Friday, February 6, 2026

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस पाडत ऐतिहासिक कामगिरी केली. हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी तब्बल ४१२ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. भारताच्या या डावाचा मुख्य नायक ठरला तो युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी, ज्याने आपल्या बॅटने विश्वविक्रमी शतकी खेळी साकारली.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला. सलामीवीर ॲरॉन जॉर्ज (९) स्वस्तात बाद झाल्यानंतर डावाची सूत्रे वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी आपल्या हाती घेतली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १४२ धावांची जबरदस्त भागीदारी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना हतबल केले.

वैभव सूर्यवंशीने केवळ वेगाने धावाच केल्या नाहीत, तर युवा क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. आयुष म्हात्रेने कर्णधाराला साजेशी खेळी करत ५१ चेंडूत ५३ धावा केल्या, ज्यात ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. आयुष १९ व्या षटकात बाद झाला, पण तोपर्यंत भारताने मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता.

भारतीय फलंदाजांच्या तुफान फटकेबाजीमुळे इंग्लंडला आता हा सामना जिंकण्यासाठी ४१२ धावांची गरज आहे. जर इंग्लंडने हे लक्ष्य गाठले, तर तो एक नवा जागतिक विक्रम ठरेल. मात्र, भारताची आक्रमक गोलंदाजी पाहता इंग्लंडला रोखून विश्वविजेतेपदावर नाव कोरण्याचे आव्हान भारतासमोर आहे.

त्यानंतर वैभवला वेदांत त्रिवेदीचीही साथ मिळाली. वैभवने ५५ चेंडूत शतक पूर्ण केले. त्यानंतर मात्र तो अत्यंत आक्रमक खेळू लागला. त्याने ७१ चेंडूतच दीडशतक पूर्ण केले होते. तो द्विशतकाच्या दिशेने वाटचाल करत होता. मात्र २६ व्या षटकात त्याला मॅनी लम्लडेनने थॉमस यूच्या हातून झेलबाद केले. वैभवने १५ चौकार आणि १५ षटकारांसह ८० चेंडूत १७५ धावांची खेळी केली. ही अंतिम सामन्यातील सर्वात मोठी खेळी आहे. तो बाद झाल्यानंतर वेदांत त्रिवेदी आणि उपकर्णधार विहान मल्होत्रा यांच्यातही ५१ धावांची भागीदारी झाली. मात्र विहान ३६ चेंडूत ३० धावा करून जेम्ल मिन्टोच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर वेदांतही ३२ धावांवर मिन्टोच्याच गोलंदाजीवर बाद झाला. तरी नंतर अभिग्यान कुंडूने आक्रमक ३१ चेंडूत ४० धावांची खेळी केली. आरएस आंब्रिशने १८ धावांची खेळी केली. खिलान पटेल ३ आणि हेनिल पटेल ५ धावांवर बाद झाले. पण कनिष्क चौहानने शेवटच्या षटकात आक्रमक फलंदाजी करत भारताला ४०० धावांचा टप्पा पार करून दिला.

भारताने ५० षटकात ९ बाद ४११ धावा केल्या. कनिष्क चौहान २० चेंडूत ३७ धावांवर नाबाद राहिला.

इंग्लंडकडून गोलंदाजी करताना जेम्स मिन्टोने ३ विकेट्स घेतल्या. सेबास्टियन मॉर्गन आणि ऍलेक्स ग्रीन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मॅनी लम्सडेनने १ विकेट घेतली. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडला ४१२ धावांचा टप्पा पूर्ण करायचा होता.

१५ षटकार, १५ चौकार; ८० चेंडूत १७५ धावा

भारत आणि इंग्लंडच्या यांच्यात सुरू असलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने तुफानी आघाडी घेतली.सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने तुफान फटकेबाजी करत दीडशतकी खेळी केली. त्याने ८० चेंडूत १७५ धावांची खेळी साकारली. त्याच्या खेळीत १५ चौकार आणि १५ षटकार होते.वैभवने ५५ चेंडूत शतक पूर्ण केले. त्यासोबतच १९ वर्षांखालील विश्वचषक अंतिम सामन्यात वैभवने सर्वात जलद शतक ठोकले. तर संपूर्ण स्पर्धेत त्याचे दुसरे सर्वात जलद शतक ठरले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा