मुंबई: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रीय काँग्रेसच्या गटातून हालचालींना वेग आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्थसंकल्प अधिवेशन कालावधीतच राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष निवडणूक पार्टी अंतर्गत करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची निवड बिनविरोध होणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
सुनेत्रा पवारांकडे तीन खात्यांची धुरा:
शपथविधीनंतर झालेल्या खातेवाटपात सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास या तीन खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजित दादांकडे असलेले महत्त्वाचे 'अर्थ व नियोजन' खाते मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे. या निर्णयामुळे राज्याचा २०२६-२७ चा आगामी अर्थसंकल्प मांडण्याचा मान फडणवीसांना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुनेत्रा पवार यांना पक्षाचे अध्यक्ष बनवा, पक्षातील नेत्यांची मागणी:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करा, अशी मागणी आमदारांकडून करण्यात आल्यानंतर आता पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही ही मागणी उचलून धरली आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात पक्षातील ३० हून अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पक्षाचे अध्यक्ष बनवा, अशी मागणी केली आहे. त्यांनी हे पत्र सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना पाठवले आहे.






