Saturday, February 7, 2026

Anand Paranjape: रामदास कदम आपण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर अभद्र टिप्पणी करू नये;जशास तसे उत्तर देऊ -आनंद परांजपे

Anand Paranjape: रामदास कदम आपण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर अभद्र टिप्पणी करू नये;जशास तसे उत्तर देऊ -आनंद परांजपे

ठाणे: उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा अजितदादा पवार यांनी घ्यावी हा राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय होता परंतु शिवसेनेचे नेते रामदास कदम आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबाबत जी अभद्र टिप्पणी करत आहेत. आम्ही देखील रामदास कदम तुम्हाला त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विधिमंडळात आपल्यावर केलेले आरोप आणि तुमच्या कुटुंबांचे असलेले डान्सबार याबाबत आम्हाला बोलायला लावू नका.आम्ही नेहमी राष्ट्रवादी युती म्हणून पालन केले आहे. सुनील तटकरे यांनी देखील युतीधर्माचे पालन केले आहे. रामदास कदम आपण कुठलीही अभद्र टिप्पणी करू नये नाहीतर जशास तसे उत्तर देऊ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतली आणि पक्ष एनडीएमध्ये सामील झाला त्यामुळे ज्यांना विलीनीकरणाची घाई लागली आहे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही आनंद परांजपे यांनी केली आहे.

दरम्यान वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल असे सांगतानाच जितेंद्र आव्हाड यांनी काय भूमिका घ्यावी याबाबत शरद पवार गटाचा निर्णय असेल असेही आनंद परांजपे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले.

आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.आमचे दैवत अजितदादा पवार आमच्यातून निघून गेल्याने आम्ही दुःखात आहोत.दुःखातून आम्ही सावरलेलो नाही. त्यामुळे राज्यसभेत जाण्यासाठी योग्य वेळी पक्ष नेतृत्व निर्णय घेईल असेही आनंद परांजपे म्हणाले.

दादांच्या अपघाताची सीआयडीमार्फत चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावली असून ही संपूर्ण माहिती महाराष्ट्रासमोर येण्याची गरज आहे. खासदार बजरंग सोनावणे यांच्या मनात संशय असेल तर त्यांनी केंद्रीय मिनिस्टर ऑफ सिव्हिलिएशन यांची भेट घ्यावी.जबाबदार व्यक्तीने बेजबाबदार वक्तव्य करू नये असा टोला लगावतानाच केंद्र आणि महाराष्ट्रामार्फत चौकशी सुरू आहे याची आठवण आनंद परांजपे यांनी करुन दिली.

सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे अशी सर्वांची भावना आहे. योग्य प्रक्रिया पूर्ण करून जबाबदारी घ्यावी अशा प्रकारची विनंती आम्ही सर्व नेते करणार आहोत. राष्ट्रीय अध्यक्ष कोण व्हावा पक्षातील नेत्यांचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अधिकार आहे त्यामुळे आमचा पक्ष अंतिम निर्णय घेईल असेही आनंद परांजपे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता बसण्याचा जनाधार ठाण्यातील जनतेने आम्हाला दिला आहे. आम्ही कोकणभवन येथे गट निर्माण केला असून येणाऱ्या काळात महानगरपालिकेत पुढे कसे जायचे हा निर्णय गटनेते म्हणून नजिब मुल्ला हे आपल्या पातळीवर घेतील असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.

कुठल्या मंत्र्याला कुठले खाते द्यावे हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो याची चर्चा राष्ट्रवादी पक्ष मुख्यमंत्र्याशी करणार आहे मात्र संजय राऊत यांनी यामध्ये नाक खूपसण्याची काही गरज नाही असा सबुरीचा सल्लाही आनंद परांजपे यांनी दिला.

Comments
Add Comment