Friday, May 8, 2026

बायोफार्मा क्षेत्रात १० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा

बायोफार्मा क्षेत्रात १० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा

नवी दिल्ली : पुढील ५ वर्षांत बायोफार्मा क्षेत्रात १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली. सीतारामन यांनी सांगितले की, ज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील प्रगती साधण्यासाठी राबवली जाणारी ‘बायोफार्मा शक्ती’ रणनीती आरोग्यसेवेमधील भारताच्या डिजिटल इकोसिस्टमला बळकटी देईल. बायोफार्मास्युटिकल (बायोफार्मा) क्षेत्र हे हेल्थकेअर उद्योगातील एक विशेषीकृत आणि वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. पारंपरिक रासायनिक संश्लेषणाऐवजी जिवंत सजीवांपासून जसे की पेशी, प्रथिने, जीन किंवा सूक्ष्मजीव तयार होणाऱ्या औषधांच्या संशोधन, विकास आणि उत्पादनावर या क्षेत्राचा भर असतो. लसी, मोनोक्लोनल अँटीबॉडी आणि जीन थेरपीसारखी प्रगत औषधे कर्करोग, मधुमेह आणि ऑटोइम्यून आजारांसारख्या असंसर्गजन्य रोगांच्या लक्ष केंद्रीत उपचारांसाठी वापरली जातात.

अर्थमंत्री म्हणाल्या की, भारतामध्ये आजारांचे स्वरूप आता संसर्गजन्य आजारांऐवजी मधुमेह, कर्करोग आणि ऑटोइम्यून विकारांसारख्या असंसर्गजन्य आजारांकडे झुकत आहे. दीर्घायुष्य आणि सुधारित जीवनमानासाठी परवडणाऱ्या दरात बायोलॉजिक औषधे अत्यावश्यक आहेत. भारताला जागतिक बायोफार्मा उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी ‘बायोफार्मा शक्ती’ अंतर्गत पुढील पाच वर्षांत १० हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. या योजनेत बायोलॉजिक्स आणि बायोसिमिलरच्या देशांतर्गत उत्पादनासाठी तीन नवीन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च स्थापन करण्यात येणार असून, ७ विद्यमान संस्थांचे उन्नतीकरण करून बायोफार्मा-केंद्रित राष्ट्रीय नेटवर्क उभारले जाणार आहे.

  याशिवाय, १ हजार मान्यताप्राप्त भारतीय क्लिनिकल ट्रायल साइट्सचे राष्ट्रीय नेटवर्क तयार करण्यात येणार असून, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन अधिक सक्षम करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे जागतिक मानकांनुसार वैज्ञानिक परीक्षणाद्वारे ठरावीक कालमर्यादेत औषधांना मंजुरी देणे सुलभ होईल. सरकारी क्षेत्रातील आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी संस्थांचे अपग्रेड आणि विस्तार केले जातील, ज्यामध्ये ऑप्टोमेट्री, रेडिओलॉजी, भूल आणि वर्तणुकीय आरोग्य यांचा समावेश असेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >