Saturday, January 31, 2026

विदर्भात सत्ता स्थापनेचा खेळ

विदर्भात सत्ता स्थापनेचा खेळ

अकोल्यात भारतीय जनता पक्षाच्या शारदा खेडकर यांची महापौरपदी निवड झाली, तर नागपूरमध्ये भाजपची पकड मजबूत असताना अमरावतीत सत्ता निश्चित होत आहे, मात्र चंद्रपूरमध्ये राजकीय संघर्षाने चित्र अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.

वार्तापत्र उत्तर महाराष्ट्र अविनाश पाठक

महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचे निकाल लागून आता दोन आठवडे उलटलेले आहेत. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या चारही महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल असे चित्र सुरुवातीला वाटत होते. त्यानुसार अकोल्यात भारतीय जनता पक्षाच्या शारदा खेडकर यांची महापौरपदी निवड झाली आहे, तर नागपूरमध्ये ६ फेब्रुवारीला भारतीय जनता पक्षाचाच महापौर निवडला जाईल हे नक्की आहे. मात्र अमरावती आणि चंद्रपूर येथे आजही परिस्थिती काहीशी अनिश्चित वाटत आहे. त्यातही अमरावतीत आता परिस्थिती आटोक्यात आली असल्यासारखे दिसते आहे मात्र चंद्रपुरात अजूनही मारामारी सुरूच आहे.

नागपूरमध्ये १५१ जागांपैकी भाजपने १०२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांना कोणाच्याही मदतीची गरज नाही. ते स्वबळावरच सर्व पदांवर दावा सांगू शकतात. मात्र शिंदे सेनेला ते एखादी तरी जागा देतील अशी शक्यता बोलली जात आहे. त्याचप्रमाणे रिपब्लिकन आठवले गटाला सुद्धा ते सत्तेत सहभागी करतील हे देखील निश्चित आहे. कारण नागपुरात रिपब्लिकन मतांचा जो जोर असलेला भाग आहे, तिथे हा भाग भविष्यातही भाजपसोबतच यावा यासाठी ही रणनीती असेल असे बोलले जाते.

याचवेळी नागपुरात भारतीय जनता पक्षाने कठोर आत्मपरीक्षण करण्याची देखील गरज राजकीय विश्लेषक बोलून दाखवत आहेत. २०१७ मध्ये नागपुरात भाजपला १०८ जागांवर विजय मिळाला होता. मात्र यावेळी ती संख्या १०२ वर घसरलेली आहे. नागपुरातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच भाजप नेते निवडणुकीपूर्वी आम्ही १२० जागा जिंकू असा दावा करत होते. मात्र शून्याची जागा बदलली असल्यामुळे १२० चे १०२ झाले आहेत. हे बघता भाजपची रणनीती कुठेतरी चुकली असेही बोलले जाते आहे.

भाजपच्या जागा कमी होण्यामागे विदर्भात नागपुरात एमआयएमचे जे काही प्रस्थ वाढले ते देखील लक्षात घेणे गरजेचे झाले आहे. काही दिवसांपूर्वी नागपूरच्या मुस्लीमबहुल भागात दंगल झाली आणि ती इकडे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचली होती. त्यावेळी त्या काही घटना घडल्या त्याचेच पर्यावसान एमआयएमचे वर्चस्व वाढवण्यात झाले असल्याचे बोलले जात आहे. या दंगलीच्या प्रमुख सूत्रधार म्हणून त्याला अटक झाली होती त्याची पत्नीच एका प्रभागातून विजयी झाली आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षात जागा वाटपामध्ये जे काही गोंधळ झाले त्यामुळे देखील पक्षाला काही जागांचा फटका बसला हे निश्चित आहे. उमेदवार निवडताना काही ठिकाणी बाहेरच्या पक्षातून आलेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देत जुन्या जाणत्यांना अंगठा दाखवला गेला. त्याचप्रमाणे बाहेरच्या प्रभागातील उमेदवारांना भलत्याच प्रभागात लादले गेले. अखेरच्या क्षणापर्यंत याद्या जाहीर केल्या नाहीत आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांना बोलावून बी फॉर्म दिले गेले. त्यामुळे जो काही गोंधळ झाला त्याचा परिणाम मतदारांवर देखील झाला आहे.

त्याचबरोबर काँग्रेसमध्ये नवे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी जो नियोजनबद्ध प्रचार केला आणि योग्य असे उमेदवार निवडले त्याचाही फटका भाजपला बसल्याचे बोलले जात आहे. विकास ठाकरे हे धडाकेबाज नेते म्हणून ओळखले जातात त्याचाच फायदा काँग्रेसला झाल्याचे बोलले जात आहे.

अमरावतीत जरी भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले नसले तरी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाने त्यांना निर्विवाद पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजप राणांचा पक्ष आणि काही अपक्ष म्हणून अमरावतीत भाजपची सत्ता येईल हे आता निश्चित झाले आहे. ६ फेब्रुवारीला अमरावतीत महापौर, उपमहापौरांची निवडणूक होणार आहे त्या दिवशी चित्र स्पष्ट होईल.

चंद्रपूरमध्ये मात्र आज काय होईल हे सांगणे कठीण आहे. तिथे भाजपमध्ये आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार सुधीर मुनगंटीवार या दोघांच्या भांडणामुळे आणि शहराध्यक्षांनी ऐनवेळी उमेदवार यादी बदलल्यामुळे भाजपला जागा कमी मिळाल्या आणि काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेना उबाठा गटाच्या मदतीने काँग्रेस तिथे सत्ता मिळवू शकेल असे चित्र होते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना उबाठा पक्षाने तिथे अवघ्या सहा जागांच्या जोरावर पहिली अडीच वर्षे महापौरपद मागितले आहे, तर २७ जागा घेणाऱ्या काँग्रेसमध्ये शिवसेनेला महापौर पद देऊ नये असा मतप्रवाह आहे. त्यामुळे परिस्थिती डामाडौल आहे.

त्याचवेळी काँग्रेसमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातला संघर्ष उफाळून आला आहे. दोघांनीही नगरसेवकांचे वेगवेगळे गट तयार केले असून एका गटाने सर्व सदस्यांची नोंदणी करून टाकली आहे. त्यामुळे जास्तच गोंधळाची परिस्थिती झाली आहे. त्यात वडेट्टीवार गटाचे नगरसेवक बसने जात असताना त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आणि ही घटना धानोरकर गटाने घडवून आणल्याचा दावा केला जात आहे. त्यातील एक हल्लेखोर पकडला गेला असून त्याच्याकडून ही माहिती मिळाल्याचे सांगितले जात आहे.

इथे काँग्रेसवासी असलेले विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर हे दोघेही मूळ शिवसैनिकच आहेत. विजय वडेट्टीवार २००५-६ या दरम्यान नेते नारायण राणे यांच्या समवेत शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमध्येच वाढत वाढत ते आता विरोधी पक्षनेते पदापर्यंत पोहोचण्याच्या तयारीत आहेत. प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर हे २०१९ पर्यंत शिवसैनिकच होते. त्यावेळी ते शिवसेनेचे आमदार होते आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी हवी होती.

मात्र ही जागा युतीमध्ये भाजपसाठी सोडलेली असल्यामुळे त्यांनी शिवसेना पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसची उमेदवारी घेऊन भाजपचे उमेदवार आणि तत्कालीन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांना पराभव करत ते खासदार म्हणून निवडून आले. नंतर बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यावर प्रतिभा धानोरकर यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि त्या विद्यमान खासदार आहेत. मात्र वडेट्टीवार आणि धानोरकर या दोघांमध्ये विस्तवही जात नाही. त्यामुळे आता महापौर कोणत्या गटाचा करायचा यावर वाद सुरू असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोन्ही गटांना एकत्र बसवून तडजोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून काहीही साध्य झाले नाही. परिणामी दोघांमध्ये चांगलेच भांडण सुरू आहे. याच दरम्यान भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील नेते सुधीर मुनगंटीवार हे मात्र महापौर आमचाच होणार असा दावा करीत आहेत. त्यांना या दोन दिग्गजांच्या भांडणाचा कितपत फायदा मिळेल त्यावरच चंद्रपूरचा महापौर कोणाचा होणार हे भविष्य ठरणार आहे.

Comments
Add Comment