मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी तरुण आणि अभ्यासू नगरसेवक अमेय घोले यांची निवड करण्यात आली. महापालिका मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत अमेय घोले यांचे नाव गटनेतेपदासाठी जाहीर करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला जे २९ नगरसेवक निवडून येत जे यश लाभले त्यासाठी या बैठकीत ठराव मांडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर दुपारी कोंकण आयुक्तांकडे शिवसेनेकडून कायदेशीर बाबींची पूर्तता करून गट नोंदणी करण्यात येणार असल्याचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.
अमेय घोले हे वडाळा येथील प्रभाग क्रमांक १७८ मधून निवडून आले असून त्यांनी यापूर्वी महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. तसेच इतर समित्यांचेही सदस्यत्व भूषवलेले आहे. एकेकाळी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय होते आणि तत्कालिन शिवसेनेच्या युवा सेनेचे कोअर कमिटीचे ते खजिनदार होते. युवा सेनेच्या जडणघडणीत त्यांचा मोठा हातभार होता. तसेच तरुण आणि अभ्यासू नगरसेवक असल्याने महापालिकेतील त्यांच्या पक्षाची भूमिका ते समर्थपण मांडू शकतील या भावनेने त्यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपवलेली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या २९ नगरसेवकांची नोंदणी कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात पार पडली असून शिवसेनेला सहयोगी गट म्हणून राष्ट्र्वादी काँग्रेसच्या तिन्ही नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सहयोगी गट म्हणून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.






