Thursday, March 5, 2026

मुंबई महापालिकेने अखेर हिंमत दाखवली

मुंबई महापालिकेने अखेर हिंमत दाखवली

मोहमद अली मार्गावरील अनधिकृत फेरीवाल्यांसह पदपथावरील वाढीव बांधकामांवर हातोडा

मुंबई : मुंबईतील अलेक भागांमधील फेरीवाल्यांसह अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आल्यानंतर हिंमत असेल तर भेंडीबाजार, मोहमद अली रोडवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून दाखवा असे महापालिकेला सुनावणाऱ्या मुंबईकरांना आज महापालिकेने तिथेही कारवाई करून आम्ही मनात आणले तर कुठेही कारवाई करू शकतो हे दाखवून दिले आहे. मुंबई महापालिकेच्या बी विभागाच्यावतीने अत्यंत गजबजलेले व्यापारी रस्ते म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या मोहम्मद अली मार्ग आणि इब्राहिम मर्चंट मार्ग परिसरातील पदपथांवरील अनधिकृत वाढीव बांधकामांवर सोमवारी २ फेब्रुवारी रोजी कारवाई करण्यात आली.

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार तसेच परिमंडळ एकच्या उपायुक्त पदी नियुक्त झालेल्या चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बी विभागाच्या सहायक आयुक्त योगेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.मोहम्मद अली मार्ग हा भेंडीबाजार, मशीद बंदर आणि भायखळा परिसराला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. इब्राहिम मर्चंट मार्ग हा रस्ता नागदेवी आणि मांडवी परिसराच्या जवळ आहे. हे दोन्ही रस्ते व्यापारी दृष्टीने आणि रहदारीच्या दृष्टिने खूप महत्त्वाचे आहेत. या दोन्‍ही मार्गावरील पदपथांवर अनधिकृत वाढीव बांधकामे आढळून आली होती. तसेच, या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनीही दुकाने उभी केल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे, वाहनचालकांना मार्गक्रमण करण्यास तसेच पादचाऱयांना पदपथांवर चालण्यास अडथळा निर्माण होत होता.

याच पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेच्या ‘बी’ प्रशासकीय विभागाकडून निष्कासनाची मोहीम हाती घेण्यात आली. या अंतर्गत, या परिसरातील अनधिकृत फेरीवाले, पदपथांवरील अनधिकृत वाढीव बांधकामांचे निष्कासन करण्यात आले. ७ अनधिकृत दुकाने हटविण्‍यात आली. तसेच, १२ ओटे, पत्र्याचे लोखंडी शेड, १० बोलार्ड, २ बेवारस वाहनांवर कारवाई करण्‍यात आली. अतिक्रमण निर्मूलनाची ०४ वाहने, ०२ जेसीबी आणि अन्य संयंत्राच्या सहाय्याने हटवण्यात आले. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे ४० अधिकारी - कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता. या कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळातही अनधिकृत / वाढीव बांधकामांविरोधात नियमितपणे कारवाई सुरूच राहील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

Comments

Vinayak Walam    February 9, 2026 11:34 AM

चांगली कारवाई केली पण ही कायम स्वरूपात असेल तर बरं होईल

Omsairam    February 8, 2026 05:40 AM

मुंबईतल्या सर्व फेरीवाल्यांचा बंदोबस्त करा लवकरात लवकर

Madhavi Mahajan    February 7, 2026 11:42 AM

अंधेरी पूर्व, साकीनाका इथे फुटपाथवर कढईत तळण चालू असत,लोकांना रस्त्यावरुन चालाव लागत,ह्या एरीयात कोणाचच लक्ष का नाही.

विवेक    February 6, 2026 11:00 PM

दादर रेल्वे स्थानक पश्चिम परिसरात फेरीवाले बसल्याने सर्वसामान्य नागरिकांना चालताना अडचणींचा सामना करावा लागतो महानगरपालिकेची व्हॅन ऊभी असताना सुद्धा फेरीवाले धंदा लावून बसलेले असतात अधिकारी वर्गाचा वचक राहिलेला दिसत नाही अधिकारी बहुतेक वेळा त्यांना हटवून फोटो काढताना दिसतात आणि नंतर परत फेरीवाले पुर्ववत बसलेले दिसतात आता ते का बसतात आणि त्यांना बसण्यापासुन रोखण्यासाठी महानगरपालिका उपाय करतील काय हे पहाणे गरजेचे आहे

Anil Bane    February 6, 2026 12:53 PM

ही कारवाई फक्त दिवसा नको रात्री पण झाली पाहिजे प्रत्येक तासात

Dyt    February 6, 2026 05:18 AM

हि कारवाई दिखावा असता कामा नये कायम सोरूपी मुंबईतील फुटपाथ मोकळे झाले पाहिजेत तरच परप्रांतीय मुंबईतील घुसखोरी बंद होहील

आशिष गाडे    February 5, 2026 02:39 PM

मुलुंडला टी वॉर्ड च्या हद्दीत जवाहरलाल नेहरू रोड वर फेरीवाल्यानी पूर्ण फूट पाथ अडवून ठेवला आहे म्युनिसिपल ची गाडी आली की पळून जातात आणि गाडी गेली की लगेच परत बस्थान बसवतात. स्थानिक आणि दुकानदार खुप त्रस्त झाले आहेत. असा कुठला अधिकारी नाही का जो कायम चे हे सर्व बंद करून जनतेला चालायला रस्ता मोकळा करून देईल ?

Charudatt    February 5, 2026 01:07 PM

संपूर्ण मुंबई भर कायमस्वरूपी कारवाई केली पाहिजे. तरच सगळे उपरे परप्रांतीय बांगलादेशी पळून जातील आणि मुंबई मोकळा श्वास घेईल. फुकटात जागा बळकावून बेकायदा धंदे करुन संपत्ती जमा करून मुंबईकरांच्या उरावर बसलेत

Jayant Chipkar    February 5, 2026 10:52 AM

Ashich karwai sarva station chya purv paschim donhi bajula karne garjeche aahe BMC la lakh lakh shubhechha

नागेश ठाकूर    February 5, 2026 09:18 AM

महानगर पालिका अधिकाऱ्याचे अभिमानास्पद कामगिरी. अशीच कारवाई दादर स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर होईल का? महानगर पालिकेची गाडी गेल्यावर तेथे परत फेरीवाले असनस्थ होतात.

Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >