Wednesday, February 25, 2026

सत्तेच्या शिखरावरचा संयमी आवाज

सत्तेच्या शिखरावरचा संयमी आवाज

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे

स्त्रीने सत्तेच्या शिखरावर पोहोचावे, यासाठी ती ‘वेगळी’ असावी लागते असा अलिखित नियम आपल्या समाजात वर्षानुवर्षे रूढ आहे. ती जास्त आक्रमक असेल, तर ‘खूप कडक’ म्हणतात; शांत असेल, तर ‘कमकुवत’ ठरवतात. अशा साच्यात न बसता, स्वतःचा मार्ग घडवणाऱ्या स्त्रियांची संख्या कमी आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या त्याच विरळ गटातल्या.

१ फेब्रुवारी २०२६ रोजी सलग आठव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना त्या केवळ अर्थमंत्री म्हणून उभ्या नव्हत्या, तर भारतीय स्त्रीच्या क्षमतेवर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतीक म्हणून देशासमोर होत्या.

१८ ऑगस्ट १९५९ रोजी मदुराई येथे जन्मलेल्या निर्मला सीतारामन यांचे बालपण कोणत्याही राजकीय घराण्यात गेले नाही. वडील नारायणन सीतारामन हे भारतीय रेल्वेमध्ये नोकरीला होते. परिणामी, निर्मला यांचे बालपण एका शहरात न अडकता तिरुचिरापल्ली, तिरुपती, रांची अशा विविध शहरांत गेले.

या सततच्या स्थलांतरामुळे त्यांनी दक्षिणेतील मंदिरे, उत्तर भारतातील रेल्वे वसाहती, मध्यमवर्गीय कुटुंबांचे संघर्ष अशी भारताची विविधता पाहिली, अनुभवली. पुढे अर्थमंत्री म्हणून निर्णय घेताना त्यांच्या भाषणांत आणि धोरणांत ‘संपूर्ण भारत’ का दिसतो, याचे मूळ इथे सापडते. आई सावित्री सीतारामन या गृहिणी होत्या, पण त्या शिस्तप्रिय आणि शिक्षणावर भर देणाऱ्या होत्या. निर्मला लहानपणापासूनच वाचनप्रिय, मुद्देसूद बोलणाऱ्या आणि प्रश्न विचारणाऱ्या स्वभावाच्या होत्या.

निर्मला यांनी तिरुपती येथील सेव्हन हिल्स स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी येथून अर्थशास्त्रात पदवी घेतली. नंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथून आंतरराष्ट्रीय अध्ययन व अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जेएनयू नावाने प्रसिद्ध आहे. जेएनयूमध्ये शिकत असताना त्यावेळी विद्यापीठात डाव्या विचारसरणीचे वर्चस्व होते. मात्र निर्मला यांनी स्वतंत्र वैचारिक भूमिका घेतली. त्यांचा कल हळूहळू राष्ट्रीयतावाद आणि बाजाराभिमुख अर्थव्यवस्थेकडे झुकत गेला. ही बाब अनेकांना फारशी माहीत नाही. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकताना निर्मला सीतारामन मोठ्या आवाजात घोषणा देणाऱ्या विद्यार्थिनी नव्हत्या. त्या ऐकून घेणाऱ्या, वाचन करणाऱ्या आणि विचार करणाऱ्या होत्या. अनेक महिलांना वाटते, की आपला आवाज ऐकू यावा, यासाठी मोठ्याने बोलावे लागते. पण

निर्मला सांगतात. ‘तयारी मजबूत असेल, तर आवाज आपोआप ऐकू येतो’.

१९८६ मध्ये निर्मला यांचा विवाह परकला प्रभाकर यांच्याशी झाला. प्रभाकर हे नामवंत राजकीय विश्लेषक व संवादतज्ज्ञ आहेत. पतीच्या नोकरीनिमित्त त्या काही काळ लंडनमध्ये राहिल्या. तेथे त्यांनी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी)साठी मुक्त लेखन केले. तसेच आशियाई समुदायाशी संबंधित सामाजिक विषयांवर काम केले. परदेशात राहून त्यांनी पाहिले की, विकसित देश आपली अर्थव्यवस्था कशी सांभाळतात, स्थलांतरित कामगारांना कसे पाहतात आणि जागतिक बाजारपेठ कशी चालते. हा अनुभव पुढे भारतासाठी धोरण ठरवताना त्यांच्या उपयोगी पडला. त्यामुळेच त्या अर्थमंत्री झाल्यावर जागतिक आर्थिक संस्थांशी संवाद साधताना आत्मविश्वासाने बोलू शकल्या.

२००६ साली निर्मला सीतारामन यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. प्रारंभी त्या पक्षाच्या धोरणात्मक संशोधन आणि प्रवक्तेपणाची जबाबदारी सांभाळत होत्या. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे त्या लवकरच पक्ष नेतृत्वाच्या विश्वासार्ह चेहऱ्यांपैकी एक बनल्या.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून जबाबदारी देण्यात आली. याच काळात त्यांनी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या आंतरराष्ट्रीय प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली.

२०१७ मध्ये निर्मला सीतारामन यांची भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती झाली. हा निर्णय ऐतिहासिक ठरला. संरक्षणमंत्री असताना त्यांनी लष्करी आधुनिकीकरण, स्वदेशी संरक्षण उत्पादन आणि सीमावर्ती पायाभूत सुविधांवर भर दिला. बालाकोट हवाई कारवाईनंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका ठामपणे मांडली. तसेच संरक्षण मंत्रालयात पारदर्शकता आणण्यासाठी अनेक प्रशासकीय सुधारणा केल्या. या बाबी सामान्यतः अर्थमंत्री म्हणून त्यांच्या ओळखीखाली झाकोळल्या जातात.

मे २०१९ मध्ये निर्मला सीतारामन यांनी भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतरच्या काळात त्यांनी कोविड-१९ महामारी, जागतिक मंदी, रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम आणि महागाईसारखी अभूतपूर्व आव्हाने हाताळली. त्यांच्या अर्थसंकल्पांची एक खास ओळख म्हणजे दीर्घकालीन दृष्टिकोन. टीका झाली, विरोध झाला, पण त्यांनी पायाभूत सुविधा, डिजिटल व्यवहार, स्टार्टअप्स आणि सामाजिक सुरक्षा योजनांवर भर कायम ठेवला. त्यांनी सादर केलेले अर्थसंकल्प हे कागदविरहित होते. हा एक प्रशासकीय क्रांतिकारक बदल होता.

१ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात त्यांनी डिजिटल अर्थव्यवस्था, हरित ऊर्जा, रोजगारनिर्मिती आणि मध्यमवर्गीय करसवलतींवर भर दिला. हा अर्थसंकल्प २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

निर्मला सीतारामन शाकाहारी असून साधे जीवन जगतात; त्या अजूनही स्वतःची खरेदी स्वतः करतात. त्या संस्कृत आणि तमिळ साहित्याच्या अभ्यासक आहेत. त्या प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करतात; सोशल मीडियावर त्या कमी सक्रिय आहेत. अर्थमंत्री असूनही त्यांनी कधीही लोकसभा निवडणूक लढवलेली नाही. त्या राज्यसभेच्या सदस्य आहेत. त्या संसदेत अभ्यासाच्या जोरावर उभ्या राहतात.

निर्मला सीतारामन यांची कन्या परकला वाङमयी ही व्यवसायाने पत्रकार आहे. दिल्ली विद्यापीठातून तिने इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली, तर बोस्टन येथून पत्रकारितेत ‘मास्टर्स ऑफ सायन्स इन जर्नलिज्म’ ही पदवी प्राप्त केली आहे. आपल्या कन्येला त्या आपली मैत्रीण, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक मानतात. निर्मला सीतारामन यांची कारकीर्द ही संयम, अभ्यास, वैचारिक ठामपणा आणि प्रशासकीय कौशल्याचा संगम आहे. तामिळनाडूतील मध्यमवर्गीय कुटुंबातून देशाच्या आर्थिक धोरणांचा कणा बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. राजकारणात गाजावाजा न करता, शांतपणे पण ठामपणे निर्णय घेणारी ही अर्थमंत्री भारतीय लोकशाहीतील एक महत्त्वाचा अध्याय ठरली आहे.

Comments
Add Comment