Sunday, February 1, 2026

गर्दीतला एकटेपणा

गर्दीतला एकटेपणा

संवाद ,निशा वर्तक

जूबाजूला माणसांची गर्दी आहे. घरात तर आजूबाजूला अनेक चेहरे आहेत पण मोबाईलमध्येच व्यस्त आहेत. मोबाईलवर सतत संदेश येतात, सोशल मीडियावर “कनेक्टेड” असल्याचा भास आहे. तरीही अनेक जण रात्री उशीवर डोकं टेकवताना एकच प्रश्न स्वतःलाच विचारतात-“माझं खरंच कुणी आहे का?”

हा प्रश्नच सांगून जातो की, आजचा सर्वात मोठा आजार कोणता आहे. गर्दीतही जाणवणारा एकटेपणा.

खरं तर माणूस जन्माला येतो तो एकटाच येतो आणि जातो तेव्हाही एकटाच जातो, पण जगण्यासाठी त्याला आपलं कुणीतरी सोबत हवेच असतं! मला तर वाटतं ही तर प्रत्येक जीवाची गरज असते. बघा ना दोन चिमण्या किती आनंदी दिसतात‌, दोन कुठलेही पक्षी, दोन मांजरीची पिल्ले, दोन कुत्र्यांची पिल्ले किती छान खेळत असतात! पण एकटा पक्षी किंवा एकटा प्राणीही उदासवाणाच दिसतो. माणसांचेही तसेच आहे. माणूस हा तर समाजशील प्राणी आहे. पण हा एकटेपणा आवाज करत नाही. तो हळूच मनात घर करतो आणि जेव्हा लक्षात येतं, तेव्हा आतून माणूस मोडलेला असतो, मिटून जातो.

घर सांभाळताना, संसार उभारताना स्त्री स्वतःला मागे ठेवते. मुलं लहान असताना ती गरजेची असते; पण मुलं मोठी झाली की तिची उपस्थिती गृहित धरली जाते. मुलं आपापल्या आयुष्यात गुंततात, नातवंडांची जबाबदारी किंवा “तुझं काम संपलं” अशी अपेक्षा तिच्यावर येते. नवरा अनेकदा तिच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो. “तुला काय काम आहे?”, “उगाच विचार करू नकोस” ही वाक्यं तिच्या वाट्याला येतात. या टप्प्यावर ती स्त्री गर्दीत असूनही एकटी होते. तिचं दुःख कुणाला सांगता येत नाही, सांगितलं तरी गांभीर्याने घेतलं जात नाही. हळूहळू तिचं बोलणं कमी होतं, हसू मावळतं. नैराश्य, रक्तदाब, थायरॉईड, झोपेच्या तक्रारी हे सगळं केवळ शारीरिक आजार नसतात, तर भावनिक एकटेपणाची लक्षणं असतात. एकटेपणा म्हणजे फक्त मोठ्यांचा प्रश्न नाही. आज अनेक घरांत लहान मुलंदेखील एकटी आहेत. आई-वडील दोघंही नोकरीत, वेळेची कमतरता. मुलाच्या हातात मोबाईल, टीव्ही, गेम्स देऊन “तो अडत नाही” यावर समाधान मानलं जातं. पण या मुलाच्या मनात साठत असलेले प्रश्न कुणी ऐकत नाही. त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात, पण ते अनुत्तरीतच राहतात कारण प्रश्नांची उत्तरे द्यायला कुणाला वेळच नसतो. शाळेत होणारा दबाव, मित्रांकडून होणारी चेष्टा, अभ्यासाची भीती, शरीरातील बदल हे सगळं त्याच्या मनात चालू असतं. पण घरात कुणाशी मोकळं बोलायचं? या एकटेपणातून काही मुलं आतल्या आत खचतात, काही आक्रमक होतात, तर काही व्यसनांच्या दिशेने वळतात. आत्महत्यांचे वाढते प्रमाण हे या न ऐकलेल्या एकटेपणाचं भीषण रूप आहे. प्रेमभंग, घटस्फोट आणि जोडीदार गमावल्यावरचा एकटेपणा तर भयंकर असतो. ज्याच्यासोबत आयुष्य घालवायचं ठरवलं, तोच माणूस अचानक निघून जातो. प्रेमभंगामुळे, घटस्फोटामुळे किंवा मृत्यूमुळे. मग घरात माणसं असली तरी रिकामेपणा भरून न निघणारा असतो. सकाळी उठल्यावर कुणाशी बोलायचं नाही, रात्री कुणासाठी वाट पाहायची नाही ही शांतता खूप बोचरी असते. वृद्ध माणसांबद्दल बोलायचे तर ती खरोखर बिचारी झालीत आताच्या जगात. कुणीच बोलायला किंवा त्यांची नुसती चौकशी करायलाही कुणाला वेळ नसतो. आता नाईलाजाने आजी-आजोबांचा सुद्धा मोबाईल हाच दोस्त झालेला दिसतो. त्यांनाही संवादाची भूक असते आणि म्हातारपणी तर ती अधिक असते पण ती भूक भागवायला ना नातवंड असतात ना मुले ना सुना! माणसाला संवादाबरोबर स्पर्शाची भूक सुद्धा असते. प्रेमाच्या, लाडाच्या स्पर्शासाठीही माणूस आसुसलेला असतो. एक अनुभव सांगते... मला एकदा माझ्या एकट्याच राहणाऱ्या मैत्रिणीकडे एक रात्र राहण्याचा योग आला होता. तिचा नवरा जाऊन चार-पाच वर्षे झाली होती. तिची मुले दुसरीकडे राहत होती, सर्व ठीक होते आर्थिक परिस्थितीही चांगली होती. वयाची पासष्टी ओलांडली होती, पण एकटीच राहत होती. आता तिला सवय झाली होती एकटी राहण्याची. पण त्या दिवशी रात्री मी गप्पा मारता मारता तिच्या शेजारीच झोपले आणि रात्री झोपेत मी माझा हात तिच्या अंगावर टाकला आणि तिला जवळ घेतले! तिने माझा हात तसाच घट्ट धरला आणि मला जाग आली तर ती घळघळा रडू लागली आणि म्हणाली ‘किती दिवसांनी मला हा प्रेमळ मानवी स्पर्श मिळाला गं! किती वर्षात मला कुणी प्रेमाने जवळ घेतले नाही.’ बघा किती एकटं वाटत होते तिला, प्रेमाच्या स्पर्शाची भूक होती तिला. रोज एकटेपणात जगत होती ती, सवय करून घेतली होती तिने‌ एकटेपणाची. सुरकुतलेल्या चेहऱ्याची आजीही नातवंडांच्या स्पर्शासाठी भुकेली असते. कधी आजीला जवळ घेऊन तिचे सुरकुतलेले गाल थोडे लाडात ओढून तिला जर म्हंटल ‘आजी तू किती गोड आहेस!’ तर बघा तिचा चेहरा कसा फुलेल. अनेक जण स्वतःलाच दोष देत राहतात “माझ्यातच काहीतरी कमी होतं”. समाजाची कुजबुज, नातलगांचे सल्ले, सहानुभूतीच्या नावाखाली टोमणे हे सगळं एकटेपणा अधिक तीव्र करतं. काही जण आयुष्याला कंटाळतात, तर काही जिवंत असूनही आतून मेलेले असतात. एकटेपणा हा फक्त भावना नाही, तो आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे. दीर्घकाळ एकटे राहिल्यामुळे नैराश्य, चिंता, स्मरणशक्ती कमी होणे, चिडचिड, आत्महत्येचे विचार निर्माण होतात. संशोधन सांगतं की दीर्घकालीन एकटेपणा हा धूम्रपानाइतकाच आरोग्यास घातक आहे. पण तरीही आपण याकडे दुर्लक्ष करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन मोकळं करणं. कुणीतरी आपलं ऐकून घेणं आणि आपण कुणाचं ऐकून घेणं ही देवाण-घेवाण गरजेची आहे. स्त्रियांनी स्वतःच्या भावना दाबून न ठेवता व्यक्त करणं, स्वतःसाठी वेळ काढणं, आवडी जोपासणं महत्त्वाचं आहे. पालकांनी मुलांसाठी वेळ काढणं नाही, तर देणं गरजेचं आहे. दररोज थोडा वेळ तरी मोबाईल बाजूला ठेवून मुलांशी संवाद साधणं, त्यांना न ऐकता समजून घेणं आवश्यक आहे. प्रेमभंग किंवा जोडीदार गमावल्यावर समुपदेशन घेणं, आधारगटांमध्ये सहभागी होणं, सामाजिक कामात स्वतःला गुंतवणं हे एकटेपणावर औषध ठरू शकतं. ध्यान, व्यायाम, लेखन, वाचन, संगीत या गोष्टी मनाला आधार देतात. गर्दी वाढते आहे, पण माणुसकी कमी होते आहे. अशा काळात एखाद्याला “तू कसा आहेस?” असा मनापासून विचारलेला प्रश्नही औषध ठरू शकतो. कारण एकटेपणा अनेकदा माणसाला मारत नाही, पण हळूहळू जगण्याची इच्छा संपवतो. एकमेकांना ऐकू या, समजून घेऊ या. कारण गर्दीतही एकटं असणं ही आजची सर्वात मोठी वेदना आहे.

Comments
Add Comment