मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार, ७ फेब्रुवारी) महापालिका राजकारणात मोठी आणि निर्णायक घडामोड घडली. शहराच्या नेतृत्वाच्या शिखरावर कोण विराजमान होणार, याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले असतानाच प्रभाग १३२ च्या नगरसेविका आणि भाजप महिला मोर्चा संयोजिका रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. तर उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
भारतीय विद्यार्थी सेना ते उपमहापौर:
मुंबईच नवीन उपमहापौर संजय घाडी हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकेकाळचे जवळचे सहकारी, मित्र होते. भारतीय विद्यार्थी सेनेपासून ते राज ठाकरे यांच्यासोबत होते. राज ठाकरेंनी २००७ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, त्यावेळी ते मनसेमध्ये होते. त्यांनी मनसेकडून निवडणूकही लढवली होती. पण नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले. तिथून नगरसेवक बनले. संजय घाडी यांची पत्नी संजना घाडी सुद्धा नगरसेविका होत्या. मागच्यावर्षी एप्रिल महिन्यात संजय आणि संजना घाडी या दोघांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मागच्या महिन्यात संजय घाडी पुन्हा वॉर्ड क्रमांक ५ मधून नगरसेवक म्हणून निवडून आले. आता त्यांच्यावर मुंबईच्या उपमहापौर पदाची जबाबदारी असेल.
रितू तावडे यांचा परिचय:
रितू तावडे या घाटकोपर पूर्व मधील प्रभाग १३२मधून निवडून आल्या आहेत. सन २०१२ मध्ये प्रथम निवडून आल्यांनतर शिक्षण समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. आक्रमक आणि अभ्यासू असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. नगरसेवक काळात दुकानांबाहेर महिलांचे कपडे प्रदर्शित केले जाणारे पुतळे अर्थात मॅनीक्विन हटवण्याची जोरदार मागणी त्यांनी आपल्या नगरसेवक काळात केली होती, तसेच सध्या मुंबई भाजपाच्या महिला संयोजिका
संजय घाडी यांचा परिचय:
संजय घाडी हे मागाठने विधानसभेतील नगरसेवक म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. पूर्वी शिवसेना आणि त्या नंतर मनसेमध्ये आणि पुन्हा उबाठा शिवसेना आणि तिथून पुन्हा शिवसेना असा त्यांचा प्रवास आहे. मागील काळात त्यांनी स्थायी समिती सदस्यत्व भूषवले होते.






