चोरबाजारासह अनधिकृत फेरीवाले आणि गर्दुल्ल्यांवर कारवाई
मुंबई : दादर पूर्व रेल्वे स्थानकासमोरील जागेत मागील काही महिन्यांपासून चोर बाजार आणि गर्दुल्ल्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसह नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून सुरु झालेली ही बजबजपुरी अखेर महापालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक अमेय घोले यांनी पुढाकार घेत साफ केली. या रस्त्यावरील चोर बाजारांसह फेरीवाले आणि गर्दुल्ले यांना हटवून येथील रस्ता वाहतुकीसह पादचाऱ्यांना चालण्यास मोकळा करून दिला आहे.
मुंबईतील रेल्वे स्थानकांसह काही भागांमधील फेरीवाल्यांना हटवण्याची मोहिम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येत आहे. त्यानुसार महापालिकेच्या एफ उत्तर विभागाच्यावतीने दादर पूर्व रेल्वे स्थानकाजवळील फेरीवाले, जुन्या वस्तूंची विक्री करणारा चोर बाजार तसेच गर्दुल्ले यांना हटवण्याची मोहिम मागील तीन दिवसांपासून हाती घेण्यात आली आहे. याठिकाणी फेरीवाल्यांसह चोर बाजारामुळे रेल्वे प्रवाशी तसेच पादचाऱ्यांना चालता येत नव्हते, तसेच याठिकाणी होणारी गर्दी तसेच अनधिकृत उभी केलेली वाहने यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास स्थानिकांना होत होता. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी महापालिका प्रशासन तसेच पोलिसांना कारवाई न केल्यास आपण त्यांचा बंदोबस्त करू अशाप्रकारचा इशारा बॅनरद्वारे दिल्यानंतर महापालिका आणि पोलिस यांनी संयुक्तपणे याच्या कारवाईला सुरुवात केली आहे. मागील तीन दिवसांपासून दादर पूर्व रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त तसेच चोरबाजार मुक्त झाल्यामुळे पादचाऱ्यांना विनाअडथळा चालता येत आहे,तसेच वाहतूकही सुरळीत होत असल्याने नागरिकांकडून दिलासा व्यक्त केला जात आहे. मात्र, ही कारवाई दोन ते तीन दिवसांकरता न राहता सातत्यपूर्ण राहावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. चोर बाजाराच्या शेजारी बस स्टॉप असले तरी त्यांच्या व्यवसायामुळे बस त्याठिकाणी उभी राहत नाही आणि याचा फटका वडाळा तसेच परळ भागातील नागरिकांना बसत आहे.
ही कारवाई सातत्यपूर्ण ठेवली जाईल...
मुंबईत सध्या महापालिकेच्यावतीने अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. त्यानुसार दादर पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाले, चोरबाजार तसेच खाद्यपदार्थ विक्रेते यामुळे होणाऱ्या त्रासाबाबत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची दखल घेवून ही कारवाई हाती घेतली आहे. ही कारवाई सातत्यपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न असेल आणि याठिकाणी महापालिकेच्यावतीने तसेच पोलिसांशी समन्वय राखून पहारा देत नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
अरुण क्षिरसागर, सहायक आयुक्त, एफ उत्तर महापालिका विभाग







महेंद्र बाळकृष्ण शृंगारे February 5, 2026 08:07 AM
अरुण क्षिरसागरजी खुप खुप धन्यवाद, आपण असेच कार्य चालू ठेवावे. माझी जेष्ठ नागरिकांतर्फे तुम्हाला कळकळीची विनंती आहे की दादर पूर्व स्टेशन प्लॅटफॉर्म वरून बाहेर आल्यावर असलेल्या बीईएसटी बसचा थांबा कृपया तेथून त्वरित दुसरी कडे न्यावा, तसेच स्टेशन समोरील सर्व काळ्या पिवळ्या टॅक्सी अनधिकृतपणे तेथे उभ्या असतात आणि दादर ते सायन चेंबूर जाण्यासाठी अव्वाच्या सव्वा भाडे सांगतात त्या टॅक्सीजना तेथून हटवावेत. जेणेकरून जेष्ठ नागरिकांना बाहेरगावावरून आल्यावर सहीसलामत न धडपडता बाहेर जाता येईल. बीईएसटी बसमूळे जेष्ठ नागरिकांना सकाळच्या व संध्याकाळच्या रात्रीच्या वेळी लांब अंतरावरून टॅक्सीतून उतरून स्टेशनवर यावे लागते टॅक्सी स्टेशन जवळ नेण्यास बीईएसटी बसमुळे पोलीस मनाई करतात. तरी आपण ह्या सर्व परिस्थिती वर कारवाई करून जेष्ठ नागरिकांना दिलासा द्याल अशी आशा व्यक्त करतो.
Manmohan sakpal February 5, 2026 08:07 AM
Very nice job done.