Friday, February 6, 2026

Mayor Election 2026: राज्यातील ९ महानगरपालिकांना मिळाले महापौर

Mayor Election 2026: राज्यातील ९ महानगरपालिकांना मिळाले महापौर

- भाजपची सरशी; मुंबईचा प्रथम नागरिक कोण हे उद्या स्पष्ट होणार

मुंबई: राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत भाजप-महायुतीने स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र दिसून आले. जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर, नाशिक आणि अहिल्यानगर या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये महापौर निवडी पूर्ण झाल्या असून काही ठिकाणी चुरशीच्या वाटणाऱ्या लढती अखेर बिनविरोध झाल्या, तर काही ठिकाणी भाजपने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेना आणि एमआयएमच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने कोंड्याल यांचा मार्ग मोकळा झाला. जळगाव महानगरपालिकेत भाजपच्या दीपमाला काळे यांची महापौरपदी निवड झाली असून शिवसेनेच्या मनोज चौधरी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. दीपमाला काळे यांनी जळगाव महापालिकेच्या १७व्या महापौर म्हणून पदभार स्वीकारला.

नागपूर महानगरपालिकेत भाजपच्या नीता ठाकरे यांनी १०४ मते मिळवत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. तर धुळे महानगरपालिकेत तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत भाजपच्या मायादेवी परदेशी यांनी ५० मते मिळवून महापौरपदावर विजय मिळवला. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेच्या संयुक्त उमेदवाराला केवळ १३ मते मिळाली. दुसरीकडे, नांदेड महानगरपालिकेत प्रथमच भाजपचा महापौर निवडून आला आहे. ८१ पैकी ४५ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असून महापौरपदासाठी कविता मुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. उपमहापौरपदासाठी दिपकसिंह रावत यांची निवड निश्चित झाली आहे.

कोणत्या शहरात कोणाचा महापौर?

- सोलापूरमध्ये महापौरपदी विनायक कोंड्याल (भाजप) यांची निवड झाली असून उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू आहे. जळगावमध्ये दीपमाला काळे (भाजप) महापौर तर मनोज चौधरी (शिवसेना) उपमहापौर, अहिल्यानगरमध्ये ज्योती गाडे (राष्ट्रवादी-एपी) महापौर तर धनंजय जाधव (भाजप) उपमहापौर, नागपूरमध्ये नीता ठाकरे (भाजप) महापौर असून उपमहापौरपदी लीला हाथीबेड यांची निवड झाली आहे. - धुळ्यात मायादेवी परदेशी (भाजप) महापौर आणि ज्योत्स्ना पाटील उपमहापौर, नाशिकमध्ये हीमगौरी आडके (भाजप) महापौर तर विलास शिंदे (शिवसेना) उपमहापौर, छत्रपती संभाजीनगरमध्ये समीर राजूरकर (भाजप) महापौर आणि राजेंद्र जंजाळ (शिवसेना-शिंदे) उपमहापौर पदी निवड झाली आहे. - पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे रवी लांडगे, तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर (भाजप) यांची निवड झाली आहे. कोल्हापुरात रुपाराणी निकम (भाजप) महापौरपदी विराजमान झाल्या आहेत.

मुंबईचा चेहरा उद्या ठरणार

- मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून पंधरा दिवसांहून अधिक कालावधी उलटला असून आता महापौर आणि उपमहापौर पदासाठीची प्रक्रिया निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. यंदाचे महापौरपद महिलेसाठी आरक्षित असल्याने मुंबईचा प्रथम नागरिक कोण होणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी) नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. - महापालिकेत भाजप आणि शिवसेनेकडे संख्याबळ अधिक असल्याने या दोन्ही पदांवर महायुतीचेच उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध होऊ न देण्याचा निर्णय उबाठा गटाने घेतल्याने लढत रंगण्याची चिन्हे आहेत. महायुतीतील सत्तासमीकरणानुसार मुंबई महापालिकेत भाजपकडे महापौरपद, तर शिवसेनेकडे उपमहापौरपद दिले जाणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

नवी मुंबईत नाट्यमय घडामोडी

- नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या सुजाता पाटील, तर उपमहापौरपदी दशरथ भगत यांची बिनविरोध निवड झाली आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट राजकीय लढत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. शिवसेनेच्या वतीने दोन्ही पदांसाठी उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची ठरणार असल्याचे संकेत मिळाले होते. भाजपकडे स्पष्ट बहुमत असतानाही ही लढत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. - मात्र निवडणुकीच्या आधीच नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेनेकडून महापौरपदासाठी दाखल करण्यात आलेला नामांकन अर्ज मागे घेण्यात आल्याने भाजपच्या उमेदवार सुजाता पाटील यांची बिनविरोध महापौरपदी निवड झाली. त्यानंतर उपमहापौरपदासाठीही शिवसेनेने नामांकन अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे दशरथ भगत हे बिनविरोध उपमहापौर म्हणून निवडून आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >