महापौरांना इनोव्हा, तर समिती अध्यक्षांना भगव्या पट्यांच्या स्कॉर्पिओ
सचिन धानजी मुंबई : मुंबईच्या महापौर तसेच उपमहापौर पदासाठी येत्या बुधवारी ११ फेब्रुवारी रोजी निवडूक होणार असून त्यानंतर वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे महापौरांसह नव्याने निवडून येणाऱ्या समित्यांच्या अध्यक्षपदांचे सारथ्य करण्यासाठी त्यांची वाहनेही चालकांसह सज्ज होत आहेत . यामध्ये महापौरांसाठी नव्याने इनोव्हा एन ही गाडी खरेदी करण्यात आली आहे. या वाहनांची नोंदणी प्रक्रिया दोन दिवसांमध्ये पूर्ण होवून महापौर विराजमान होण्यापूर्वी हे वाहन त्यांच्या सेवेसाठी असणार आहे.तर उपमहापौरांहस विविध समिती अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ गाड्या असतील आणि यावर भगव्या रंगाच्या पट्टयांचे आकर्षक डिझाईन असेल.
मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर आता महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक येत्या ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यानंतर स्थायी समिती, शिक्षण,सुधार तसेच बेस्ट समिती अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. त्यानंतर विशेष समित्या आणि १८ प्रभाग समित्यांच्या निवडणूक होणार आहे. त्यामुळे मागील पावणे चार वर्षांमध्ये नगरसेवक आणि पर्यायाने महापौर व विविध समित्यांचे अध्यक्ष नसल्याने त्यांच्या वाहनांचा वापर अधिकारी वर्गाने केला होता. त्यामुळे आता नवनिर्वाचित महापौर तसेच उपमहापौरांसह विविध वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षांसाठी वाहने खरेदीची प्रक्रिया घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने पार पडली आहे.
त्यानुसार नव्या महापौरांसाठी नव्याने इनोव्हा एन ही गाडी खरेदी केली जात आहे. ही गाडी इव्ही तसेच पेट्रोलवर आधारीत आहे. अशाप्रकारच्या इनोव्हा वाहनांचा वापर सध्या महापालिकेत अतिरिक्त आयुक्त हे करत आहेत.. तर वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षांसाठी १२ स्कॉर्पिओंचीही खरेदी केली जात आहे. अध्यक्षांच्या या स्कॉर्पिओ गाड्यांची ओळख व्हावी म्हणून यावर भगव्या रंगाच्या पट्टयांचे डिझाईन तयार करण्यात आली आहे. त्यामुळे अध्यक्षांची वाहने सहजपणे ओळखली जाणे शक्य होणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महापौर, उपमहापौरांसह विविध समित्यांच्या अध्यक्षपदासाठी नवीन वाहन खरेदीची प्रक्रिया सुरु केली आहे. ही वाहने आता उपलब्ध होत असून याची आरटीओ नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये महापालिकेच्या ताफ्यात येतील अशाप्रकारचा विश्वास व्यक्त केला. महापौरांसाठी इनोव्हा आणि इतर अध्यक्षांना स्कॉर्पिओ गाड्या खरेदी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.






