मुंबई : मुंबई महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी दहिसर येथील प्रभाग क्रमांक ३ मधून निवडून आलेले आणि मुंबई भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर यांची निवड करण्यात आली. भाजपच्या महापालिका गटनेतेपदी आणि अर्थात सभागृहनेतेपदी गणेश खणकर यांची निवड होणार असल्याचे पहिले वृत्त दैनिक प्रहारने प्रसिद्ध केले होते. हे भाकीत अखेर खरे ठरले असून सोमवारी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयांत भाजपच्या ८९ नगरसेवकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मंगळवारी महापालिका सचिव कार्यालयातील पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
मुंबईतील निवडून आलेले भाजपचे ८९ नगरसेवकांची बैठक महापालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीत भाजपच्या मुंबई महापालिका गटनेतेपदी गणेश खणकर यांची निवड करण्यात आली.यावेळी, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपचे माजी खासदार मनोज कोटक, आमदार पराग आळवणी आणि भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
खणकर यांनी उबाठाचे सौरभ विनोद घोसाळकर यांचा पराभव केला आहे. खणकर हे भाजपचे प्रवक्त ते महामंत्री असल्याने त्यांचे वक्तृत्व,अभ्यासूवृत्ती आणि शांत स्वभाव लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे. खणकर हे सन २०१७मध्ये महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त झाले होते. त्यानंतर काही वर्षांतच त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. महापालिकेत त्यांनी बेस्ट आणि आरोग्य समित्यांमध्ये सदस्यत्व भूषवले होते. संघ स्वयंसेवक असलेले खणकर यांनी १९९२ पासून भाजपचे बुथ प्रमुख म्हणून कामाला सुरुवात केली होती. उत्तर मुंबई जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्षपदापासून ते आता मुंबई भाजपचे महामंत्री आणि पक्ष प्रवक्ते व नगरसेवक अशाप्रकारची पदे त्यांनी भूषवली आहेत.






