Friday, February 6, 2026

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. ७) मतदान होत असून जिल्हा परिषदेच्या ७३१ ; तर आणि पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण ७ हजार ४३८ इतके उमेदवार निवडणूक रिंगणात असून सर्व मिळून एकूण २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ इतकी मतदार संख्या आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी पुरेशा पोलिस बंदोबस्ताचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा १३ जानेवारी २०२६ रोजी केली होती. त्यानुसार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार होते; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाल्यानंतर मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार आता उद्या (ता. ७) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. त्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

एकूण जागा आणि उमेदवार

सर्व बारा जिल्हा परिषदांच्या एकूण ७३१ जागा असून, त्यातील ३६९ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 83, अनुसूचित जमातींसाठी २५ आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी १९१ जागा आरक्षित आहेत. जिल्हा परिषदांच्या या सर्व जागांसाठी एकूण 2 हजार ६२४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

सर्व १२५ पंचायत समित्या मिळून एकूण १ हजार ४६२ जागा असून, त्यातील ७३१ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 166, अनुसूचित जमातींसाठी ३८ आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी ३४२ जागा आरक्षित आहेत. पंचायत समित्यांच्या या सर्व जागांसाठी एकूण ४ हजार ८१४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

मतदार आणि मनुष्यबळ

निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदांच्या व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या एकूण मतदारांमध्ये १ कोटी ६ लाख ३३ हजार २६९ पुरुष, १ कोटी १ लाख ८६ हजार ९६५ महिला; तर ४६८ इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी एकूण २५ हजार ४७१ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी सुमारे १ लाख २८ हजार इतक्या मनुष्यबळाची व्यवस्था केली आहे. त्यात सुमारे १२५ निवडणूक निर्णय अधिकारी आणि १२५ सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

ईव्हीएमची व्यवस्था

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीच्या २५ हजार ४७१ मतदान केंद्रांची संख्या लक्षात घेऊन पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात ५१ हजार ५३७ कंट्रोल युनिट आणि १ लाख १० हजार ३२९ बॅलेट युनिटचा समावेश आहे. त्यासाठी सर्व सबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षणदेखील देण्यात आले आहे.

दोन मते देणे अपेक्षित

जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका नेहमी एकाच वेळी घेण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक मतदाराला एक मत जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागासाठी आणि एक मत पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी द्यावे लागते. जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी (गट) मतदान यंत्रावर म्हणजे बॅलेट युनिटवर पांढऱ्या रंगाची; तर पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी बीयूवर गुलाबी रंगाची मतपत्रिका असते. उमेदवारांची संख्या कमी असल्यास एकाच बीयूवर या दोन्ही मतपत्रिका असतात; परंतु उमेदवारांची संख्या अधिक असल्यास आवश्यकतेनुसार एकापेक्षा जास्त बीयूचा वापर केला जातो.

मतदारांचे नाव शोधण्याची सुविधा

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. ते ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येईल. त्यात मतदाराचे ‘संपूर्ण नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येईल. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यावरही मोबाईल ॲपप्रमाणेच मतदार यादीतील आपले नाव शोधता येईल.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी

मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तान्ह्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया आदींना मतदानासाठी प्राधान्य दिले जाईल.अशा मतदारांसाठी मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था असेल. त्याचबरोबर व्हिलचेअरचीही व्यवस्था केली जाईल; तसेच मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. सर्व मतदान केंद्रांमध्ये किमान सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

चौकट मतदान नक्की करा

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. ७) मतदान होत आहे. या निवडणुका म्हणजे आपले गाव व परिसराचे भवितव्य ठरविणाऱ्या असतात. म्हणूनच या निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने मतदान करून आपणही आपल्या गाव व परिसराच्या उन्नतीत मोलाचे योगदान देऊ शकतो. त्याचबरोबर या निवडणुकांच्या माध्यमातून आपण लोकशाहीचा पाया बळकट करण्यातही हातभार लाऊ शकतो. त्यामुळे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये मतदान करून आपण मतदानाचा आपला बहुमोल हक्क बजवायलाच हवा, त्यासाठी आपण नक्की मतदान करावे, असे मी सर्व संबंधित मतदार बंधू- भगिनींना नम्रपणे आवाहन करतो. -दिनेश वाघमारे, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र

Comments
Add Comment