बेपत्ता नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
कल्याण : पक्षाचा आदेश न मानणाऱ्या ठाकरे गटातील चार नगरसेवकांविरोधात उबाठा गट आक्रमक झाला असून, बेपत्ता ४ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती उबाठा पक्षाचे शहर प्रमुख बाळा परब, गटनेते उमेश बोरगावकर आणि पक्ष प्रतोद संकेश भोईर यांनी दिली. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील त्या चार प्रभागांत पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत उबाठा गटाचे ११ नगरसेवक निवडून आले. मात्र निवडून आल्यापासून कल्याणमधील मनसेतून ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक राहुल कोट आणि नगरसेविका स्वप्नाली केणे या नॉटरिचेबल आहेत, तर शिवसेना शिंदे गटातील ठाकरे गटातून निवडून आलेले मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे नगरसेवक देखील बेपत्ता आहेत. याबाबत उबाठा गटाच्या वतीने त्यांना पक्षाच्या बैठकीला हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र या बैठकीला आणि कोकण विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणीला देखील हे चारही नगरसेवक गैरहजर राहिल्याने उबाठा गटाने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
याबाबत शुक्रवारी कल्याणच्या शिवसेना शहर शाखेमध्ये नगरसेवक आणि शहर प्रमुख यांच्यासोबत बैठक पार पडली. जे चार नगरसेवक मशाल चिन्हावर निवडून आले आहेत मात्र त्यांना व्हीप मान्य नाही अशा चारही नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केले असल्याची माहिती दिली.






