Thursday, February 26, 2026

मुलतानी बेकरीच्या मालकाने उचलेले टोकाचे पाऊल; सोलापुरात खळबळ

मुलतानी बेकरीच्या मालकाने उचलेले टोकाचे पाऊल; सोलापुरात खळबळ

सोलापूर: सोलापुरात एकेकाळी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे मालक सुनील मोतीलाल सदारंगानी यांनी अपार्टमेंटच्या 17 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. सोलापूर शहरातील विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंटमध्ये गुरुवारी दुपारी एक वाजता ही घटना घडली आहे. या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सदारंगानी हे गुरुवारी दुपारच्या सुमारास स्वतःच्या चारचाकी वाहनातून विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंटमध्ये आले होते. गाडी अपार्टमेंटच्या आवारात उभी करून ते पायऱ्यांच्या साहाय्याने थेट वरच्या मजल्याकडे गेले. काही वेळाने अपार्टमेंटच्या कठड्यावर एक व्यक्ती हात जोडून उभी असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ ही बाब सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आणून दिली. सुरक्षारक्षकाने सदारंगानी यांना खाली आणले. परंतु, चावी वरच राहिल्याचा बहाणा करून ते पुन्हा वर गेले आणि उडी मारली. या संपूर्ण घटनेची नोंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली असून, संबंधित व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. या घटनेत सुनील सदारंगानी यांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. अपार्टमेंट परिसरात उभ्या असलेल्या चारचाकीच्या नंबरवरून पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. सुनील सदारंगानी हे चार-पाच दिवसांपूर्वी पत्नीसोबत सोलापुरात आले होते आणि येथेच स्थायिक होण्याचा त्यांचा विचार होता. ते राजकुमार राठी यांचे जावई होते. त्यांना दोन मुले असून, एक मुलगा अमेरिकेत तर दुसरा पुण्यात व्यवसाय करतो. घटनेची माहिती मिळताच अमेरिकेत असलेला मुलगा सोलापूरकडे रवाना झाला आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण काय?

एकेकाळी सोलापूर शहर व जिल्ह्यात मुलतानी बेकरीचे नाव सगळीकडे प्रसिद्ध होते. त्या काळात सुनील सदारंगानी यांचे संबंध अनेक नामवंत व्यक्तींशी होते. पण, काही वर्षांपूर्वी बेकरी बंद पडली आणि त्यानंतर ते पुण्यातील खराडी परिसरात वास्तव्यास गेले. मागील काही वर्षांपासून ते आर्थिक अडचणींचा सामना करत होते. तसेच, मानसोपचार तज्ज्ञांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती नातेवाईक आणि परिचितांनी पोलिसांना दिली आहे. दरम्यान, पनाश अपार्टमेंटमध्येच त्यांनी आत्महत्या का केली आणि त्यांनी हे टोकांचे पाऊल उचलण्यामागचे कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >