महाराष्ट्राच्या राजकारणावर वेगळा ठसा उमटवणारा नेता अशी अजितदादांची ओळख होती. मोठ्या झाडाखाली छोटी झाडे तगत नाहीत; परंतु अजितदादा त्याला अपवाद होते. राज्याच्या प्रश्नांची खडानखडा माहिती आणि दूरदृष्टीने निर्णय घेणारा झुंजार नेता म्हणून त्यांची ओळख होती. विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. मुख्यमंत्री व्हायचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही, ही रूखरूख महाराष्ट्राला राहील.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजकीय वारसा लाभला असला, तरी ते त्या माध्यमातून राजकारणात आले नाहीत. राजकारणी अजितदादा सर्वांना माहीत आहेत; परंतु त्या पलीकडचे अजितदादा अनेकांना माहीत नाहीत. नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरामध्ये त्यांचा जन्म झाला. अण्णा पाटील कदम हे त्यांचे मामा. दादा राजकारणात कुठेही असले, तरी त्यांनी नातेसंबंध कटाक्षाने जपले. नगर जिल्ह्यात आले, की ते आजोळी जायचे. वेळात वेळ काढून त्यांना भेटायचे. विचारपूस करायचे. विरोधी पक्षात असले, तरी अजितदादांनी राजकारण आणि नातेसंबंध वेगळे ठेवले. अन्य कुणाशी नातेसंबंध असले, तरी त्यांच्याही भेटी अजितदादा घेत. अजितदादा राजकारण्यापेक्षा माणूस म्हणून मोठे होते. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीकडे पाहता येईल. प्रचारासाठी जात असताना त्यांनी एक अपघात पाहिला तेव्हा तिथे थांबून अपघातातील जखमीला तातडीने रुग्णालयात पाठवले. हे अपवादात्मक उदाहरण नाही. नगर जिल्ह्यात एका अपघातातील जखमीसाठी स्वतःची गाडी थांबवली. त्या गाडीतच रुग्णाला दवाखान्यात पाठवून उपचाराची व्यवस्था केली आणि दादा दुसऱ्याच्या गाडीत पुढे निघून गेले. दादा असे माणुसकी जपणारे होते.
दादा उपमुख्यमंत्रीपदी असताना वाढदिवसादिवशी त्यांच्या मुंबईच्या बंगल्यावर जाण्याचा योग आला. सकाळी साडेसहा वाजता तिथे पोहोचलो, तर दादा एका बैठकीत होते. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आमच्यासोबत विदर्भातील काही कार्यकर्तेही आले होते. त्यांची काही सार्वजनिक कामे होती. दादांनी त्यांच्या आमदाराकडून ती जाणून घेतली आणि आमदारालाच खडसावले. या लोकांना घेऊन इतक्या लांब येण्याची काय गरज होती, त्यांना किती त्रास झाला. त्यांची कामे तिथेच व्हायला हवी होती. त्यानंतर त्यांनी या कार्यकर्त्यांची आस्थेने चौकशी केली. त्यांना नाष्टा दिला. ते कसे आले, याची माहिती घेतली. पैसे आहेत का, हे विचारले. आलाच आहात, तर आता मुंबई पाहा आणि गावी जाईपर्यंत तुमचे काम झालेले असेल, असा शब्द दिला. आमदाराला बोलावून संबंधित कार्यकर्त्यांचा खर्च तुम्ही करा, असे बजावले. पैसे नसल्यास माझ्याकडून घ्या, असे सांगायला ते विसरले नाहीत. हे कार्यकर्ते मुंबईहून विदर्भात पोहोचण्याअगोदरच काम झाले होते. पवार कुटुंबाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वेळ चोख पाळणे. अजितदादा त्या परंपरेत बसणारे. अजितदादा दिलेल्या सभांना वेळेवर उपस्थित राहत. अजितदादा स्पष्टवक्ते होते. काम होणार असेल, तरच ‘हो’ म्हणत. होणार नसेल तर तसे स्पष्ट सांगणार. नियमात बसत असेल, तरच काम करणार. नसेल होत तर तसे सांगणार. राजकारणी नेत्यांमध्ये अपवादाने आढळणारा हा गुण अजितदादांकडे होता.
आज त्यांची आठवण काढताना अनेक वर्षे मागे जायला होते. कोल्हापूर येथून शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर अजितदादांनी काटेवाडीमध्ये शेती करायला सुरुवात केली. प्रारंभी त्यांनी टोमॅटोची लागवड केली. टोमॅटोचे हे पीक पाहण्यासाठी दुरून शेतकरी येत असत. त्यानंतर दादांनी शेती क्षेत्रात विविध प्रयोग केले. दुधाचा व्यवसाय केला. जनावरांची खरेदी केली. त्या वेळी ते जनावरांसाठी बाजारातून स्वतः कडबा खरेदी करत. याशिवाय त्यांनी कुक्कुटपालन व्यवसायही केला. हे सगळे उद्योग करताना सगळी कामे ते स्वतः करत. दादांनी काटेवाडी ते कन्हेरी परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले. लोकांना मदत करण्याची त्यांची भूमिका आधीपासूनच पाहायला मिळालेली. लोकांनी मांडलेले प्रश्न, अडीअडचणी घेऊन ते शरद पवार यांच्याकडे जात. तिथे प्रश्न मार्गी लावत असत. अशा पद्धतीने समाजकारण करता करता अजितदादा राजकारणाच्या वाटेवर येऊन उभे राहिले. वेगवेगळी खाती सांभाळताना अजितदादांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. दादांचा राजकारणापर्यंतचा प्रवास एक प्रगतशील शेतकरी, लघुउद्योजक, संचालक, अध्यक्ष, उपमंत्री, मंत्री आणि उपमुख्यमंत्री असा टप्याटप्याने झाला. प्रत्येक पदावर उत्तम काम केल्यामुळे त्यांना पुढची संधी मिळत गेली. प्रत्येक पदाची जबाबदारी सांभाळताना दादांनी त्यांची योग्यता, गुणवत्ता सिद्ध केली. म्हणूनच वारसा म्हणून दादा राजकारणात आले किंवा त्यांना पदं मिळाली असे अजिबात झाले नाही.
अजितदादा आणि कार्यकर्ते हे समीकरण महाराष्ट्राला नव्याने सांगायची गरज नाही. एखादा कार्यकर्ता दादांशी जोडला गेला, तर मग जीव गेला तर बेहत्तर; पण दादांसाठी वाट्टेल ते करण्याची कार्यकर्त्यांची तयारी असे. कार्यकर्त्यांची कानउघाडणी करताना दादांचा उद्देश कधीच चुकीचा नसायचा. लोकांची कामे व्हावीत, पक्ष पुढे जावा हेच दादांना अभिप्रेत असायचे. दादा अहोरात्र काम करून जनतेच्या प्रश्नांना महत्त्व देत. कार्यकर्त्यांची पदावरून भांडणे दादांना पटायची नाहीत. म्हणनूच ते थोडा कठोर पवित्रा घेऊन कार्यकर्त्यांना तंबी देत. दादांच्या चिडण्यामागे लोकांची विधायक कामे पूर्ण होण्यासाठीची तळमळ असते, हे कार्यकर्त्यांना चांगलेच ठाऊक असायचे. अजितदादांनी जलसंपदा मंत्री या पदाची धुरा सांभाळताना, कार्यभार पाहताना महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा अत्यंत बारकाईने आणि गांभीर्याने अभ्यास केला होता. यातून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत होणारी घट आणि त्यातच राहणारी पावसाची अनियमितता यांसारखे अनेक प्रश्न समोर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. यावर तोडगा म्हणून धरण बांधकामाची सुरुवात, कॅनॉल, कालवे इत्यादी कामे त्यांनी प्राधान्याने पूर्णत्वाला नेली. याशिवाय ‘पाणी साठवण योजने’यासारख्या योजना राबवल्या. यामुळे पाण्याची अडचण दूर झाली. दादा जितके कठोर, तितकेच मिश्कील होते. फिरक्या घ्यायला ते कमी करत नसत. गोदावरी खोऱ्याच्या पाण्यावरून नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष सुरू असताना नाशिक-नगरच्या नेत्यांना ते हसत सांगायचे, की मराठवाड्याला पाणी देऊ द्या. तिथे माझी सासुरवाडी आहे. घरच्यांचं मन जपायला तेवढं तरी करू द्या!
महाराष्ट्रातील विविध पाटबंधारे योजनांना गती देताना ठिबक आणि अनेक नव्या तंत्रज्ञानाच्या बीज प्रक्रियांचे निर्णय त्यांनी घेतले. खोरेनिहाय धरण, पाटबंधारे, पाणलोट यासंदर्भात सर्वांगीण विचार करताना दादांनी धडक कामे मार्गी लावली. अजितदादांच्या राजकारणाचा मोठा भाग हा लोकांच्या आयुष्याशी निगडित होता. तिथे इतर नेत्यांसारखा गरळ ओकण्याचा विषय नसतो. दादा नेहमीच महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी रात्रंदिवस एक करत असत. सत्ता असो वा नसो; दादा अविरत काम करत असत, हे महाराष्ट्राला माहीतच आहे. दादा आणि बळीराजा यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे नाते होते. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीमध्ये बळीराजाला प्रचंड कष्ट सोसावे लागतात. बळीराजाची ही अवस्था पाहून दादा दुष्काळातील जनतेला दिलासा देण्यासाठी उन्हातान्हात फिरत. त्यातून दुष्काळग्रस्त शेतकरी, पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा फिरणाऱ्या माता-भगिनी, पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे चिंतेत असणारे छोटे कारखानदार यांना दुष्काळाच्या दुष्टचक्रातून निश्चितच काहीसा आश्चर्यकारक दिलासा देणारा निर्णय दादा तळमळीतून घेत. महिला शिकून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यास कुटुंबाला उभे करते. त्यामुळे महिला सबलीकरण हा विषय अजितदादांच्या अजेंड्यावर होता. महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ५० टक्के राखीव जागांचा निर्णय दादांच्या पुढाकारातून झाला. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा खूप मोठा निर्णय होता.
बळीराजा, महिला, युवक, दलित, आदिवासी यांचा विकास हा दादांच्या राजकारणाचा गाभा होता. दादांनी या उपेक्षित वर्गासाठी घेतलेले निर्णय त्यांना या वर्गाचा तारणहार म्हणून सिद्ध करतात. दादा स्वतः शेतकरीपुत्र होते. त्यांना शेतकऱ्यांचे दुःख समजत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ते नेहमीच आक्रमक भूमिका घेताना दिसले. कर्जमाफी, नुकसानभरपाई, पीक विमा योजना अशा विषयांवर त्यांनी वेळोवेळी सरकारवर दबाव आणला. त्यामुळे ग्रामीण भागात त्यांची कायम लोकप्रियता राहिली. राजकारणात अनेकदा नेते संभ्रमात राहतात; मात्र अजित पवार यांनी नेहमीच स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली. नेतृत्व म्हणजे सर्वांनाच खूश करणे नसते, तर योग्य वाटणारा मार्ग निवडणे असते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले होते. सरकारी फाईलींचा ढीग न करता निर्णय त्वरित घेणे, अधिकाऱ्यांकडून वेळेत काम करून घेणे हा त्यांचा स्वभाव होता. काही वक्तव्ये, काही निर्णय आणि सत्तासंघर्ष यामुळे ते टीकेचे धनी झाले होते; मात्र त्यांनी कधीही टीकेमुळे काम थांबवले नाही. लोकशाहीमध्ये टीका अपरिहार्य असते. त्यातून शिकत पुढे जाणे, हीच परिपक्व नेतृत्वाची खूण असते. अजित पवार यांनी स्वतःला वेळोवेळी बदलत, सुधारत पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता. मोठ्या पदावर असूनही त्यांनी जनतेशी असलेला संपर्क तुटू दिला नाही. त्यांच्या वाटचालीत चढ-उतार आले, वाद झाले, टीका झाली; पण काम करण्याची जिद्द मात्र कायम राहिली. आजच्या राजकारणात केवळ घोषणांची गर्दी दिसते. प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवणारे नेते दुर्मीळ होत चालले आहेत. त्यात अजित पवार होते. दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत.