आई कुठे काय करते या मालिकेत ईशा हे पात्र रंगवणारी फेमस अभिनेत्री अपूर्वा गोरे ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावरून फोटो शेअर करून तिने तिच्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे. त्यामुळे ती कोणासोबत लग्न करणार आहे याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे.
काही वर्षांपूर्वी खूप गाजलेला 'शाळा' या सिनेमात 'मुकुंद' ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता अंशुमन जोशी सोबत अभिनेत्री अपूर्वा गोरे लग्नबंधनात अडकणार आहे.
अभिनेता अंशुमन जोशी याचा २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला 'शाळा' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. शाळा चित्रपटातील अतिशय साधाभोळा आणि हुशार विद्यार्थी मुकुंद हा अनेकांना आवडला होता, त्याच्या या पात्राला प्रेक्षकवर्गाने भरभरून प्रेम दिलं होतं.
अंशुमन जोशी आणि अपूर्वा गोरे यांनी नुकताच त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. 'आनंदघन येई घरा. सर्वांना ओळख करून देतेय.. गोरेंचा जावई आणि जोश्यांची सून. आम्हाला एकत्र ठेवणारं आणि आमच्यावर नि:स्वार्थ प्रेम करणारं कुटुंब मिळाल्याबद्दल आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो. आम्ही तुम्हा सर्वांवर मनापासून प्रेम करतो,' असं कॅप्शन देत अपूर्वाने हे खास फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
अभिनेत्री अपूर्वाने याआधी अंशुमनसोबतचे काही खास फोटो शेअर केले होते,परंतु होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा तिने त्यात दाखवला नव्हता. तेव्हापासून नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु होती. अंशुमनने शाळा व्यतिरिक्त 'फास्टर फेणे', 'फुंतरू', 'फोटोकॉपी' यांसारख्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.






