Friday, February 6, 2026

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार आहे. येत्या एप्रिल महिन्यात राज्यातील ७ राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत असून, विधानसभेतील नव्या संख्याबळानुसार महायुतीचे पारडे जड झाले आहे. भाजपचे सर्वाधिक १३७ आमदार निवडून आल्याने भाजपच्या वाट्याला ४ जागा, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे. यापूर्वी महाविकास आघाडीच्या ताब्यात असलेल्या ३ जागा आता महायुतीच्या खात्यात जाण्याची चिन्हे आहेत. मविआतील प्रमुख पक्षांचे संख्याबळ कमी झाल्याने त्यांना ७ पैकी केवळ १ जागेवर समाधान मानावे लागू शकते. विशेष म्हणजे, कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही समावेश असल्याने, त्यांच्या जागेवर आता कोणाची वर्णी लागते किंवा मविआ आपली एकमेव जागा कोणाला देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभेसाठी आवश्यक असलेला ३७.५ मतांचा कोटा पूर्ण करणे हे विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

शरद पवारांसह कोणाकोणाचा समावेश ?

राज्यातील एकूण १९ जागांपैकी ७ जागांचा कार्यकाळ येत्या २ एप्रिल रोजी संपणार आहे. यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीतील अनेक बड्या चेहऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या फौजिया खान या निवृत्त होत आहेत. ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचाही कार्यकाळ याच दिवशी पूर्ण होणार असून, काँग्रेसच्या रजनी पाटील यांचीही मुदत संपत आहे. दुसरीकडे, महायुतीमधील केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि भाजपचे धैर्यशील पाटील यांचीही खासदारकी २ एप्रिल रोजी संपणार आहे. विधानसभा निवडणुकीतील बदललेल्या संख्याबळामुळे या रिक्त होणाऱ्या जागांवर आता कोणाची वर्णी लागते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सध्याच्या गणितानुसार, महायुतीला यातील बहुतांश जागांवर विजय मिळवणे सोपे असले तरी मविआ आपली एकमेव जागा राखण्यासाठी कोणाला रिंगणात उतरवते, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >