मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाती निधनानंतर सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, याबाबत सुरू असलेले राजकारण तात्काळ थांबवावे, असा इशारा त्यांनी दिला आहे. हा वाद निरर्थक, चुकीचा आणि खालच्या पातळीचा असल्याचे सांगत, सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंना त्यांनी खडेबोल सुनावले.
अजित पवार यांच्या निधनानंतर काही घटकांकडून विविध तर्कवितर्क मांडले जात असून, या दु:खद घटनेतून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. जनतेत लोकप्रिय असलेले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अचानक आपल्यातून निघून गेल्यानंतर अशा प्रकारचे राजकारण करणे अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जण या घटनेला स्वतःच्या राजकीय चष्म्यातून पाहण्याचा प्रयत्न करत असून, ही मानसिकता धोकादायक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुंबईहून बारामतीकडे प्रचारसभेसाठी रवाना झाले असताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या घटनेनंतर काही तासांतच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने नव्या चर्चांना तोंड फुटले. मात्र, या सर्व घडामोडींना अनावश्यक राजकीय रंग देणे अयोग्य असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. अशा दु:खद प्रसंगी संयम राखणे, संवेदनशीलता दाखवणे आणि कुटुंबीयांच्या भावनांचा आदर करणे हीच अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
'महिंद्रा'ची १५ हजार कोटींची गुंतवणूक
विदर्भाला औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या १५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे स्वागत केले. ‘अॅडव्हांटेज विदर्भ’ कार्यक्रमात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा करण्यात आली असून, नागपूरमध्ये १ हजार ५०० एकर क्षेत्रावर देशातील सर्वात मोठा एकात्मिक वाहन आणि ट्रॅक्टर उत्पादन प्रकल्प उभारला जाणार आहे. तसेच, संभाजीनगर येथे १५० एकरांवर सप्लायर पार्क विकसित करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर दरवर्षी ५ लाखांहून अधिक वाहनांचे आणि १ लाख ट्रॅक्टरचे उत्पादन होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या गुंतवणुकीमुळे रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा आणि प्रादेशिक विकासाला गती मिळेल तसेच वाहनउद्योग, शेती उपकरणे, तंत्रज्ञान आणि सप्लाय चेन क्षेत्राला चालना मिळेल. महाराष्ट्राला उत्पादन क्षेत्रात अग्रस्थानावर नेण्याच्या दृष्टीने ही गुंतवणूक महत्त्वाची ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.






