Monday, February 2, 2026

Mumbai University Exams: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखेत बदल; आता 'या' तारखांना होणार परीक्षा

Mumbai University Exams: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखेत बदल; आता 'या' तारखांना होणार परीक्षा

मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार फेब्रुवारीच्या ९ आणि १० तारखेला होणाऱ्या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठातर्फे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून त्यानुसार आता ९ आणि १० तारखेला होणाऱ्या परीक्षा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.

परीक्षेच्या स्वरूपात कुठलाही बदल नाही

मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जे पेपर ९ आणि १० तारखेला होणार होते ते आता २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येतील.परीक्षेची तारीख जरी बदलण्यात आली असली तरी परीक्षेच्या स्वरूपात कुठलाही बदल नसणार आहे. त्यामुळे आधीच्या वेळापत्रकात जी वेळ दिली होती, त्या वेळेनुसारच २४ आणि २५ तारखेला या परीक्षा होतील. सर्व संबंधित महाविद्यालयांनी या सुधारित वेळापत्रकाची माहिती तातडीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी असे निर्देश देखील विद्यापीठाने दिले आहेत.

म्हणून परीक्षेच्या तारखेत बदल झाला :

खरंतर या निवडणुकांसाठी येत्या ५ फेब्रुवारीला मतदान होऊन ७ तारखेला मतमोजणी करण्यात येणार होती. तसेच त्याच दिवशी निकालही लागला असता. मात्र २८ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार याचे अपघाती निधन झाले. त्या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या शासकीय दुखवट्यामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रम आणि परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर निवडणुकांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.

Comments
Add Comment