मुंबईकरांचा रेल्वे प्रवास सुखकर होणार का?

मुंबईकरांचा प्रवास आरामदायी, गर्दीमुक्त आणि सुरक्षित होण्यासाठी मेट्रोच्या धर्तीवर २३८ वातानुकूलित लोकल सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी केली. तसेच प्रवाशांच्या गर्दीचे विभाजन होऊन रेल्वेची क्षमता वाढावी यासाठी, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डबा लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचे नियोजन सुरू आहे.


अल्पेश म्हात्रे


सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सुमारे ३,२०० हून अधिक लोकल धावतात. प्रवाशांना गर्दीमुक्त आणि अद्ययावत प्रवास सुविधा देण्यासाठी २३८ वातानुकूलित लोकल चालवण्यात येणार आहेत. या नवीन वातानुकूलित लोकलमध्ये आरामदायी आसन व्यवस्था, आधुनिक रचना, ऑक्सिजन नियंत्रक व्यवस्था या करण्यात येणार आहेत. तसेच मुंबई महानगरातील रेल्वे प्रवाशांसाठी १६ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. हे प्रकल्प टप्प्याटप्प्याने केले जात आहेत, मेट्रोच्या धर्तीवर नव्या रचनेची लोकल तयार केली जाणार आहे. लोकलमध्ये ऑक्सिजन नियंत्रक प्रणाली सुरू करून, प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल. गर्दी, उष्णता आणि प्रवासातील त्रास कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि भारतीय रेल्वे यांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने या लोकल सेवेत येतील. वातानुकूलित लोकलमुळे खासगी वाहनांचा वापर कमी होऊन पर्यावरणपूरक प्रवासाला चालना मिळेल. मुंबई लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाते. २३८ वातानुकूलित लोकल चालवण्यास सुरुवात केल्यास मुंबईकरांसाठी दिलासादायक ठरणार आहे. तसेच प्रवाशांचा दर्जा उंचावणार. नवीन वातानुकूलित लोकल चालवण्यास सुरुवात केल्यास एकूण प्रवाशांच्या ६० टक्के प्रवाशांचा प्रवास सुखर होण्याची अपेक्षा आहे. उपनगरीय लोकलमधून दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वे आणि एमआरव्हीसीमार्फत अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत.


मुंबई उपनगरीय रेल्वेवर मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प (एमयूटीपी)अंतर्गत विविध पायाभूत सेवा-सुविधा निर्माण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने १९९९ मध्ये मुंबई रेल्वे विकास महामंडळाची (एमआरव्हीसी) स्थापना केली. नवीन लोकल, रेल्वे मार्ग उभारणे, रेल्वे स्थानकांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी एमआरव्हीसीवर सोपविण्यात आली. यासाठी केंद्र सरकार ५० टक्के आणि राज्य सरकार ५० टक्के निधी उपलब्ध करून देत आहे. या निधीतून पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय विभागात विविध कामे पूर्ण करण्यात आली, तर काही कामे प्रगतिपथावर आहेत. एमआरव्हीसीने हाती घेतलेले प्रकल्प राबविण्यात अनेक अडचणी येत असल्याने ते निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात अडथळे येत आहे. यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून लोकलमधून प्रवास करावा लागतो. स्थापनेनंतर मुंबईकरांचा रेल्वे प्रवास सुखकर करण्यासाठी एमआरव्हीसीने एमयूटीपी १ योजना तयार केली. या योजनेत नवीन लोकल, नवीन मार्गिका, रेल्वे रुळाशेजारी बॅरिकेट लावणे असे विविध प्रस्ताव तयार केले. एमयूटीपी १ टप्प्याला २००३-०४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली. या टप्प्यात कुर्ला-ठाणे पाचवी-सहावी मार्गिका, बोरिवली-विरार तिसरी आणि चौथी मार्गिका, ९ डब्याच्या १०१ नवीन लोकल, प्रकल्पात बाधित होणाऱ्या १५ हजार ८५७ नागरिकांचे पुनर्वसन, पश्चिम-मध्य रेल्वे मार्गावर १२ डब्यांच्या लोकल सुरू करण्यात आल्या. एमयूटीपीचा पहिला टप्पा मार्च २०१२ मध्ये पूर्ण करण्यात आला. यामुळे रेल्वेची प्रवासी वाहतूक क्षमता ३६ टक्क्यांनी वाढली. हे प्रकल्प मार्गी लागतानाच एमआरव्हीसीच्या एमयूटीपी २ टप्प्याला २००८-९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पातील योजनांसाठी ८ हजार ८७ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. या टप्प्यातील मुंबई सेंट्रल-बोरिवली सहावी मार्गिका, सीएसएमटी कुर्ला दरम्यानच्या पाचवी-सहावी मार्गिकेचे काम प्रगतिपथावर आहे. तर ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिका आणि अंधेरी ते गोरेगाव दरम्यान हार्बर मार्ग विस्तार करण्याचे काम पूर्ण झाले. ऐरोली-कळवा उन्नत मार्ग २०२१-२२ मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. विरार-डहाणू रोड मार्गिकेचे चौपदरीकरणाचे काम २०२२-२३ मध्ये पूर्ण होणार होते. मात्र ही कामे सध्या प्रगतिपथावर आहेत.


एमयूटीपी ३ ए टप्प्यात हार्बर मार्गिकेचा विस्तार गोरेगाव बोरिवलीपर्यंत करण्यात येणार आहे. बोरिवली-विरार दरम्यान पाचवी-सहावी मार्गिका, कल्याण-आसनगाव दरम्यान चौथी मार्गिका, कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका, तर लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय लोकलसाठी कल्याण यार्डची कामे प्रगतिपथावर आहेत. तसेच १९१ वातानुकूलित रेक उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यात येणार आहेत. या सर्व कामांसाठी तब्बल ३३ हजार ६९० रुपये खर्च अपेक्षित आहे. एमयूटीपी २ अंतर्गत मध्य रेल्वेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–कुर्ला पाचवा व सहावा मार्ग प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ८९१ कोटी रुपये आहे. एमयूटीपी ३ अंतर्गत पनवेल– कर्जत उपनगरीय कॉरिडॉर प्रकल्प अंदाजे २ हजार ७८२ कोटी रुपये खर्चाचा आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले होते. मात्र हा प्रकल्पही पूर्ण होण्यास काही महिने वाट पाहावी लागणार आहे. एमयूटीपी ३ अ अंतर्गत मध्य रेल्वेमार्फत कल्याण-आसनगाव ४था मार्ग प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे. एमयूटीपी २ अंतर्गत मुंबई सेंट्रल–बोरिवली सहावा मार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला. या प्रकल्पासाठी ९१९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पातील कांदिवली–बोरिवली दरम्यानचे काम प्रगतिपथावर आहे. एमयूटीपी ३ अ अंतर्गत गोरेगाव–बोरिवली हार्बर लाइन विस्तार प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प ८९८ कोटी खर्चाचा असून सध्या या प्रकल्पासाठी भूमी संपादनाचे काम प्रगतिपथावर आहे. गोरेगाव-मालाड दरम्यान मार्च २०२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, तर मालाड-बोरिवली विभागात डिसेंबर २०२८ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. विरार-डहाणू तिसरा व चौथा मार्ग प्रकल्प डिसेंबर २०२६ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र हे उद्दिष्ट वेळीच पूर्ण झाले तरच प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल व अपघातांना आळा बसेल.

Comments
Add Comment

रेल्वेसाठी १४ हजार कोटींची तरतूद

मराठवाडा व कर्नाटकला जोडणारा नांदेड बिदर या रेल्वे मार्गासाठी महाराष्ट्राने आपला वाटा राज्याच्या

खट्टा-मिठा अर्थसंकल्प

या वर्षीचा अर्थसंकल्प ना फार सकारात्मक आहे, ना फार नकारात्मक. अपेक्षा आणि वास्तव यांची सरमिसळ असलेला हा

नाशिक पालिकेत दीर्घकाळानंतर लोकप्रतिनिधींची राजवट

नाशिक महानगरपालिकेच्या आगामी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली रणनीती स्पष्ट केली

अमेरिका - क्युबातील शत्रुत्व

ट्रम्प यांनी क्युबाला ‘करार करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा’ असा इशारा दिला आहे. अमेरिका आणि क्युबा यांच्यात

पुण्याच्या राजकारणाचे अजितदादांनंतरचे संक्रमण

पुण्याच्या राजकारणात पालकमंत्रीपदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिल्हा नियोजन समिती, विकास निधीचे वाटप,

ग्रीनलँडकडे नजर फक्त खनिजांसाठी?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा वैश्विक आर्थिक मंचावर बदलली असली आणि त्यांचे स्वर थोडे नरम झाले