नवी दिल्ली: भारताचे अर्थमंत्री निर्मला सितरमण यांनी आज अर्थसंकल्पाची मांडणी केली.२०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सेमीकंडक्टर आणि (रेअर अर्थ) खनिजांच्या क्षेत्रात घोषणा करत भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा ठोस रोडमॅप मांडला आहे. या घोषणांमुळे या धोरणात्मक क्षेत्रांतील चीनवरील अवलंबित्व कमी होऊ शकते
अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस, साठीची उत्पादन-आधारित प्रोत्साहन (पिएलआए) योजना ४०,००० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव जाहीर केला. यासोबतच ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथे समर्पित दुर्मिळ पृथ्वी खनिज कॉरिडॉर उभारण्यात येणार असून त्यासाठीही ४०,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहने, संरक्षण, नवीकरणीय ऊर्जा आणि हायटेक उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाचा देशांतर्गत पुरवठा मजबूत होणार आहे.
सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी सरकारने ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन २.०’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेचा उद्देश चिप उत्पादन क्षमता वाढवणे, संपूर्ण पुरवठा साखळी सक्षम करणे आणि भारताला जागतिक सेमीकंडक्टर हब बनवणे हा आहे. याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारातही दिसून आला असून डिक्सन टेक्नॉलॉजीज, सीजी पॉवरसह अनेक चिपमेकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये ६ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली.
याशिवाय, भारताला जागतिक बायोफार्मास्युटिकल उत्पादन केंद्र बनवण्यासाठी ‘बायोफार्मा शक्ती’ योजना सुरू करण्याचीही घोषणा करण्यात आली. एकूणच, Budget 2026 मध्ये तंत्रज्ञान, उत्पादन आणि धोरणात्मक खनिजांवर दिलेला भर भारताच्या आर्थिक आणि सामरिक क्षमतेला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.






