१४ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात
अलिबाग : अलिबाग पंचायत समिती निवडणुकीसाठी १४ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत. २०१७ साली झालेल्या निवडणुकीत शेकापने अलिबाग पंचायत समितीवर वर्चस्व ठेवले होते. २०२६ च्या अलिबाग पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांची युती झाली नसल्याने ते वेगवेगळे लढत आहेत. अनेक गणातून तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले असले, तरी अलिबाग पंचायत समितीची खरी लढत ही शिवसेना आणि शेकाप या दोन पक्षात होणार आहे. त्यामुळे अलिबाग पंचायत समिती शेकाप राखणार की शिवसेना खेचून आणणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
अलिबाग पंचायत समितीच्या १४ गणांसाठी निवडणूक होत आहे. महायुती घटक पक्ष हे वेगवेगळे लढत आहेत. शेकाप, उबाठा आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीतून लढत आहेत. शिवसेनेने १४, शेकाप १३, भाजप ८, राष्ट्रवादी (अजित पवार) २, उबाठा गट १, काँग्रेसने १ जागेवर उमेदवार उभे केले आहेत. तीन अपक्षही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. १४ जागांसाठी ४२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
वैजाळी, शहापूर, आंबेपूर, रुईशेत भोमोली, आवास, किहीम, थळ, वरसोली, चेंढरे, आक्षी, रेवदंडा, चौल, कावीर आणि रामराज असे १४ पंचायत समिती गण आहेत. अलिबाग पंचायत समितीवर झेंडा फडकविण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. उमेदवारांच्या गणांत जोरदार प्रचार सुरू आहे. प्रत्यक्ष मतदार भेटीवर उमेदवारांचा जोर आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रियदर्शनी पाटील यंदा चेंढरे गणातून भाजपतर्फे लढत आहेत, तर इतर उमेदवार हे नवखे आहेत. महेश गुरव हे २०१७ मध्ये आक्षी गणातून पराभूत झाले होते. ते पुन्हा तेथून उबाठा गटाकडून रिंगणात उतरले आहेत. रेवदंडा गणातून २०१७ साली विजयी झालेले भाजपचे उदय काठे यंदाही निवडणुकीला सामोरे जात आहेत.
अलिबाग पंचायत समिती गणांमध्ये आरपारची लढाई :- वैजाळी - शिवसेना × राष्ट्रवादी (अजित पवार) भाजप × शेकाप.
- शहापूर - शिवसेना × राष्ट्रवादी (अजित पवार) भाजप × शेकाप.
- आक्षी - शिवसेना × राष्ट्रवादी (अजित पवार) भाजप × शेकाप.
- आंबेपूर - भाजप × शिवसेना × शेकाप.
- रुईशेत - भोमोली - भाजप × शिवसेना × शेकाप.
- चेंढरे – शिवसेना × भाजप × शेकाप.
- रेवदंडा - भाजप × शिवसेना × शेकाप
- चौल - भाजप × शिवसेना × शेकाप.
- कावीर - भाजप × शिवसेना × शेकाप.
- आवास - शिवसेना × शेकाप
- किहीम - शिवसेना × शेकाप
- थळ - शिवसेना × शेकाप
- वरसोली - शिवसेना× शेकाप
- रामराज - शिवसेना × शेकाप
- शिवसेना – १४
- शेकाप -१३
- भाजप - ८
- अपक्ष – ३
- राष्ट्रवादी (अजित पवार गट) – ३
- उबाठा – १
- कॉग्रेस - १






