मौके पे चौका

प्रतिभारंग,प्रा. प्रतिभा सराफ 


एक थोर साहित्यिक अलीकडेच भेटले. त्यांनी त्यांचे पुस्तक माझ्या हातात दिले. त्यांचे वय साधारण पंच्याऐंशीच्या आसपास असावे. सर्वसाधारणपणे कोणतेही पुस्तक आपण हातात घेतल्यावर त्याचे मुखपृष्ठ पाहतो. त्यावरचे चित्र-फोटो - पेंटिंग बघून झाल्यावर आपण त्या मुखपृष्ठावर लिहिलेले शब्द वाचतो आणि आपण सरळ मलपृष्ठाकडे वळतो. मलपृष्ठावरील मजकूर वाचून झाल्यावर आपण पुस्तक सरळ करतो आणि पहिले पान उलटून आतील मजकूर वाचतो आणि मग त्या माणसासमोरच आतली काही पानं चाळल्यासारखी करतो आणि मग पुस्तक मिटून आपण आपल्या बॅगेत, पर्समध्ये वगैरे टाकतो. हे सर्वसाधारण माझे निरीक्षण आहे. त्याचप्रमाणे त्या साहित्यिकाने दिलेल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहिल्यावर पुस्तकाचे मलपृष्ठ पाहिले आणि आ वासले. याचे कारण म्हणजे साधारण तिशीतला आणि साहित्याचे फारसे ज्ञान नसलेल्या एका कवीने या प्रस्थापित साहित्यिकाच्या पुस्तकाची पाठराखण केली होती. स्वभाविकपणाने मी विचारले की सर तुम्ही याच्याकडून पाठराखण घेतली का? तर सर हताशपणे हसले. कुत्सितपणे म्हणाले की माझ्या वयामुळे मला फारसे घराबाहेर पडता येत नाही त्यामुळे या मुलाकरवी मी माझे पुस्तक प्रकाशकाकडे पाठवले आणि माझ्या कामासाठी दोन तीनदा त्याने त्या प्रकाशकाकडे फेऱ्याही मारल्या. पुस्तक छापून झाल्यावर टॅक्सीत घालून तोच घरी घेऊन आला आणि मी चक्क उडालो. एक नाही दोन नाही चक्क हजार प्रतींवर त्याच्या पाठराखणची मोहोर उमटलेली होती. करणार काय? त्याने मौके पे चौका मारला होता.


सरांचे बोलणे झाले. त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर वेगळाच ताण दिसत होता. खरं तर त्यांना हे सांगताना खूप दुःख होत होते; परंतु त्याचा काहीच उपयोग होणार नव्हता.


हा प्रसंग विस्मृतीत जात नाही तर असाच एक नवीन प्रसंग पाहण्यात आला. एका माणसाने आपल्या पुस्तकाचे काम एका तरुणाकडे सोपवले. खरंतर त्या माणसाचे ते आत्मचरित्राचे पुस्तक होते; परंतु या तरुण माणसाने व्यवस्थितपणे आपले असंख्य फोटो त्या पुस्तकांमध्ये टाकून दिले होते, ज्याचा त्या पुस्तकाशी काहीही संबंध नव्हता. ज्या व्यक्तीचे आत्मचरित्र होते त्यांनी काही फोटो तपासून, पडताळून पुस्तकासाठी, याच्याकडून पाठवले होते; परंतु या माणसाने आपले पितळ उजळवून घेतले होते.
एकदा एका कवीने कविता स्पर्धा आयोजित केली. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून सर्व नवोदित कवींनी आपापल्या उत्तम रचना स्पर्धेसाठी पाठवल्या. त्या स्पर्धांचा निकाल काही शेवटपर्यंत लागला नाही; परंतु ज्या कवीने ही स्पर्धा आयोजित केली होती त्याची सहा महिन्यांनंतर दोन कवितांची पुस्तकं बाजारात आली. ही वरवर साधी घटना वाटली तरी दोन नवोदितांनी आपल्याच कविता थोड्याफार फरकाने या संग्रहात असल्याचा त्याविषयीचा तक्रारीचा सूर आळवला; परंतु तो कवी प्रस्थापित होता. त्यामुळे या बिचाऱ्यांचे सूर हवेतच विरले.
एका नवोदित लेखकाने आपला लेखसंग्रह प्रस्थापित लेखकाला प्रस्तावनेसाठी दिला. वर्षभर त्यांच्याकडे पडून होता. लेखक दिग्गज असल्यामुळे नवोदित लेखक वाट पाहत राहिला आणि त्याची वाट लागली. कारण त्या प्रस्थापिताच्या नावाने तो लेखसंग्रह प्रसिद्ध झाला.
अशा छोट्या मोठ्या घटना आसपास घडतच असतात. आपण म्हणतो की, तळे राखील तो पाणी चाखेलच ना! परंतु किती पाणी चाखावं आणि हंडे भरून किती पाणी घेऊन आपल्या घरातल्या टाक्या भराव्यात, यालाही काही मर्यादा असते!
चालायचंच म्हणून आपण सोडून देतो. असे समोरचा माणूस सोडून देतो हे लक्षात आल्यावर चौर्यकर्म वाढत जाते आणि मग काहींची तीच सवय होत जाते.

एकदा एका कवी संमेलनात परीक्षक म्हणून जाण्याचा योग आला. साधारण सत्तर-पंच्याहत्तर कवी तरी असतील. दहा एक कवींची कविता वाचून झाल्यावर थोडेसे कंटाळवाणे वाटत असतानाच चक्क एका कवीने माझीच कविता सुरू केली. कवितेला टाळ्या पडत होत्या याचा मला खूप आनंद होत होता. कविता पूर्ण वाचून झाल्यावर मी विचारले,
तुझे वय काय?
त्याने उत्तर दिले,
“एकोणवीस वर्ष.”
मी त्याला सांगितले,
“ही कविता साधारण पंचवीस वर्षांपूर्वी छापून आलेली आहे.”
आयोजक, प्रायोजक यांच्यासहित सर्व कवी माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागले. कविता वाचणारा कवी तर हडबडून गेला. मग मी त्याला सांगितले की, माझीच कविता आहे. मी तुझ्याच वयाची असताना माझ्या कॉलेजच्या मासिकात ही छापून आलेली आहे.”
तो फक्त ‘सॉरी’ म्हणाला आणि आपल्या जागेवर जाऊन बसला. पुढचा कवी येऊन कविता सादर करत होता तेव्हा हा चोर कवी मागच्या दरवाजाने हळूच सटकला.
अशी वेगवेगळी अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत. प्रत्येक वेळेस मौके पे चौका मारून आपल्याला हवे ते प्राप्त होतेच असे नाही, कधी कधी यामुळे तोंडघशी पडायची पाळी येते, हेही लक्षात घेतले पाहिजे!
***
चांगल्या माणसांच्या गप्प राहण्यामुळे वाईट माणसांचे फावते.
असे मौके पे चौका मारणारी माणसे आपल्याला सातत्याने भेटत असतात. चल यार, खूप दिवसांत पार्टी केली नाही; असं म्हणून आपल्याला पार्टीला घेऊन जातात आणि बिल येण्याच्या क्षणी वॉशरूममध्ये जाऊन बसतात किंवा फोन हातात घेऊन, अरे ऐकू येत नाही... थांब जरा रेंजमध्ये येतो; म्हणत हॉटेलबाहेर निसटतात. त्यामुळे काहीच उपाय नसल्यासारखे आपल्याला बिल भरावे लागते. अशा वृत्तीच्या मित्रांपासून आपण सावध राहायला शिकले पाहिजे! मौके पे चौका मारणाऱ्या चांडाळ-चौकडींपासून चमडी बचाव करायला शिकले पाहिजे!
Comments
Add Comment

राजकारणापलीकडचे दादा

महाराष्ट्राच्या राजकारणावर वेगळा ठसा उमटवणारा नेता अशी अजितदादांची ओळख होती. मोठ्या झाडाखाली छोटी झाडे तगत

डिजिटल प्रतिकृती

तंत्रवेध,डॉ. दीपक शिकारपूर  डिजिटल ट्विन तंत्रज्ञान एखादी भौतिक वस्तू किंवा प्रक्रियेचे तपशीलवार आभासी

आतापी-वातापीची कथा

महाभारतातील मोतीकण,भालचंद्र ठोंबरे पूराणात देवदेवतांच्या तसेच राक्षसांच्या विविध कथा आहेत. राक्षसांच्या

गर्दीतला एकटेपणा

संवाद ,निशा वर्तक जूबाजूला माणसांची गर्दी आहे. घरात तर आजूबाजूला अनेक चेहरे आहेत पण मोबाईलमध्येच व्यस्त आहेत.

जा तुझको सुखी संसार मिले...

नॉस्टॅल्जिया,श्रीनिवास बेलसरे ‘नील कमल’ नावाचा केदार शर्मा यांचा एक सिनेमा आला होता १९४७ साली. राज कपूर आणि

टीनेज मुलांशी वागण्याच्या प्रभावी स्ट्रॅटेजी

आनंदी पालकत्व,डाॅ. स्वाती गानू आपली आजकालची Gen Z अर्थात entitled teen म्हणजेच ज्यांना असं वाटतं की आम्ही सगळ्यात श्रेष्ठ