मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राज्यातील १५ आमदार दि. १५ ते २२ फेब्रुवारी दरम्यान लंडनच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील आमदारांचा समावेश असून, लंडनमधील शहरी व्यवस्थापन आणि प्रशासकीय कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यावर भर दिला जाणार आहे.
या अभ्यास दौऱ्यात भाजप, शिवसेना आणि उबाठा या पक्षांचे आमदार सहभागी होत आहेत. दौऱ्याचा मुख्य उद्देश लंडनमधील शहरी नियोजन, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा व्यवस्था तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि सेवांचा सविस्तर आढावा घेणे हा आहे. भाजपकडून विक्रांत पाटील आणि निरंजन डावखरे, शिवसेनेकडून मनीषा कायंदे, तर उबाठासेनेकडून वरुण सरदेसाई या दौऱ्यात सहभागी होत आहेत. याशिवाय बाबासाहेब देशमुख, परिणय फुके, विक्रम पाचपुते, नमिता मुंदडा, स्नेहा दुबे, अमित गोरखे, विक्रम काळे, विश्वजीत कदम, सुमित वानखेडे आणि योगेश टिळेकर यांचाही दौऱ्यात समावेश आहे.
लंडनमधील आधुनिक शहरी व्यवस्थापन, पायाभूत सुविधांची उभारणी, प्रशासकीय निर्णयप्रक्रिया आणि नागरिककेंद्रित सेवांची कार्यपद्धती यांचा अभ्यास करून त्याचा उपयोग राज्यातील धोरणनिर्मिती आणि शहरी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.






