मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली. पक्षाचे सर्व अधिकार प्रफुल्ल पटेल यांच्या हातामध्ये देण्यात आल्याचे विधान भाजपाचे नेते पियुष गोयल यांनी केले. गोयल यांच्या विधानामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असा काही निर्णय झालेला नाही अशी स्पष्ट माहिती तटकरे यांनी दिली आहे.
'राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा पण पटेल नाही' राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही ! असे ट्वीट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या ट्वीटला सुनील तटकरे यांनी उत्तर देताना म्हटले की, "राज ठाकरे यांनी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही एकत्रित बसून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या, आमदारांच्या भावना या लक्षात घेऊन निर्णय घेऊ"
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर येत होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या पूर्णपणे निराधार, तथ्यहीन असल्याचे स्वत: प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांमध्ये दाखवल्या जात असून या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत आणि त्यात काहीही तथ्य नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी एक्स पोस्टद्वारे दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाही तत्त्वांवर चालणारा पक्ष असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी, आमदारांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन तसेच आमच्या सर्व पक्ष सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा आदर करूनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल असेही प्रफुल पटेल यांनी सांगितले. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून, अशा बाबींमध्ये आम्ही विहित प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करतो असा स्पष्ट खुलासाही प्रफुल पटेल यांनी एक्स पोस्टमध्ये केला आहे.






