Tuesday, February 3, 2026

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत साधणार मान्यवरांशी संवाद - वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत साधणार मान्यवरांशी संवाद - वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत हे मुंबईत समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. वरळी येथील नेहरू सेंटरच्या सभागृहात येत्या शनिवारी ७ आणि रविवारी ८ फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमांतर्गत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून आर्थिक, न्यायिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, कला, चित्रपटसृष्टि, रहिवासी संघ अशा विविध क्षेत्रातील ८००-९०० मान्यवरांशी संवाद साधण्यात येणार आहे.

गेल्या १०० वर्षातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल, संघाचा विचार, महत्वपूर्ण टप्पे, आगामी योजना याबाबत भागवत आपले विचार मांडतील. तसेच भविष्यात संघाच्या कार्यात लोकांचा सहभाग वाढवा, यादृष्टीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

गेले चार महिने या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. विविध १० श्रेणी तयार करून त्या-त्या क्षेत्रातील मान्यवरांशी संपर्क साधला गेला. यामध्ये कला क्षेत्रातील आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर चित्रपट जगतातील बोनी कपूर, क्रीडा क्षत्रातील चिराग शेट्टी, लेखक विश्वास पाटील चिन्मय मिशनसहअन्य संत परंपरेतील लोक कार्यक्रमाला येणार आहेत, असे आंबेकर यांनी स्पष्ट केले.

देशभरात विविध शहरात अशा व्याख्यानमालांची शृंखला सुरू होती. शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत होणारी व्याख्यानमाला ही या मालिकेतील शेवटची व्याख्यानमाला आहे. यापुर्वी दिल्ली, बेंगळुरू, आणि कोलकातामध्ये अशा व्याख्यानमाला पार पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर समाजाच्या विविध घटकातील मान्यवरांशी संवाद आणि प्रश्नोत्तरे असे या दोन दिवसीय कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. ७ फेब्रुवारीला पहिल्या दिवशी दोन सत्रात मोहन भागवत यांचे व्याख्यान होईल. तर, दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यक्रमाला सुरुवात होणार असून सरसंघचालक भागवत हे श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतील.

२०२५ च्या विजयादशमीपासून चालू झालेले शताब्दी वर्ष २०२६ च्या विजयादशमीपर्यंत असणार आहे. हे वर्ष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्राप्रती समर्पित सेवेच्या शतकाचे प्रतीक आहे. समाजातील विविध घटकांना जोडण्यासाठी गृह संपर्क, हिंदू संमेलन, प्रबुद्ध गोष्टी संमेलने, सद्भाव बैठक आणि युवा संमेलन यांसह अनेक प्रेरणादायी कार्यक्रमांची रचना करण्यात आल्याचेही आंबेकर यांनी सांगितले. यावेळी कोकण प्रांत संघाचालक अर्जुन चांदेकरदेखील उपस्थित होते.

राष्ट्रीय सवयांसेवक संघाची स्थापना १९२५ मध्ये झाली. त्यानंतर १९३५ मध्ये गिरगावमध्ये पहिली शाखा सुरू झाली. मुंबईत अनेक प्रचारक तयार झाले आणि देशातील विविध भागात जाऊन संघाचे कार्य केले. विशेषतः मुंबईतील प्रचारक शिवरामपंत जोगळेकर यांनी दक्षिणेकडे, तामीळनाडूमध्ये जाऊन संघाच्या कार्याचा प्रसार प्रचार केला. मुंबईत सुरुवातीच्या काळात गिरणी कामगारांसाठी शाखांचे आयोजन करण्यात आले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >