मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील दुर्दैवी विमान अपघातातील निधनानंतर, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. या धक्कादायक घटनेतून सावरत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) पक्षाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली असून, आज त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगामुळे कोणताही गाजावाजा न करता, मोजक्याच नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा पार पडला. अजित दादांच्या जाण्याने निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी आणि पक्षाची विखुरलेली मोट बांधण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता राज्याच्या आणि पक्षाच्या नेतृत्वाची सर्व सूत्रे सुनेत्रा वहिनींच्या हाती असतील.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढत राष्ट्रवादी काँग्रेसने नेतृत्वाची सूत्रे त्यांच्या पत्नी ...
कोण आहेत सुनेत्रा पवार?
१८ ऑक्टोबर १९६३ रोजी धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे जन्मलेल्या सुनेत्रा पवार यांना माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या रूपाने राजकीय वारसा माहेरूनच मिळाला होता. १९८५ मध्ये अजित पवार यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी बारामतीतील काटेवाडीतून आपल्या सामाजिक कार्याचा श्रीगणेशा केला. सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीमध्ये ग्रामस्वच्छता मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली. पहाटे स्वतः हातात झाडू घेऊन त्यांनी सुरू केलेल्या या चळवळीने गावाला राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून दिले. त्यांच्या या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली, ज्यामुळे त्यांना 'सार्क' परिषदेत सहा देशांच्या राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याचा बहुमान मिळाला. 'एनव्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया'च्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण रक्षणासह मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि महिलांमध्ये कर्करोग जागृती असे आरोग्यविषयक उपक्रम राबवले. तसेच 'बारामती टेक्सटाईल पार्क'च्या अध्यक्ष म्हणून त्यांनी हजारो महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर, त्यांच्या या प्रदीर्घ सामाजिक अनुभवाचा राज्याला मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान
सुनेत्रा पवार यांचा हा प्रवास सोपा नव्हता. लग्नानंतर त्यांनी केवळ राजकीय पत्नीची भूमिका न बजावता, प्रत्यक्षात जमिनीवर उतरून काम केले. शेतात काम करणे असो, पोल्ट्री व्यवसाय सांभाळणे असो किंवा गाई-गुरांचे दूध काढणे, ही सर्व कष्टकरी कामे त्यांनी आनंदाने केली. अजित दादांच्या प्रत्येक राजकीय चढ-उतारात त्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. घर आणि नातेसंबंध जपण्यासोबतच, कठीण प्रसंगी दादांना योग्य राजकीय सल्ला देण्यात सुनेत्रा वहिनींचा मोठा वाटा होता. आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन त्यांनी केवळ अजित दादांचा वारसाच पुढे नेला नाही, तर राज्यातील महिलांसाठी राजकारणाचे एक नवे शिखर सर करून दाखवले आहे.
लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीने सुनेत्रा पवार यांना प्रत्यक्ष राजकारणाच्या रणांगणात उतरवले. जरी सुप्रिया सुळे यांच्या विरोधातील निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला, तरी खचून न जाता त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन त्यांनी या पराभवाचे विजयात रूपांतर केले आहे. लोकसभेतील पराभवानंतर पक्षाने त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली. विशेष म्हणजे, राज्यसभा खासदार म्हणून अल्पकाळातच त्यांनी आपली छाप पाडली. त्यांना संसदेच्या तालिका अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी मिळाली, ज्यामुळे देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे कामकाज चालवण्याचा मानही त्यांना मिळाला. संसदेचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या सुनेत्रा पवार आता राज्याच्या मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे पद भूषवणार आहेत. यापूर्वी पवार कुटुंबाच्या प्रत्येक निवडणुकीत सुनेत्रा वहिनी प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळत असत. बारामतीमधील अनेक ऐतिहासिक विजयांमध्ये त्यांचा पडद्यामागून मोठा वाटा राहिला आहे. मात्र, अजित दादांच्या निधनानंतर आता त्या स्वतः राज्याच्या राजकारणाचे मुख्य केंद्र बनल्या असून, त्यांच्या रूपाने राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री लाभली आहे.






