महाड ( वार्ताहर): महाड विधानसभा मतदारसंघ हा गेल्या ४ टर्म शिवसेनेचा बालेकिल्ला राहीला आहे. गतवेळच्या निवडणुकीत शिवसेनेमध्ये फूट पडल्या नंतरही हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात आ. भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वा खाली शिवसेना शिंदे गटाने यश मिळवले होते. मात्र २०१७ नंतर राजकीय स्थित्यंतरानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जिल्हा परिषदेचे पाच व पंचायत समितीचे दहा मतदारसंघ आपल्याकडे राखणे हे शिवसेना शिंदे गटापुढे मोठे आव्हान असणार आहे.
२०१७ साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघात एकत्रित शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजप अशी लढत झाली होती. २०२६ मध्ये होऊ घातलेल्या या निवडणुकीत १३६६९ पुरूष व १४०३८ स्त्री अशा एकुण २७ ७०७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. करंजाडी मतदारसंघात उबाठाचे उमेदवार सोमनाथ ओझर्डे यांचे शिवसेनेसमोर आव्हान आहे. या मतदारसंघात शिवसेना आणि उबाठा सरळ लढत होईल, मात्र ऐनवेळी उबाठातून भाजपमध्ये जाऊन अमित मोरे हे भाजप राष्ट्रवादी युतीतून या गटात उभे राहिल्याने ही लढत आता तिरंगी होणार आहे.
करंजाडी मतदारसंघातील राजकीय बलाबळ पाहता या मतदारसंघात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. उबाठा, भाजप व काँग्रेसचे प्राबल्य त्यामानाने कमी आहे. मात्र या गटात शिवसेना, उबाठा आणि भाजप-राष्ट्रवादी युती अशी तिरंगी लढत होणार असल्याने मत विभाजनाचा फटका तीनही उमेदवारांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. करंजाडी पंस गणात उबाठाने आपला उमेदवार दिला नाही. या ठिकाणचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुमित तुपट हे उबाठाचे उमेदवार ओझर्डे यांचे निकटवर्तीय असल्याने या ठिकाणी ठाकरे गटाची मते राष्ट्रवादीचे तुपट यांच्या पारड्यात पडणार आहेत. परंतु तुपट यांना पडणारी हीच मते ओझर्डे आणि मोरे यांच्यात विभागली जाणार. विन्हेरे पं. स. गणात उबाठाने आपला उमेदवार दिला आहे. हा उमेदवार राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाची मते फोडण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवारांना मतदान होताना क्रॉस वोटिंगचा फटका सर्वच उमेदवारांना होणार आहे. या गटात प्राबल्य असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीची मते ही आपापल्या उमेदवारांना पडली तर मुख्य लढत निलेश ताठरे आणि अमित मोरे यांच्यात होईल मात्र राष्ट्रवादीचा छुपा पाठींबा उबाठाचे उमेदवार ओझर्डे यांना मिळाला तर भाजप राष्ट्रवादी युतीचे उमेदवार अमित मोरे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले जातील आणि मुख्य लढत ही निलेश ताठरे आणि सोमनाथ ओझर्डे यांच्यात होईल असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे. एकंदरीत पाहता या मतदारसंघात होणारे मतांचे विभाजन रोखण्यात जो पक्ष यशस्वी ठरेल त्याच पक्षाचा उमेदवार बाजी मारेल.






