कांकण

दव भिजल्या पहाटेस,
धरा लक्ष्मीसम खुलली.
पूर्वा चैतन्य फुलवीत
कणाकणांत मोहरली।
कांकण भरल्या हातांना,
वर्ख चढला सोनरूपी.
हिर्वा पदर शालूचा
मृदगंध अत्तरकुपी।


माेरपीस पूजा काळे


व्हय आज अत्तरकुपीतलं सुगंधित अत्तर लावून हातभर कांकण भरण्याचा मोह व्हतोय. सूर्य डोईशी येतूपावस्तर जिमिनिच्या हौसेला मागं टाकलयं म्या. माझ्या भितूर आतमंदी दडलेल्या मनमंदिराला उगा नटण्याची उमेद जागी झालीय. अवं आता कशाला म्हणून काय ईचारता? त्याचं असं झालं बघा, दोन-चार दिसापूर्वी म्या मुंबैक पावले व्हते. तिथं माझी मैतर नंदि भेटली. ही नंदि म्हंजै आताशा झालेली प्रधानाची सून बाय व्हय. हायस्कूलातली मैतर. मुंबैत एका लगीन कार्यक्रमात आमी एकमेकींना बेस झाकपाक भेटलो अन् काय तर पुढं जाऊन बालपनीच्या गप्पांत रमलो अन् हापसून गोष्टी करता हामसून हामसून रडलो बी. त्यायेळी संसाराला कामाची ठिगळं जोडत नाव कमवलेली माजी मैतर नंदिनी मला लय लय मोठी भासली. प्लास्टिक, मेटल अन् काय बाय तो काच बांगड्यांचा धंदा म्हणजे व्यवसाय की काय म्हनतात ना.! हा हा तोच तो क्षीत्रिशा नाव असलेला भलामोठा रंगीत बांगड्यांचा बिजनेस हाय तीचा. धंद्याच्या शिरपेचात आणखी काम वाढवून नाव बी झालंया बघा तीचं. पावलं लय जोमात पडत हायैत तीची. त्याचा आनंद बी लैच हाय मला. पन बया तिच्याकडच्या रंगीत काच बांगड्यांनी मी लय सुखावलेय बघा. माझं डोळं साप दीपलंया. माह्या संग्ती आल्येल्या सुदिक आनंदी पावल्यात बगा. आता बांगड्या म्हंटल की बाईचा जीव की प्राण हो! बाकी काय बी नसलं तरी, गळ्यात काळं डोरलं अन् हाती काच बांगडी हिचं बाईची पहिली वळख नव्हं. मंग कांकण पावून माझा बी जीव निस्ता पागळला. पार कामाचा, संसाराचा पसारा उपसता दिस मावळया लागल्यार कांकण किणकिण कानात नुस्ती रूंजी घालू लागली. या बया या नंदिच बी कौतिक करायाचं हवं. सण, उत्सव म्हणूनशान नका. लग्न, मुंज, हल्दी पसारा म्हनू नका, तीचा छोटा हत्ती ट्रक दीनरात आपल्या शेवेसाठी तयार बघा. पावन तो कांकण भरलेला छोटा हत्ती ट्रक पाहून म्या भलतीचं खूश झाले बया. बाबो किती किती प्रकारच्या बांगड्या व्हत्या त्यात. म्ह्या कांकणाच्या प्रेमातचं पडले ना राव! जादू झाल्ती, मग काय ईचारता? घरला आलत्यार उसकला बोजाबिस्तारा अन् राप राप रापला घरभर पसरलेला कांकण संसार. गवसतील तशी लाल, हिर्वी, पिवली कांकण हातात भरत गेले. आ ऽऽऽ वासून डोळं फोडू्न ही चुटूक कांकण मास्न्ही पाहत व्हती. आता आमी बी खूश अन् आमचं गडी बी लय खुश झालं व्हतं. मंग काय ईचारता काय बाय लिवून सोडलं न्हव्ह आमच्यावर आमच्या सरकारनं, आमच्या रावानं...


गोड हास्याची खळी तुझ्या ग् गाली,
नथ शोभे कुरळ्या कुंतली.
नजर बाणानं ग् घायाळ करी तू जीवा,
हाती कांकण चुडा जैशी नववधू आली.


ते ऐकून आईच्यानं माझं अंग-अंग शहारलं. म्याही सुखावले, धनी प्रेमापुढं लाजून गोरी म्होरी झाले. पुढं धनी म्हणतो कसा... सखू मोकळं ठेवू नको हात शोभत नाही ग् तुला. तुझ्या ग् राणी सोनेरी कंकणात हाय सधनता, ऐश्वर्य जे खुलवतं तुजं सौंदर्य. तू शोभते जणू परी, काचच्या कांकणात रावाची मालकीण खरी. तोडे, गोठ, पाटल्यांना हरवतील ग् तुझ्या हातच्या काच बांगड्या. जैशी हिर्व्या काकणात तू नारी ग् सुंदरी. साजणी तू ग् माझी पाटलीणं भारी. कारभारणी माह्या प्रेम प्रतीक असलेल्या कंकणानं भरलाय तुझा माझा संसार...


व्हय मला बी आटवतयं... घरला पहिली वैली पोर जन्मा आली तशी, घर भरून कांकण नाचले व्हते. फिरले व्हते कौतुक. किणकिण स्वरसूर तालानी सुखावले व्हते माझं मायबाप. मला वाटतयं कंकणामध्ये बायांचे वैभव दडलय म्हणून. या बायांचं अडलं नडलं गुपित बोलतात ही कंकण. किणकिण काकण साद घाली यौवनाला. प्रित उमलताना आपल्या अदानी पाषाण हृदय घायाळ करतात या ललना. मेहंदी भरल्या हातात कंकण खुळखुळतात. पायी घुंगर रुणझुणतात. पैठणी सजते नाचऱ्या मोरात. रायाला खुणावते चांदणी. राया, बघा ना बोलाविते देखणी. लेकी, मुली सासरी जाताना हिचं कांकण मग गपगुमान राहतात. मनाच्या नाजूक धाग्यात गुंफलेला असतो बंध रेशमाचा. मायचा गर्भ जोडला जातो नाळनं. नऊ महिनं ज्या माऊलीनं आपलं पोषण केल तीचं ऋणी राह्तो आयुष्यभर आपन.


जवा नात्यात गुंफण व्हते रक्षाबंधन दिवशी तवा कांकण जोडत तन-मन-धन. आन् एक दिस साताजन्माच्या गाठीत डोरल्याच्या मणीत घट्ट रूजतं आपलं जिनं शेवटल्या श्वासापर्यंत. सातवचनात बांधलेली कंकण अग्नीभवताली फेर धरतात. आकार देतात जिंदगीला. यावर धनीचं आपलं एकचं...


मेहंदी भरला हात तुझा सखे, चुडा हरीत कंकणांचा. भरतो मळवट लावितो तुजं टिळा कुंकवाचा. काकणाचं आनि आपलं नातं घडीभरचं न्हायं, तर ते जिंदगीभर निभवायचं असतं. राया तुझी नि माझी पैली भेट, याद हाय का तुला? तू बघाया आल्या दिसापासून, तारखा, वरीस काय तर येळ-काळ सुदिक म्या माझ्या आत आठवांच्या गाठोड्यात बंदिस्त करून ठेवलंय. तुझं माझं जमलं अन् वावरात साखर वाटली. त्या दिवशी हातभर हिर्व्यी कांकण चढवली म्या, ते आजपातूर तुजी व्हवून राहीले. राया तुम्हास्नी गाठाया धावू लागल्या लाटा सागराकडे. गोड गुलाबी थंडीतला गंधस्पर्श आठवांच्या अत्तर कुपीत दरवळला अन् माझी म्या न राहिले. आपलं नात लग्न सोहळ्यात, सुवर्ण डोरल्यात, हिर्व्या कंकणात, लाल कुंकवात सर्वसाक्षीने घट्टमट्ट झालं, त्या येळेपासून आपण एकमेकांच्या गर्भ रेश्मी धाग्यात बांधले गेलो... म्या अन् तू या सुखी संसार वेलीवर विश्वास-प्रेम-दया-भावना घेऊन जगतोय.


लाल हिर्व्या चुड्याच्या, कांकणात आयुष्याला अर्थ गावलाय. तर वडिलधाऱ्यांच्या आशिर्वादाने कांकणाच्या बंधनाला घट्ट केलयं आपण. बंध रेश्मी रेशमाचे प्रेमाचे साता जन्माचे, रेशीम गाठीचे कंकण काचेचे अहाहा काय हे सृजन लावण्य! नभांगणीचा सप्तऋषी शुक्रतारा. क्षितिजाच्या भाळी रवीराजचा लाल टिळा प्राची लावण्याला चार चाँद लावत आहे. चांदणं मंदमंद होऊ लागलयं. रात्र धरणीवर पहारा देतेय. इकडं तर माजी कांकण किणकिण अंमळ वाढलीय, तर दुसरीकडं नंदिनीच्या काच कांकणाने सुरू झालेला प्रितगंध वाऱ्यावर झुलतोय. या वाऱ्याला प्रितीचे पंख लावून म्या उगा गुणगुणतेयं...


शालू हिर्वा... चोळी हिर्वी... हिर्वा चुडा घाला, साजणी बाई येणारं साजन माझा... साजणी बाई येणारं साजन माझा...!

Comments
Add Comment

सत्तेच्या शिखरावरचा संयमी आवाज

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे स्त्रीने सत्तेच्या शिखरावर पोहोचावे, यासाठी ती ‘वेगळी’ असावी लागते असा अलिखित नियम

गेमचेंजर करार

भारत आणि युरोपीय महासंघामध्ये खुला व्यापार करार झाल्यानंतर अमेरिकेला चांगल्याच मिरच्या झोंबल्या. अमेरिकेचे

स्पर्शाची दुनिया सारी

माेरपीस : पूजा काळे स्पर्श म्हणजे जाणीव जागृतींचा काही वेळेसाठी घडलेला सहवास. कळत नकळत होणारा हाताचा हाताशी

आवाज हरपण्याचे दिवस संपले

डॉ. कणव कुमार भारतामध्ये डोके व मान कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय आहे. या कर्करोगांमध्ये तोंड, घसा (आवाजपेटी),

संघर्षातून नेतृत्वाकडे नौरोती देवीची प्रेरणादायी कहाणी

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे “जीवनातील कठीण परिस्थितीतूनच खरे नायक घडतात,” असे म्हटले जाते. राजस्थानच्या ग्रामीण

नकोशा होताहेत हव्याशा

पुरुष आणि महिला ही जीवनाच्या वाहनाची दोन चाके आहेत. एका वाहनाला सुरळीत चालण्यासाठी फक्त दोन चाकेच आवश्यक नसतात,