Thursday, March 5, 2026

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात मुंबई पुष्पोत्सवाचा शुभारंभ

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात मुंबई पुष्पोत्सवाचा शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई पुष्पोत्सवाप्रमाणेच येत्या काळात पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही पुष्पोत्सव सुरू करण्यात येणार आहे,अशी घोषणा करतानाच महापालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी या पुष्पोत्सवातून प्रेरणा घेवून नागरिकांनीही आपल्या घरात फुलझाडे लावावीत, असे आवाहन केले.

मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथे मुंबई पुष्पोत्सव भरविण्यात आला आहे. यंदाचा हा २९ वा पुष्पोत्सव आहे. यंदाच्या पुष्पोत्सवात फुलांनी सजविलेले संगीत क्षेत्रातील वाद्य अशी संकल्पना साकारण्यात आली आहे. रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीतून बासरी, तबला, वीणा, सतार, मृदुंग, गिटार, पेटी, टाळ, सनई, तुतारी, सॅक्सोफोन यासारखी संगीत वाद्ये साकारली आहेत.

विविधरंगी फुलांनी साकारलेल्या संगीत क्षेत्रातील वाद्यांच्या प्रतिकृती… शोभेच्या खड्यांनी साकारलेले गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे चित्र…फुलांनी सजविलेले फुलपाखरू…बहरलेली फुलझाडे…आश्चर्यचकीत करणारी बोन्साय वनस्पती…झेंडू, गुलाब, मोगरा आदींसह मनमोहून टाकणारी सुगंधी फुलांची सजावट…औषधी वनस्पती…वेली, भाजीपाला, मसाल्याची रोपे… आणि या सर्वांसाठी खते, कुंड्या आदींनी सजलेल्या यंदाच्या मुंबई पुष्पोत्सवाचा शुक्रवारी ६ फेब्रुवारी २०२६ शुभारंभ झाला.

मुंबई पुष्पोत्सव ६ फेब्रुवारी ते रविवार ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुला आहे.मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे तसेच उप आयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी व विविध मान्यवर उपस्थित होते.

शुभारंभ सोहळ्यानंतर आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि मुंबईकरांनी प्रदर्शनाला भेट दिली. फुलांनी सजविलेले संगीत क्षेत्रातील वाद्यांची मांडणी पाहून महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी उद्यान विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. सजावटीसाठी परिश्रम घेणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना फुलांची कुंडी भेट देण्यात आली.

बागेसाठी लागणाऱ्या वस्तुंचे, खतांचेही प्रदर्शन पुष्पोत्सवात मांडले आहे. यासोबतच वेगवेगळ्या बोन्साय प्रजाती, औषधी वनस्पतीही प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. पुष्पोत्सवात बागकामाचे साहित्य, कीटकनाशके, फवारणी यंत्रे, खते आदीच्या विक्रीसाठी दालने आहेत. पहिल्याच दिवशी पुष्पोत्सव पाहण्यासाठी गर्दी उसळल्याची माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

Comments

Anil J Bobade    February 8, 2026 10:10 AM

Very beautiful exhibition

Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >