मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या घटनेच्या तपासाला गती देण्यात आली असून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने संबंधित विमान कंपनीविरोधात कठोर पावले उचलली आहेत. अजित पवार ज्या कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते, त्या 'व्हीएसआर व्हेंचर' कंपनीचे सखोल ऑडिट करण्याचे आदेश डीजीसीएने दिले असून, त्याचा अहवाल १५ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अपघातग्रस्त 'लिअरजेट ४५ एक्सआर' (मालक - व्हीएसआर व्हेंचर) विमानाच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डीजीसीएने विशेष पथक नेमले आहे. या ऑडिटअंतर्गत कंपनीचे रोजचे कामकाज, वैमानिकांचे लॉगबुक, तसेच विमानांच्या देखभाल आणि तांत्रिक तपासणीशी संबंधित कागदपत्रांची कसून छाननी केली जाणार आहे. विमानांची नियमित तपासणी होत होती का आणि नोंदी अचूक व पारदर्शक पद्धतीने ठेवण्यात आल्या होत्या का, याची विशेष तपासणी केली जाणार आहे.
अजित पवार हे २८ जानेवारी रोजी जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी विमानाने मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. बारामती विमानतळावर लँडिंगचा पहिला प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्यांदा लँडिंग करत असताना विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह अन्य चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर अपघातामागील कारणांचा सखोल तपास करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कंपनीचा इतिहास वादग्रस्त
या अपघाताच्या तांत्रिक आणि वातावरणीय कारणांचा शोध 'एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो' घेत असून, त्याच वेळी डीजीसीएने कंपनीच्या एकूण कार्यपद्धतीवर लक्ष केंद्रित करत विशेष ऑडिट सुरू केले आहे. चौकशीदरम्यान 'व्हीएसआर व्हेंचर' कंपनीचा वादग्रस्त इतिहासही समोर आला आहे. युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने यापूर्वीच या कंपनीच्या विमानांना त्यांच्या हवाई क्षेत्रात प्रवेशास मनाई केली होती. तसेच सप्टेंबर २०२३ मध्ये याच कंपनीच्या ‘व्हिटी-डीबीएल’ या विमानाचा मुंबईत अपघात झाला होता. त्या प्रकरणात विचारलेल्या प्रश्नांना कंपनी समाधानकारक उत्तरे देऊ शकली नव्हती. दरम्यान, माहिती देण्यास टाळाटाळ केल्याच्या पार्श्वभूमीवर १७ डिसेंबर २०२४ रोजी युरोपियन एजन्सीने कंपनीचे 'थर्ड कंट्री ऑपरेटर' प्रमाणपत्र रद्द केले होते. मात्र, हे प्रमाणपत्र एका वर्षानंतर पुन्हा बहाल करण्यात आले होते.






