदान होत आहे, प्रत्येक नागरिकाने आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावला पाहिजे... मतदान करा व आपली लोकशाही मजबूत करा... मतदानाची वेळ :- सकाळी ०७:३० ते सायं ०५:३० वाजेपर्यंत...'
अशी पोस्ट करून मंत्री नितेश राणे यांनी नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या ७३१ आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी मतदान सुरू आहे. रिंगणात असलेल्या एकूण ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य राज्यातील तब्बल २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार ठरवणार आहेत. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत मतदारांचा कल कोणाकडे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, 'सर्व मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा,' असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.






