Wednesday, February 25, 2026

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे, भारतातील ऋतुचक्रही पूर्णपणे कोलमडले आहे. आता भारतीय हवामान विभागाने देशातील काही राज्यांसाठी पुन्हा एकदा पावसाचा इशारा जारी केला आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, उत्तर भारतासह मध्य आणि पश्चिम भारतातील एकूण नऊ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, जम्मू-काश्मीर आणि लडाख या भागांमध्ये पुढील काही दिवस हवामान बिघडण्याचा अंदाज आहे.

विशेषतः हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ३ फेब्रुवारीपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. डोंगराळ भागांमध्ये याचा परिणाम अधिक जाणवण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अरबी समुद्र आणि लगतच्या किनारपट्टी भागांमध्येही हवामानात बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे मच्छीमारांनी पुढील काही दिवस समुद्रात जाणे टाळावे, अशा सूचना संबंधित यंत्रणांकडून देण्यात आल्या आहेत. हवामानातील या बदलांमुळे शेती, वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांनी अधिकृत हवामान अंदाजांवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment