मुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक तब्बल ३२ तासांनंतर पूर्ववत झाली आहे. मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांमधल्या वाहतुकीचा वेग वाढावा म्हणून नव्वदच्या दशकात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बांधण्यात आला होता. या एक्स्प्रेस वेच्या वेगाला एका अपघातानं ब्रेक लागला होता. अखेर ३२ तासांनंतर मध्यरात्री २ वाजता पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील, प्रोपलीन गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटला आणि मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक तात्काळ ठप्प झाली होती. दुर्घटनाग्रस्त टँकरमधील गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यात आला आणि अपघातग्रस्त टँकर क्रेनच्या सहाय्यानं बाजूला करण्यात आला. अपघातग्रस्त टँकर रस्त्याच्या बाजूला करुन मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरची वाहतूक सुरळीत करण्यात आली.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील गॅसचा टँकर ३२ तासांनी हटवण्यात आला. त्यानंतर मुंबईकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पण मळवलीजवळ एक ट्रक बंद पडला आहे. तसेच अनेक अवजड वाहनांचे चालक झोपी गेल्याने कामशेत जवळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आता महामार्ग पोलीस झोपी गेलेल्या वाहन चालकांना उठवून गाड्या पुढं काढण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आडोशी बोगड्याजवळ वाहतूक सुरळीत असली तरी प्रवाशांना काहीवेळ ताटकळत बसावे लागले.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. भविष्यात अशी घटना घडू नये आणि घडल्यास आणखी कोणत्या प्रकारची सज्जता असावी, याबाबत चौकशी करुन शिफारसींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएसआरडीसीला दिले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही गंभीर दखल घेतली आहे. आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी दिली आहे. सोबतच मिसिंग लिंकचे कामही लवकर पूर्ण करण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत.






