Friday, February 6, 2026

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस टँकर उलटून गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेमुळे तब्बल ३६ तासांहून अधिक काळ प्रवासी अडकून पडले होते. या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेता वांद्रे–वरळी सी लिंक, वर्सोवा–वांद्रे–वरळी सी लिंक तसेच संपूर्ण कोस्टल रोडवरील आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे याठिकाणी हेलिपॅड उभारावे, अशी मागणी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

या महत्त्वाच्या वाहतूक मार्गांवर अपघात, आग किंवा नैसर्गिक आपत्ती घडल्यास तातडीने आणि प्रभावी प्रतिसाद देणे मोठे आव्हान ठरू शकते. विशेषतः कोस्टल रोड हा काही ठिकाणी भुयारी तर काही ठिकाणी समुद्रावरून जाणारा मार्ग असल्याने जखमींना त्वरित रुग्णालयात हलवणे, सुरक्षा यंत्रणांची जलद हालचाल सुनिश्चित करणे तसेच आपत्कालीन सेवा वेळेत पोहोचवणे कठीण होऊ शकते, अशी चिंता शेलार यांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर वांद्रे रेक्लेमेशन परिसरात, सी लिंकजवळ हेलिपॅड उभारण्याची तातडीची गरज असल्याची मागणी शेलार यांनी केली आहे. या हेलिपॅडसाठी आवश्यक जागा उपलब्ध असून यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. हेलिपॅडची गरज का?

हेलिपॅड उभारण्यात आल्यास कोस्टल रोड व सी लिंकवरील आपत्कालीन परिस्थितीत जखमींना एअर अँब्युलन्सद्वारे तातडीने हलवणे शक्य होईल. तसेच लीलावती रुग्णालयासह परिसरातील अन्य प्रमुख रुग्णालयांपर्यंत जलद वैद्यकीय सेवा पोहोचवता येईल. यामुळे आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ तसेच अन्य यंत्रणांमधील समन्वय अधिक प्रभावी होऊन मुंबईसारख्या दाट लोकसंख्येच्या आर्थिक राजधानीसाठी दीर्घकालीन आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा अधिक मजबूत होईल, असेही आशिष शेलार यांनी नमूद केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >