Sunday, February 1, 2026

Union Budget 2026: वस्त्रोद्योगासाठी बजेटमध्ये कोणत्या मोठ्या घोषणा झाल्या?, मेगा टेक्सटाइल पार्कसह...

Union Budget 2026: वस्त्रोद्योगासाठी बजेटमध्ये कोणत्या मोठ्या घोषणा झाल्या?, मेगा टेक्सटाइल पार्कसह...

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आपला नववा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विशेषतः रविवारी अर्थसंकल्प सादर होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. देशाच्या आर्थिक विकासासोबतच विविध क्षेत्रांना चालना देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. विशेष म्हणजे वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी मोठा दिलासा देत महत्त्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या.

वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वस्त्रोद्योग क्षेत्राच्या आधुनिकीकरणावर आणि जागतिक स्पर्धेत भारताला पुढे नेण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या. यामध्ये मेगा टेक्सटाइल पार्क,राष्ट्रीय फायबर योजना, मानवनिर्मित फाइबर क्षेत्राचा विस्तार, वस्त्रोद्योग विस्तारासाठी विशेष प्रोत्साहन योजना, राष्ट्रीय हातमाग व हस्तकला कार्यक्रम, टेक्स इको इनिशिएटिव्ह, समर्थ 2.0 योजना – वस्त्रोद्योग क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांशी सहकार्य करणे. या योजनांच्या माध्यमातून उत्पादन क्षमता वाढवणे, रोजगार निर्मिती करणे आणि निर्यातीला चालना देण्यावर भर देण्यात आला आहे.

खादी, हातमाग आणि हस्तकलांना प्रोत्साहन यासोबतच महात्मा गांधी ग्राम स्वराज योजनेअंतर्गत खादी, हातमाग आणि हस्तकला क्षेत्राला विशेष प्रोत्साहन देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. या निर्णयामुळे भारतीय पारंपरिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश सुलभ होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील कारागिरांना मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात सरकारची तीन महत्त्वाचे कर्तव्य सांगितली आहेत. आर्थिक विकासाचा वेग वाढवणे आणि टिकवणे – उत्पादकता वाढवून जागतिक स्तरावर सुविधा निर्माण करणे. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणे – कौशल्य, क्षमता वाढवणे आणि सर्वांना विकास प्रक्रियेत सहभागी करणे. समावेशक विकास – ‘सबका साथ, सबका विकास’ तत्वावर प्रत्येक कुटुंब, समाज व प्रदेशाला साधन, सुविधा आणि संधी समान मिळतील, अशी तीन कर्तव्य त्यांनी सांगितली.

Comments
Add Comment